सर्वात वर

जाहिरात विश्व -एपिसोड २१

जाहीरातीसाठीचे जिंगल (काव्य) लेखन

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – मिलिंद गांधी (गीतकार, कवी) आणि नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)

Milind Gandhi
मिलिंद गांधी (गीतकार, कवी) आणि संगीतकार संजय पुणतांबेकर

निवेदिका –   सुप्रसिद्ध गीतकार कवी मिलिंद गांधी आज आपल्याकडे आलेले आहेत. सर्वप्रथम मला सांगा की, जिंगल लिहिताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात.

मिलिंदजी- विषय असा आहे की, कविता ही माणसाला सुचत जाते. गीतसुद्धा थोड्या अधिक फरकाने सुचत जातं एखाद्या विषयावरती; परंतु जिंगल हा असा एक प्रकार आहे की, ज्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट लोकांपर्यंत थेट पोहोचलं पाहिजे आणि त्यातून तो जो उत्पादक आहे त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्याची विक्री वाढली पाहिजे, म्हणजे एका विशिष्ट उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी जिंगल हे एक माध्यम आहे. त्यामुळे याच्यामध्ये उत्पादन नक्की कुठलं आहे, जिंगलचा कालावधी किती आहे 10-20-30 सेकंद याचा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट की, ही जिंगल जेव्हा रेकॉर्ड होणार आहे तेव्हा ती कुठल्या स्तरावर होणार आहे. म्हणजे ती शहरामध्ये फक्त शहर पातळीवर आहे की अजून राज्य पातळीवर होणार आहे; कारण त्यानुसार त्याचं बाकीचं बजेट वगैरे अवलंबून असते. त्यामुळे ते लिहितानासुद्धा त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. जिंगल लिहिताना त्याची भाषा हा एक महत्त्वाचा भाग आहे. सर्वांना कळेल अशा भाषेचा वापर करायलाच पाहिजे; पण दुसरी गोष्ट अशी की, मराठी भाषेत लिहायची आहे, हिंदीमध्ये लिहायची आहे. म्हणजे हिंदीमध्ये लिहिल्यानंतर ती संपूर्ण देशभर जाऊ शकते. मराठीमध्ये असेल तर ती महाराष्ट्रापुरती मर्यादित असते; त्यामुळे भाषेचासुद्धा, भाषेच्या सौंदर्याचासुद्धा विचार करून जिंगल लिहावी लागते. ती प्रभावी व्हावी लागते.

नंदनजी- मला अजून एक या ठिकाणी सांगायचंय की, भाषा ही आपण शहरापुरती किंवा राज्य पातळीपुरती बोलतो; पण आपण किंवा मिलिंदजींनी अशा अनेक भाषांमध्ये लिहिलंय. जे एखाद्या विशिष्ट ग्राहकासाठी आहे. म्हणजे एखादा विशिष्ट वर्ग आहे. जसा शेतीवर्ग आहे. शेतकरी वर्गात मराठीमधून लिहायचं झालं तर त्यांच्या भाषेमध्ये लिहावी लागते. अनेक वेळेला खान्देश बाजूला अहिराणी भाषा असते, तर त्या अहिराणी भाषेचेदेखील सौंदर्य आहे. त्याच्यामध्ये कधी कधी लिहावं लागतं. कधी कधी खान्देशी भाषा आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे जे उपप्रकार आहेत तो लहेजा घेऊन त्या पद्धतीने केली तर त्या लोकांपर्यंत ते पटकन पोहोचेल आणि म्हणून यासाठी कवी, गीतकार यांना त्या भाषेचंसुद्धा ज्ञान असणं, ती प्रतिभा असणं हे फार आवश्यक आहे, असं मला वाटतं.

निवेदिका –  जिंगल हे एक आव्हानात्मक असं काम आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल…

मिलिंदजी- नक्कीच हे आव्हानात्मक काम आहे. म्हणजे खरंच मघाशी मी म्हणालो , कविताही सुचते. ती आपोआप सुचते. त्याचं गाणंसुद्धा कधी होतं ते कळत नाही; परंतु जिंगल हा असा विषय आहे की, त्याचा अभ्यासच करावा लागतो. केंद्रस्थानी ते जे प्रॉडक्ट आहे ते ठेवून त्याच्यावर लिहावं लागतं. मघाशी नंदनने सांगितल्याप्रमाणे की आपण कोणासाठी लिहितोय त्या वर्गाची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेचासुद्धा कुठेतरी वापर हा करावा लागतो. जिंगल हे जाहिरातीचे माध्यम आहे आणि ते तेवढ्या प्रभावीपणे जर लोकांपर्यंत पोहोचलं, तरच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की, कविता आणि गीतलेखनापेक्षाही अवघड अशी जिंगल लेखनाची प्रक्रिया आहे.

नंदनजी- लिहिणं अवघड आहे; पण ते सोप्या भाषेत लिहावं लागतं. म्हणजे मला असं सांगावसं वाटतंय की, कविता लिहिताना आपण अलंकारिक भाषेचा वापर आपण जास्त करतो. गीत लिहितानासुद्धा अलंकारिक भाषा वापरलेली चालते; पण जिंगल लिहिताना सोपीच भाषा वापरावी लागते; कारण त्या विशिष्ट लोकांपर्यंत ते पटकन पोहोचावं आणि ज्यांनी त्या जिंगल बनवण्यासाठी किंवा ते गाणं बनवण्यासाठी ज्यांनी पैसे लावले आहेत; म्हणजे जो उत्पादक आहे त्याची व्यवसायवृद्धी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी ती जास्तीत जास्त सोप्या शब्दांत पटकन पोहोचेल अशी बनवावी लागते आणि जिंगल म्हणजेसुद्धा मला असं सांगावसं वाटतंय की, हल्लीच्या काळामध्येसुद्धा ग्राहक विचारतात मला की, आमची जरा पटकन 20 सेकंदांची जिंगल बनवून द्या, तर ते जिंगल म्हणताना जिंगल म्हणतात; पण त्यांना हवा असतो रेडिओचा स्पॉट जो अँकर बेस असतो, तर अनेक वेळेला कुठेतरी विसंवाद होतो आणि लोकं स्पॉटला पण जिंगल असं म्हणतात; तर मला हे सगळ्यांना सांगायचंय त्या निमित्ताने की, जिंगल म्हणजे आपल्या जाहिरातीचं जे गाणं असतं त्याला जिंगल म्हटलं जातं आणि जो स्पॉट असतो तो स्पॉट म्हणजे साधी किंवा नाटकी असे 2-3 लोकं जेव्हा बोलतात तेव्हा नुसतं ज्याला व्हाईस ओव्हर दिला जातो. त्याला स्पॉट असं म्हटलं जातं, आमच्या भाषेमध्ये किंवा आमच्या शास्त्रामध्ये.

मिलिंदजी- आता नंदनने जे सांगितलं, की सोप्या भाषेत लिहावं लागतं, तर त्याच्यामध्येसुद्धा एक अशी गंमत आहे की प्रॉडक्ट काय आहे त्याप्रमाणे त्याची भाषा करावी लागते. उदा. सोन्या-चांदीची जाहिरात करायची आहे, तर मग त्याला तशी अलंकारिक भाषा पण लागते. शेतीची जाहिरात करायची आहे तर त्याला ती शेतकर्‍याची रांगडी भाषा वापरावी लागते. हा दोन्हीमधला बेसिक फरक आहे आणि मग त्याप्रमाणे बसली पाहिजे.

निवेदिका –   म्हणजे मग संगीत देतानासुद्धा त्या गोष्टीचा विचार केला जातो. जिंगल म्हणजे यमकाला यमक जुळवणं इतकं सोपं नक्कीच नाहीये.

नंदनजी- मला एक गोष्ट या निमित्ताने नमूद कराविशी वाटते की, गीतकाराला संगीताचं ज्ञान असलं तर ते जास्त फायद्याचं ठरतं. जे मिलिंदकडे आहे. मिलिंद हा माझ्या अंदाजाने कविता लिहीत असतानाच गाणं शिकलेला आहे. त्याला रागाचं ज्ञान आहे. त्याला गाण्याचं, संगीताचं, तालाचं ज्ञान आहे. तो पूर्वी गाणीही म्हणायचा. त्यामुळे त्याला कुठल्याही रागामध्ये किंवा कुठल्या तालामध्ये, कुठल्या मीटरमध्ये काय केल्यानंतर ती चाल कशी बांधू शकतो याचं ज्ञान असल्यामुळे तो जास्त प्रभावीपणे जिंगल लिहू शकतो.

मिलिंदजी- कविता, गीत हे लिखाण आधीपासून चालूच होतं; पण व्यावहारिकपणे अशा पद्धतीने लिखाण करायचं हे केवळ नंदनमुळे शक्य झालं; कारण ही संधी त्याने मला दिली आणि हा एक वेगळाच लिखाणातला प्रकार मला अनुभवायला मिळाला. त्यात खूप मजा आली.

निवेदिका –  खरंच. तुम्ही मघाशी म्हणालात की, आधी त्याला सेकंद दिले जातात आणि त्या सेकंदात तुम्हाला शब्द वगैरे सगळं बसवायचं असतं. अतिशय आव्हानात्मक असं काम आहे. निर्मितीसाठी आजपर्यंत कोणकोणत्या जिंगल्स तुम्ही लिहिल्या आहेत?

मिलिंदजी- निर्मितीसाठी मी बरंच लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये गोविंद दंडे अ‍ॅण्ड सन्सची पहिली जी जिंगल झाली होती. ‘सोन-चांदी नवरत्नांनी हे दालन झगमगले.’ वगैरे तर अशा सुंदर जाहिराती त्यावेळेस मी लिहिलेल्या आहेत. त्यात नंतर हिरा, पुष्कराज किंवा इतरही काही ज्वेलर्स आहेत. नाशिकमधले किंवा बाहेरचे त्यांच्यासाठीसुद्धा म्हणजे टकले बंधू, तेजस्वी ज्वेलर्स यासुद्धा जाहिराती मी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर राजहंस अ‍ॅक्वा नावाची एक कंपनी आहे. त्याच्यासाठीसुद्धा एक छान जाहिरात केली. ती देशस्तरावर गाजलेली आहे. त्यानंतर टॉक ऑफ द टाऊन नावाचं रेस्टॉरंट आहे. त्यासाठीसुद्धा लिखाण केलेलं आहे. त्यानंतर शेतीची जी काही प्रॉडक्टस् आहेत यासाठी बर्‍यापैकी लिखाण केलेलं आहे.

नंदनजी- त्या बरोबरीनेच एक वेगळा प्रयोग म्हणजे आम्ही असं केलेलं होतं की, गिरीकंद आणि सचिन ट्रॅव्हल्स या दोन्हीसाठी त्या त्या प्रदेशातले स्थळ घेऊन म्हणजे जर हिमाचल प्रदेश असेल, तर तिथले स्थळ घेऊन त्यांच्या म्युझिकवर त्या मीटरवर लिहायचं. साऊथमधलं असेल तर तिथलं म्युझिक घेऊन त्या मीटरमध्ये लिखाण करायचं, असे विविध प्रयोगदेखील आम्ही केलेले आहेत.

निवेदिका –   प्रिया सुपर लिक्विडच्या जाहिरातीबद्दल काय सांगाल?

नंदनजी-  ती मिलिंदने लिहिलेली मोठी जाहिरात होती. ते नांदगावकडचं प्रॉडक्ट आहे; पण सुपर लिक्विड म्हणजे काय तर नीळ. आपण कपडे धुतल्यानंतर वापरतो. त्यांचो तो नीळ बनवायचा कारखानाच खूप मोठा होता तर त्याची जाहिरात कराविशी वाटली आणि त्याच्यावर मिलिंदने हिंदीमधून लिहिली होती आणि त्याच्यामध्ये त्याचं संगीत मिलिंद जोशी जो आज मुंबईचा मोठा संगीतकार आहे त्याने दिलेलं आहे आणि त्या जाहिरातीमध्ये प्रशांत दामले, आसावरी जोशी, गौतमी गाडगीळ, आताची राम कपूरची बायको गौतमी कपूर, किशोर नांदलस्कर अशी सगळी मंडळी होती. समीर आठल्येने त्याचं शूटिंग केलं होतं. ते आम्ही मड मध्ये केलेलं होतं आणि ती पहिली जाहिरात अशी होती की, जी रिर्व्हस टेलिसिने नावाचा प्रकार करून म्हणजे बिटा कॅमवर शूट केलेली आणि ती चेन्नईमध्ये जाऊन ते रिर्व्हस टेलि साईन म्हणजे थिएटर फिल्ममध्ये त्याचं रूपांतर केलेलं, अशी पहिली जाहिरात केलेली होती.

नंदनजी- पहिले काहीही लिखाण करण्यासाठी जो दिग्दर्शक असेल त्याला आधी कल्पना विस्तृत करावी लागते. म्हणजे ग्राहकाची मिटिंग झाल्यानंतर त्याचे जे काही यूएसपीएस आहेत त्याचे जे काही महत्त्वाचे पॉईंटस आहेत हे लक्षात घेऊन नक्की त्याला काय करायचं आहे आणि त्यात आशय काय हवा आहे हे त्या दिग्दर्शकाने गीतकाराला सांगितलं पाहिजे. मला सांगायला आवडेल की, अशा पद्धतीने मिलिंदने त्याची तयारी केली. आम्ही टेबलवर बसायचो ही कल्पना आहे. या कल्पनेवर आपल्याला जाहिरात बनवायची आहे, हा आशय आला पाहिजे आणि त्यातून हे दाखवायचं आहे. या गोष्टी सांगितल्यावर केवळ अर्ध्या तासामध्ये 2-3 जिंगल्स तरी तो लिहून मला द्यायचा. टेबलवरून न उठता असं मी पहिल्यांदाच पाहिलंय आणि मला असं पहिल्यांदा घडल्यासारखं वाटतंय की, कुठल्याही गीतकाराला सांगितल्यानंतर जिंगल पटकन लिहून दिलेली आहे.

मिलिंदजी- आपल्याला नक्की काय लिहायचंय याचे जर महत्त्वाचे मुद्दे मिळाले तर ते आपण अत्यंत सुलभ पद्धतीने लिहू शकतो आणि ती दिशा नंदनने अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवल्यामुळे मला लिखाणालाही गती मिळाली.

नंदनजी- आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिंगल्समधल्या अनेक जिंगल्सला राज्यस्तरावर पुरस्कार मिळालेले आहेत. जवळ जवळ 10 वर्षांमध्ये आपल्याला 12-13 पुरस्कार मिळालेले आहेत आणि अशा प्रकारच्या जिंगल्स मला त्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालेल्या नाहीत.

निवेदिका –   तुमची जी कल्पकता आहे; म्हणजे नंदनजींची जी जाहिरातविषयीची संकल्पना आणि मिलिंदजींची कवी म्हणून कल्पना या दोघांच्यामध्ये जिंगल्स करताना तुमच्या मैत्रीचा उपयोग झाला, असं मला वाटतं. म्हणजे जसं निर्मिती ही 25 वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात आहे. तशी तुमची मैत्रीही! आणि जिंगल्सच्या बाबतीतलं नातं हे आधीपासूनचं आहे. त्यामुळे हे वृद्धिंगत होत राहो या शुभेच्छा.

पुढचा विषय जाहीरातीसाठीचे संगीत दिग्दर्शन     

jahirat VIshwa

या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या  वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com