सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड २२

जाहीरातीसाठीचे संगीत दिग्दर्शन

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – संजय पुणतांबेकर (संगीतकार) आणि नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)

निवेदिका – आज आपल्याकडे संजय पुणतांबेकर आलेले आहेत. निर्मितीसाठी त्यांनी अनेक जाहिरातींना, जिंगलला म्युझिक दिलंय. त्यानंतर बर्‍याच डॉक्युमेंट्रीसना बॅकग्राऊंड म्युझिक दिलंय.
संजयजी- साधारण आपण जेव्हा जिंगल बनवतो, जिंगल करतो, तर ही जिंगल म्हणजे गाणं असलेली जाहिरात; तर हे करताना आपण नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करतो.

संजयजी- आपण जिंगल करताना सर्वप्रथम विचार करतो की, त्यासाठी किती वेळ लागणार आहे, किती सेकंदाची जिंगल आहे, कोणतं प्रॉडक्ट आहे आणि ते प्रॉडक्ट वापरणारा ग्राहक कोण आहे. आम्ही जी दंडेंची जिंगल केलेली, ती अलकारांची जिंगल होती. त्यांचा जो ग्राहक आहे, तो स्त्री वर्ग आहे. त्यामुळे स्त्रियांना जे अपील होइल अशा पद्धतीची सुरावट आम्ही केली होती.

नंदनजी- त्याचबरोबर त्यामध्ये हळुवारता असली पाहिजे. तसंच कधी कधी त्यांचा एखादा महोत्सव असेल तर त्यावेळी महोत्सवाचं ग्रँजर देखील आलं पाहिजे, हे आम्ही पाहिलं.

निवेदिका – मला असं वाटतं, ती जरी अलंकारांची जाहिरात असली, तरीही कुठल्या दागिन्यासाठी आहे किंवा कुठल्या विषयासाठी आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणजे निर्मितीने त्यांच्या वर्धापनदिनाची जाहिरात केली होती, त्यामध्ये एक उत्साह आला होता. त्यात एक उत्सवाचं वातावरण होतं.

संजयजी- एक पुष्कराजची केली होती ती एका वेगळ्या पद्धतीने केली होती. ती ग्राहकांना अपील व्हायला हवी की, पुष्कराज का वापरावा? त्यासाठी आम्ही त्या पद्धतीची चाल दिली होती. त्याचे सूर वरच्या पट्टीतले असले पाहिजेत, जे लोकांना अपिल होतील. तसेच त्यात विश्वासार्हता असली पाहिजे.

निवेदिका – आता मला सांगा की, या जाहिराती करत असताना कुठल्या जाहिरातींमध्ये, कुठल्या वाद्याचा नक्की कसा वापर करायचा हे कसं ठरवलं जातं?


संजयजी- हा फार छान प्रश्न आहे. वाद्यांचा उपयोग हा जो भाग आहे तो अ‍ॅरेंजमेंटमध्ये येतो. साधारण आपण अलंकारांची जाहिरात करत आहोत तर त्यासाठी आपण तबला वापरला आहे. म्हणजे एथिनिक स्टाईलने करायचं असेल, तर त्यामध्ये आपण ड्रम्सपण वापरले आहेत. फ्युजन टाईपच्या गाण्यांसाठी त्यानंतर सितारपण वापरली आहे. संतूर वापरला आहे, बासरी वापरली आहे. थोडक्यात, स्त्रियांना जे अपिल होतील ते ध्वनी आपण वापरले आहेत.


निवेदिका – बरोबर, तुम्ही एकदा गुजराती स्टाईलची जाहिरात केली होती, तर गुजरातमधल्या शेतकर्‍याला अपिल होईल अशा पद्धतीची तिथे कोणती वाद्यं वापरली जातात. त्यांच्या संस्कृतीशी जुळणारी कोणती वाद्यं आहेत.


संजयजी- आम्ही गुजराती पद्धतीच्या 2-3 प्रकारच्या जाहिराती केलेल्या आहेत. एक अ‍ॅग्रो प्रॉडक्टसाठी केली होती. एक अलंकारांसाठी केली होती. राजस्थानचा जसा घुमट आहे, गुजरातचा तसा गरबा आहे. घुमटचा एक टिपिकल पॅटर्न आहे त्यात एक र्‍हिदम आहे, ढोल आहे, त्यानंतर त्यात झांजा वापरल्या गेल्या आहेत, त्यात एक रावणहत्ता म्हणून एक वाद्य आहे. जे व्हायोलिनसारखं असतं आणि कंटिन्यू एक सूर चालू असतो त्याचा आम्ही वापर केला. जेणेकरून तो इंमपॅक्ट आला पाहिजे. हे राजस्थानचं, गुजरातचं म्युझिक आहे; तसंच आम्ही मराठी अ‍ॅग्रो प्रॉडक्टच्या जाहिराती केलेल्या आहेत. त्यामध्ये त्याचा ग्राहक आहे शेतकरी. तर शेतकर्‍यांची संस्कृती, त्यांना आवडणारे वाद्य आम्ही वापरली त्यात ढोलकी आहे, दिमडी, संबळ, ढोल, बासरी यासारख्या वाद्यांचा वापर आम्ही तेथे केला.


नंदनजी – आणखी एक मला आठवतंय ते म्हणजे आपण राजहंस दुधासाठी जाहिरात केलेली तर ते गाईचं दूध म्हणून ते विकतात; तर त्यांच्यासाठी आपण त्या स्टाईलची जाहिरात केलेली की, त्यात आपण दुधाच्या घटाचा वापर केला होता आणि आणखी एक आठवतंय ते सचिन ट्रॅव्हल्ससाठी आपण जाहिरात केली होती, तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रदेशांचं संगीत वापरलं होतं.

संजयजी – त्याला आपण रेल्वेचा बेस दिला होता. म्हणजे ट्रेन चालू आहे. त्याचा जो स्पीड आहे तसा तो र्‍हिदम सुरू आहे आणि त्यातच वेगवेगळ्या प्रदेशाचं म्युझिक अ‍ॅड केलेलं.

नंदनजी – हिमाचल प्रदेशची जाहिरात जास्त गाजली होती आणि त्यात सिमला, कुलू, काश्मीर, मनाली अशा टाईपचं ते होतं आणि तिथे जाहिरात जास्त गाजली होती.

संजयजी- त्यात आपण रॅपपण वापरलं होतं.

निवेदिका – मला आणखी एक सांगा की, एखाद्या गीताला चाल देणं, आणि जिंगलला चाल देणे यातला नेमका फरक काय?

संजयजी – सगळ्यात मोठा फरक म्हणजे जिंगल जी आहे त्याला एक हूक लाईन असते आणि ती हूक लाईन आपल्याला हायलाईट करायची असते, तर त्या हूक लाईनची जी ट्यून आहे ती खूप अप्रतिम असली पाहिजे आणि ती अपिल झाली पाहिजे. जिंगल ही 2-3 लाईनचीच असते; पण गाणं करताना त्यात सगळ्यात मोठं म्हणजे त्यात भाव असला पाहिजे. म्हणजे रोमँटिक गाणं आहे की विरहगीत आहे की प्रेमगीत आहे किंंवा अजून काही वेगळ्या प्रकारचं गाणं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला चाल बनवायची असते; कारण गाणं हे तुम्हाला तीन-साडेतीन मिनिटांचं बनवायचं असतं आणि त्यात 2 किंवा 3 अंतरे असतात. त्यात तुम्हाला खूप स्कोप असतो. एक मुखडा तयार करायचा. मग अंतरा आहे. परत मधलं म्युझिक, परत मुखडा तर त्यामुळे गाणं बनवायला मोठा स्कोप आहे; पण जिंगल तुम्हाला 30 सेकंदामध्येच करायची असते. त्यातही तुम्हाला ती अपिल व्हायला पाहिजे. म्हणजे ट्यून तशी बनवली गेली पाहिजे की, 30 सेकंदांमध्ये ती ग्राहकाला अपिल व्हायला पाहिजे. हा त्यातला मोठा फरक आहे.

निवेदिका – एखादी लक्षात राहाणारी किंवा वेगळा अनुभव असलेली जिंगल आठवतेय का?

संजयजी- हो. आम्ही तशा भरपूर केलेल्या आहेत; पण त्यातली लक्षात राहाणारी म्हणजे बेदमुथा वायर्स. त्यांचं प्रॉडक्ट आहे तार. जी कुंपणासाठी लागते. ती तार किंवा घरात आपण कपडे वाळवण्यासाठी वापरतो ती तार; तर या तारेचं त्यांचं प्रॉडक्शन आहे; तर त्या तारेसाठी बनवलेली वैशिष्ट्यपूर्ण जिंगल मला आजही आठवते.

निवेदिका – खरं म्हणजे ते प्रॉडक्टच असं आहे की, त्याला चाल कशी द्यावी हा प्रश्न पडला असेल.

संजयजी- म्हणूनच आम्ही त्याला फोल्क टाईपची चाल दिली.

नंदनजी – अ‍ॅक्च्युली त्याचा मेन ग्राहकवर्ग आहे तो शेतकरी; कारण कांद्यासाठी लागणारी जाळी आणि द्राक्षांच्या मांडवासाठी लागणारी जाळी म्हणजे तार शेतकरी विकत घेतात. त्यासाठी मिलिंद गांधींनी अतिशय सुंदर जिंगल लिहिली होती.

संजयजी- आणि तीच आपली परत त्यांनी कन्नडमध्येपण बनवून घेतली.

निवेदिका – मी असं ऐकलंय की, पश्चिम महाराष्ट्रात ती जाहिरात खूप चालली आणि तिथून पुढे ती कर्नाटकात गेली. या जाहिरातीमुळे त्यांना जिंगलवाले बेदमुथा म्हणून ओळखायला लागले.
संजयजी- म्हणजेच आम्हाला पसंतीची पावती मिळाली.

निवेदिका – संजयजी, वाद्यांच्या दृष्टिकोनातून किंवा टेक्निकली असं काही अनुभव आहेत का?

संजयजी- एक टँगो पंच सोड्याची आम्ही एक जाहिरात केली होती त्यात जेव्हा जिंगल संपते त्यावेळी सोड्याची बाटली ओपन करताना जो आवाज येतो आणि मग तो सोडा फसफसण्याचा आवाज येतो तो इफेक्ट आम्हाला पाहिजे होता. त्यासाठी आम्ही 10-12 सोड्याच्या बॉटल्स आणल्या होत्या आणि आम्ही प्रत्येक बॉटल मायक्रोफोनसमोर ओपन केली आणि 10 वेळा केल्यानंतर एक टेक आम्हाला मिळाला आणि मग तो इफेक्ट दिला होता. त्याचे रिझल्टसही खूप छान मिळाले होते.
निवेदिका – आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक रोमँटिक मूड आणला होता का?

संजयजी- रोमँटिकपेक्षाही श्रृंगारिक रस त्यात आणला होता. आम्ही फक्त ऑडिओमधून सोडा आहे हे दाखवलं होतं. ते करताना खूप मजा आली होती.

अजून एक आठवतंय आम्ही दंडेंचीच जाहिरात केली होती. दिवाळी-दसरा सणाच्या दरम्यान ती ट्यून आधी करून मग त्यावर जिंगल लिहिली होती. ती खूप मस्त झाली होती. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉडक्ट जरी अलंकार असलं तरी सणाची वातावरण निर्मिती जी होती ती खूप छान झाली होती.

नंदनजी – मला वाटतं, आपण तेव्हा असा विचार केला होता की, श्रावण महिना येतो आणि श्रावण महिन्यापासून जाहिरात सुरू होते. त्यामुळे सणाचा जो उत्साह असतो, वातावरणात एक प्रसन्नता असते ती प्रसन्नता त्या जिंगलमधून दिसली पाहिजे. जेणेकरून खरेदीला जाताना इतर वस्तूंप्रमाणेच अलंकार खरेदीसाठी उद्युक्त केले पाहिजे आणि ती जिंगल गुणगुणली पाहिजे.

निवेदिका – संजयजी गाण्यांना तर तूम्ही चाल देतच असता, पण जिंगलला सुरुवात कशी झाली आणि कोणापासून झाली? तुमची पहिली जिंगल कोणती?

संजयजी- जिंगलची माझी सुरुवात निर्मितीपासूनच झाली. पहिला चान्स मला निर्मितीनेच दिला. निर्मितीने माझ्यावर विश्वास दाखवला की, तू हे कर. त्याआधी मी कधीच जिंगल केली नव्हती; पण आता मी एका दिवसात 1-2 काय 10 जिंगल्स करू शकतो.

नंदनजी – बरोबर. तुला मला आणि वाचकांना सांगायला आवडेल की, निर्मितीसाठी पहिल्यांदा जिंगल लिहिणारा जसा संजय तू आहेस, तसे अनेक जण आहेत. म्हणजे पूर्वी आपण जर शो ऐकला असेल किंवा मेंदीच्या पानावर कॅसेट ऐकली असेल तर त्यात त्यांचा जो संगीत संयोजक आहे तो आमचा डोंबिवलीचा मित्र आहे. उदय चितळे त्याने त्याच्या आयुष्यातली पहिली जिंगल निर्मितीसाठी लिहिली होती. त्यानंतर माझा एक दुसरा मित्र आहे जळगावचा; पण तो आता मुंबईत स्थायिक आहे. मिलिंद जोशी जो आता मोठा संगीतकार आहे. त्याने त्याच्या आयुष्यातली पहिली जिंगल निर्मितीसाठी लिहिली होती; नंतर संजय गीते त्यानेसुद्धा त्याच्या आयुष्यातली पहिली जिंगल आपल्यासाठी लिहिली होती.

संजयजी- मला इथे एक सांगावसं वाटतंय की, आपण साधारण 350-400 जिंगल्स एकत्र केल्या आहेत. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे.

नंदनजी – हो नक्कीच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्या संगीतकारांमध्ये एक नाव घ्यायचं राहिलं ते मकरंद हिंगणे. ही खूप आधीची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांनीसुद्धा आपल्यासाठी काम केलं होतं. या सगळ्या ज्या 350-400 जिंगल्स केल्या त्यापैकी जवळ जवळ आपल्याला काही जिंगल्सला गेल्या 12 वर्षांपासून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. खूप वेगळ्या वेगळ्या धाटणीच्या जिंगल्स आपण केलेल्या आहेत. ज्या मुंबई-पुण्यातदेखील झाल्या नसतील. त्यांची कामं, स्टाईल वेगळी आहे; पण आपण जेवढ्या जिंगल्स केल्या आहेत आणि जेवढे पुरस्कार घेतले आहेत, जेवढे प्रयोग केले आहेत तेवढे मुंबई-पुण्यातही झाले नसतील.

निवेदिका – संजयजी तुमचा निर्मितीबरोबरचा काम करण्याचा अनुभव कसा होता?

संजयजी- अनुभव खूप उत्तम आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला लिबर्टी मिळते. जेवढा माझा माझ्यावर विश्वास नाही तेवढा निर्मितीचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे काम करायला मजा येते. कधी कधी माझी चिडचिड होते; कारण चाल नीट झालेली नसते; पण नंदनचं म्हणणं असतं की, छान झाली आहे. त्यावेळी मला असं वाटतं की, नंदनने अजून त्रास द्यायला पाहिजे मला. ज्यामुळे त्यातून अजून काहीतरी नवीन निर्माण होईल.

नंदनजी – आपल्याकडे चांगल्या गायक कलाकारांची वानवा आहे. त्यामुळे आपल्याला आणखी जे काही प्रयोग करायचे आहेत ते आपल्याला करता येत नाही. खरं तर नाशिकमध्ये गायक कलाकार निर्माण व्हायला हवेत.

संजयजी- आपल्याकडे यशोदा रावते, अभिजित पाटील, रवींद्र साठे, सुदेश भोसले, विठ्ठल उमप, माधुरी करमरकर, वैशाली सामंत, सावनी रवींद्र, मोना कामत, स्वप्निल बांदोडकर या दिग्गज मंडळींबरोबरच यशोधरा गोसावी, आज्ञा तुपलोंढे, भुषण कापडणे, संदीप थाटसिंगार, मिलिंद धटिंगण, गौरी कुलकर्णी आणि रागिणी कामतीकर अशा नाशिकच्या गायकांनी देखील आपल्याबरोबर काम केलेलं आहे. जिंगल करताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर व्हॉईस ओव्हर असतो. नुसतं गाणं असून चालत नाही तर व्हॉईस ओव्हरपण असावं लागतं. ज्यामुळे जिंगल अजून चांगली होते आणि ते काम जास्तीत जास्त नंदननेच केलं आहेच. हे मी वाचकांसाठी मुद्दाम सांगतो की, व्हॉईस ओव्हर करणं ही खूप अवघड गोष्ट आहे; कारण दीड ते दोन सेकंदांमध्ये तुम्हाला तो मेसेज दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त 5-6 सेकंदांच्या स्पेसमध्ये तो द्यावा लागतो. एका जिंगलसाठी आम्ही जवळ जवळ 10-12 टेक घेतो आणि ते सगळे परफेक्ट असत. त्यातूनही आम्ही चांगला निवडत असतो.

निवेदिका – जिंगलमध्ये व्हॉईस ओव्हरपण बीटमध्ये असावा लागतो का?

संजयजी- कसं असतं की, जिंगलचा जसा टेम्पो आहे त्या टेम्पोमध्येच तुमचा व्हॉईस ओव्हर असला पाहिजे. जर तुमची जिंगल फास्ट टेंपोची आहे आणि व्हॉईस ओव्हर जर स्लो असेल, तर ते मॅच होणार नाही. हे जे टेक्निक निर्मितीमध्ये डेव्हलप केलेलं आहे; त्यामुळे माझं काम लवकर होते.

नंदनजी – निर्मितीची एक पहिल्यापासून पद्धत आहे की, आपण प्रत्येक गोष्टीचं अ‍ॅप्रूव्हल घेऊन पुढे जातो. यात सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे , जी ग्राहकांना ती कळली पाहिजे की, याला अंडू नाहीये. कंट्रोल झेड नाहीये याला. मागे जाता येत नाही म्हणून स्टेपला अ‍ॅप्रूव्हल घेत घेत पुढे जावं लागतं; पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी किंवा जिंगल करणारे, म्युझिक डायरेक्टर, डायरेक्टर या सगळ्या लोकांची जी कल्पनाशक्ती असते त्या कल्पनाशक्तीपर्यंत आपण पोहोचतो तेवढा प्रत्येक ग्राहक किंवा इतर व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्या वेळेला आपण त्यांना जिंगल्सचे 2-3 ऑप्शन्स देतो.

संजयजी – आणि त्यापैकी कोणता ऑप्शन चांगला आहे हेही सांगतो. आपण त्यांना सजेस्ट करतो.

नंदनजी – हो नक्कीच…

निवेदिका – संजयजी तुमचा म्युझिक डायरेक्टर आणि अ‍ॅरेंजर म्हणून जो अनुभव शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद!

पुढचा विषय – जाहीरातीसाठीचे संगीत दिग्दर्शन 

क्रमश:

jahirat VIshwa

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.


वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१ Website – www.nirmitiadvertising.com