सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड ३०

(Advertising World) टेलिव्हिजन प्रॉडक्शन डिपार्टमेंट

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

निवेदिका – व्हिडिओ प्रॉडक्शनच्या एकूण प्रोसेसमध्ये दिग्दर्शन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ती जबाबदारी पार पाडतो दिग्दर्शक. नंदनजी, गेली अनेक वर्षं तुम्ही निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहात आणि व्हिडिओ प्रॉडक्शनचा प्रदीर्घ असा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, तर याच अनुषंगाने मला असं सांगा, सिनेमा, नाटक, सिरिअल आणि जाहिरात (Advertising World) या प्रत्येक प्रकारातलं दिग्दर्शन यात काही फरक असतो का?

नंदनजी- प्रत्येक दिग्दर्शकाचं आपापलं असं वैशिष्ट्य असतं, प्रत्येकाचा अभ्यास असतो, शैली असते, सिनेमाच्या दिग्दर्शकाला दोन तासाची फिल्म त्याच्या डोळ्यासमोर तरळत असते. कुठल्या मिनिटाला, कुठल्या तासाला, कुठल्या सेकंदाला कुठला सिन आहे हे समोर त्याला दिसत असते. त्याचप्रमाणे नाटकाचा जो दिग्दर्शक असतो त्याला त्याच्या आर्टिस्टकडून काम करून घेताना त्याला शेवटच्या टोकाच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचं असतं. त्यासाठी नाटकाच्या दिग्दर्शकाला त्याचे हावभाव मोठ्या प्रमाणात करावे लागतात.

तेव्हा शेवटच्या टोकापर्यंत याला काय म्हणायचं हे कळतं. तांत्रिक शिक्षण जे नाटकाला लागतं, त्यापेक्षा कितीतरी वेगळं सीरिअल किंवा सिनेमाच्या दिग्दर्शकाला लागतं. याचाच आणखीन एक प्रकार म्हणजे जाहिरात. जाहिरातीच्या दिग्दर्शकाला जे काही प्रॉडक्ट त्याच्याकडे येईल त्या प्रॉडक्टच्या अभ्यासाची सवय करावी लागते. त्या प्रॉडक्टसारखेच कोणते प्रॉडक्ट बाजारात आहेत त्यांच्या जाहिराती कशा चालू आहेत, याचाही अभ्यास करावा लागतो. ते प्रॉडक्ट कसं उठून दिसेल, जाहिरात ग्लॅमरस कशी करता येईल? याचा अभ्यास करावा लागतो. नवनवीन तंत्रज्ञान, डेव्हलप तंत्रज्ञान त्याचा अभ्यास करावा लागतो. 20 ते 60 सेकंदांची फिल्म डोळ्यासमोर ठेवून सगळ्याचा अभ्यास करून अतिशय उत्तम प्रॉडक्शन बनवावं लागतं. ही गोष्ट जाहिरात क्षेत्रातल्या दिग्दर्शकासाठी अतिशय महत्त्वाची असते.

निवेदिका – कारण जाहिरातींचा (Advertising World) मूळ उद्देश असतो, त्या जाहिरातीचा सेल वाढावा, ही जबाबदारी मुख्यत: दिग्दर्शकावर असते. याचबरोबर तो अजून कोणत्या भूमिका पार पाडत असतो?

नंदनजी- एखाद्या कुटुंब प्रमुखावर जशी कुटुंबाची जबाबदारी असते त्या उत्पादकाला नक्की काय सांगायचंय ते बिनचूक, आकर्षक, सोप्या पण समजेल अशा भाषेमध्ये ते प्रॉडक्शन बनवलं गेलं पाहिजे. जे सर्वसामान्य लोकांना समजेल. त्याचे निकाल त्या उत्पादकाला मिळाले पाहिजेत. प्रॉडक्शनची संपूर्ण धुरा त्याच्यावर असते, हा दिग्दर्शक जे बनवेल त्याच्या यशाला-अपयशाला तो स्वत: जबाबदार असतो; कारण या कल्पनेपासून कॅमेरा, प्रॉडक्शन टिम, आर्टिस्ट, त्यांचा मेकअप, त्यांचे कपडे, लोकेशन, या सगळ्याचा निर्णय घेणारा दिग्दर्शक असतो; म्हणून या सगळ्याची जबाबदारी त्याने एकट्याने पार पाडली पाहिजे.

निवेदिका – प्री प्रॉडक्शनपासून फायनल तयार होणार्‍या जाहिरातीपर्यंत हा दिग्दर्शक जबाबदार असतो. मग दिग्दर्शकाकडे कोणत्या गुणवत्ता असल्या पाहिजेत, ज्यामुळे जाहिरात परिणामकारक होऊ शकेल?

नंदनजी- सगळ्यात अवघड काम म्हणजे जाहिरात दिग्दर्शन! नाटक, सिनेमा यातला क्रम थोडा इकडेतिकडे झाला तर चालतो; कारण ती करमणूक असते; पण जाहिरात अवघड का आहे; कारण त्याचा निकाल द्यायचा असतो आणि तो 100% सकारात्मक द्यायचा असतो.

ती जाहिरात फेल झाली तर पुन्हा ती जाहिरात लावली जात नाही आणि त्या निर्मात्याचे पूर्ण पैसे वाया जातात. पुन्हा नवीन जाहिरात करावी लागते; कारण काल्पनिकतेतून जाहिरात तयार करावी लागते. डोक्यात जी कल्पना आहे ती जर नाही उतरली, तर फायदा नाही. एखादा चित्रकार त्याने एखादे चित्र काढायला घेतलं, तर ते चांगलंच होतं असं नाही. कदाचित ते बिघडतंपण; मग तो पुन्हा नव्याने चित्र काढायला घेतो. तसाच हा प्रकार आहे; पण याचा निकाल 100 टक्के द्यायचाच आहे म्हणून चांगलंच काम करावं लागतं.

निवेदिका – दिग्दर्शक हा त्या जाहिरातदाराला जबाबदारअसतो म्हणूनच कुशल, अनुभवी आणि ज्ञानी दिग्दर्शक असणे गरजेचं आहे.

नंदनजी- यूएसपीचा संपूर्ण आशय 20 ते 30 सेकंदात मांडायचा असतो हे अतिशय अवघड काम आहे. एखादी गोष्ट लांबण लावून सांगणं सोपं आहे; पण 2-3 वाक्यात तीच गोष्ट सांगायची व हे समोरच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे आणि ते कळल्यानंतर तो ते प्रॉडक्ट विकत घ्यायला गेला पाहिजे. हा मोठा हेतू आहे.

निवेदिका – कमीत कमी शब्दात पण तितकीच आकर्षक व माहितीपूर्ण जाहिरात करणे हे खरंच महत्त्वाचं असतं.

नंदनजी- याच्याव्यतिरिक्त ती पूर्ण जाहिरात चकचकीत दिसावी लागते. पूर्णपणे मेकअपपासून लाईटपर्यंत सगळं अतिशय आरशासारखं स्वच्छ पाहिजे. याचं कारण असं की या जाहिरातीच्या बाजूला आणखीन 10 जाहिराती चालू असतात. लोकं ती बघत असतात. लोकांना आपलीच जाहिरात आठवली पाहिजे आणि ती लागल्यानंतर रिमोट हातात घेऊन चॅनल बदलायला नको हे महत्त्वाचं.

निवेदिका – नंदनजी गेली 25 वर्षांहून अधिक काळ तुम्ही या क्षेत्रात काम करता. अनेक व्हिडिओ जाहिराती तुम्ही दिग्दर्शित केल्या, तर तुम्ही कोणता किस्सा सांगाल?

नंदनजी– किस्सा नाही पण… दिग्दर्शकाच्या भूमिकेतून त्याचे कसब, प्रसंगावधान कसं असले पाहिजे हा मला स्वत:ला आलेला अनुभव सांगतो. फर्टिलायझरची कंपनी होती. कल्पना अशी होती की, एका शेतकर्‍याने शेतीचे काम करताना कशी काळजी घ्यायची? जाहिरातीचा शेवट असा होता की, तो कुटुंबाबरोबर कसा खूष आहे? निम्म्याच्यावर शूटिंग झालं आणि लंच ब्रेकच्या आधी कंपनीच्या प्रॉडक्टबरोबर शूटिंग घ्यायचे होते आणि मग लंच ब्रेकनंतर आनंदी कुटुंबाचं शूटिंग करायचं; असं असताना प्रॉडक्टबरोबर घ्यायचे शूटिंग सुरू झाले.

त्यातला जो मुख्य कलाकार होतो, जो शेतकरी दाखवलेला, त्याला बायको एक-एक प्रॉडक्ट काढून देते ते तो घालतोय, असं सगळं चालू असताना त्याला सारखे फोन यायला लागले. तो फोनवर बोलायचा, परत यायचा, असं तीन-चार वेळा झालं. त्याला विचारलं की काय झालंय? तर तो म्हणाला, ‘नाही सर, पहिले हे करून घेऊ;’ पण तो बेचैन होत होता. हे मला दिसत होतं. युनिटला दिसत होतं. यात काहीतरी गडबड आहे; पण तो सांगत नव्हता. मग मी युनिटला सांगितलं, सगळं थांबवा आणि खोदून खोदून विचारल्यावर त्याला रडायला यायला लागलं. तो म्हणाला, त्याची मिसेस गेली. हे सगळं झाल्यावर आम्ही सुन्न झालो. अर्धांगिनी गेल्यावरसुद्धा तू एवढा सगळा विचार करत आहेस की, प्रॉडक्शनचा खर्च वाया जायला नको. हे अतिशय चांगल्या कलावंताचं लक्षण आहे.

त्याला तिथेच हॅट्स ऑफ केले. त्याची जायची व्यवस्था केली. त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून जाहिरातीचा शेवट कसा करायचा, हे लंच ब्रेकमध्ये ठरवलं. ग्राहकाला विचारलं, असं करावं लागेल. ते ओके म्हणाले. शेवट थोडा वेगळा झाला; पण परिणामकारक झाला. हे प्रसंगावधान दिग्दर्शकाला असावं लागतं.

निवेदिका – मग तुम्ही तो शेवट काय केलात?

नंदनजी- आम्ही तो जो मुख्य हिरो होता, जो प्रॉडक्ट दाखवणार होता त्या हिरोच्या तोंडी ते शब्द घातले. त्याच्याकडून ते सगळं वदवून घेतलं. तिथे फक्त आनंदी कुटुंब आलं नाही एवढंच. सगळा सेट लागलेला असताना काय करायचं, तर ते हे एकच शक्य होतं. जर कंपनीला वाटलं असतं की नाही ते आनंदी कुटुंब पाहिजे, तर आम्ही परत शूटिंगचं प्लॅन केलं असतं; पण त्यावेळी शेवट करून घेणे गरजेचे होतं. ते आम्ही केलं आणि कंपनीला ते देखील आवडलं. अपरिहार्य कारणाने काही निर्णय घ्यावे लागतात. तेसुद्धा योग्य व परिणामकारक घ्यावे लागतात आणि जाहिरात कशी परिणामकारक होईल याचा विचार दिग्दर्शकालाच करावा लागतो.

निवेदिका – नंदनजी अतिशय वेगळा अनुभव आज तुम्ही श्रोत्यांबरोबर शेअर केलात ..ह्याच विषयावर आपण पुढच्या आठवड्यात आणखी बोलणार आहोत. तो पर्यंत नमस्कार..

पुढचा विषय –(Advertising World) टेलिव्हिजन प्रॉडक्शन डिपार्टमेंट भाग २  (क्रमशः)

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

jahirat VIshwa

वाचकांसाठी संपर्क –  नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com