सर्वात वर

जाहिरात विश्व -एपिसोड २३

जाहीरातीसाठीचे व्हॉईस ओव्हर

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – अमिता आपटे (व्हॉईस ओव्हर कलाकार) आणि नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)

Amita Apte
Amita Apte

निवेदिका – गेल्या 12-15 वर्षांपासून निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करणार्‍या अमिता आपटेचं स्वागत. गेल्या अनेक वर्षांपासून तू निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंगबरोबर काम करत आहेस आणि मी उल्लेख केला की तू व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत आहेस; पण काही व्हिडिओ अ‍ॅडसही तू केलेल्या आहेस; तर हा सगळाच अनुभव, तुझ्या आठवणी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा मला असं सांग की, तू मुळात या क्षेत्रात कशी आलीस?

अमिता नंदन दीक्षित सरांची आणि माझी आधी थोडी ओळख होती, तर तेव्हा सर एक रेशीमगाठी नावाचा कार्यक्रम करत होते. साधारण 2005-2006 सालची गोष्ट आहे, नाशिक आकाशवाणीवर हा प्रोग्राम केला होता. त्यांना फिमेल फ्रेश व्हॉईस पाहिजे होता. त्यांनी सहज मला कॉन्टॅक्ट केला आणि एक छोटीशी व्हॉईस टेस्ट घेतली. त्यावेळी माझा आवाज खूपच बाळबोध असा होता; पण तरीसुद्धा त्यांना एकंदर माझ्या आवाजाची क्वॉलिटी आवडली; म्हणून त्यांनी मला तो प्रोग्राम करायला सांगितला. मी आणि सर म्हणजे मुलगा आणि मुलगी असा संवाद असलेला तो प्रोग्राम होता. त्यात 12-15 एपिसोडस होते. 6-7 महिने तो प्रोग्राम चालला. त्या प्रोग्रामपासून मी निर्मितीमध्ये आले आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून या क्षेत्रात माझी सुरुवात झाली.

निवेदिका –  आणि यानंतर मग तू जाहिराती आणि शॉर्ट फिल्म्सला व्हॉईस ओव्हर देणं हे सुरू केलंस.

अमिता– आपण जर ते एपिसोडस पुन्हा ऐकले तर आवाजाची जी माझी डेव्हलपमेंट झाली आहे ती प्रकर्षाने लक्षात येते. पहिला एपिसोड आणि शेवटचा एपिसोड यामध्ये अगदी ड्रास्टिक चेंज होता. मग नंतर सरांना असं वाटलं की, आता आपण हिला जाहिरातीसाठीसुद्धा आवाज ट्राय करून बघूयात आणि मग त्यांनी मला सांगितलं की, एक जाहिरात करूयात. म्हणजे रेशीमगाठी प्रोग्राम सुरू असतानाच मी एक जाहिरात केली. खरं सांगायचं तर माझा व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून जो प्रवास आहे, माझ्या आवाजाला ट्रेन केलंय, जे संस्कार केले आहेत ते नंदन सरांनीच केले आहेत. माझ्या आवाजाचं त्यांनी ट्रान्स्फॉरमेशन केलंय.

निवेदिका –  म्हणजे निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंगची ही निर्मिती आहे, असं म्हणायला हरकत नाही.

अमिता– अगदी ! माझा जो आवाज आहे, मी जे बोलते ते खरोखर निर्मितीची निर्मिती आहे.

निवेदिका –  निर्मितीची एकूण कामाची पद्धत याबद्दल काय सांगशील?

अमिता – एका शब्दात वर्णन करायचं झालं तर परफेक्ट. म्हणजे स्क्रिप्टपासून ते शेवटचं रेकॉर्डिंग होईपर्यंत अतिशय परफेक्टली सगळ्या गोष्टी छान बांधलेल्या असतात. म्हणजे मी ज्यावेळी तिथे जाते माझ्यासमोर स्क्रिप्ट रेडी असतं, जेवढे आर्टिस्ट असतात तेवढ्या कॉपीज् रेडी असतात. श्रोत्यांपर्यंत आपल्याला नक्की काय पोहोचवायचंय हे सरांच्या डोक्यात पक्कं असतं. त्याप्रमाणे आधी रिहलर्सल होते आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे मला सांगायला आवडेल की श्रोते जेव्हा रेडिओवर अ‍ॅड ऐकता तेव्हा ती फक्त 20 सेकंदांची असते; पण त्यासाठी आधी जवळ जवळ दोन दिवसांचे कष्ट असतात. म्हणजे आमचं रेकॉर्डिंग दोन तासांचं पण प्री प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन हा सगळा भाग या सगळ्या मेहनतीनंतर 20 सेकंदांची अ‍ॅड आकाराला येते. अ‍ॅड कशी असेल, काय मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे, त्याचं स्क्रिप्ट, प्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्शन, अ‍ॅडच्या मागे-पुढे म्युझिकचे कट काय टाकायचे या सगळ्या गोष्टी त्यांच्या इतक्या प्लॅन्ड् असतात की, असा कुठेच केऑस होत नाही आणि आम्ही आर्टिस्ट गेल्यानंतर उगाचच वेळ गेलाय, थांबावं लागतंय असं होत नाही.

निवेदिका –  म्हणजे लाईन ऑफ अ‍ॅक्शन तयार असते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कामाचं समाधान नक्कीच मिळत असणार आहे. मग आता व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून या क्षेत्रात येण्यासाठी बरीच तरुण मंडळी धडपड करत असतात, तर त्यांना तू काय सांगशील? व्हॉईस ओव्हर आर्टिस्टकडे काय क्वॉलिटीज् असल्या पाहिजेत.

अमिता– सगळ्यात महत्त्वाचं एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून मी एक सांगते की, आता आपण जाहिरातीबद्दल बोलतोय म्हणून जाहिरातीशी रिलेटेड सांगते की, जेव्हा तुम्ही टीव्हीवर अ‍ॅड बघता तेव्हा तुम्हाला एक चित्र दिसतं. कुणीतरी हलतंय, बोलतंय, एखादी वस्तू असते, माणसाचे एक्सप्रेशन असतात; पण तीच अ‍ॅड तुम्ही जेव्हा ऑडिओला ऐकता, म्हणजे रेडिओवर ऐकता तेव्हा तो श्रोत्यांपर्यंत फक्त आवाज जातो. तुमच्या आवाजातून एक पूर्ण गोष्ट तुम्हाला उभी करायची असते किंवा एखाद्या स्पेसिफिक प्रॉडक्टची अ‍ॅड करत असाल तर ते प्रॉडक्ट श्रोत्यांपुढे उभं राहिलं पाहिजे. तुमच्या आवाजाची महत्त्वाची क्वॉलिटी असली पाहिजे की, तुम्ही ते स्पेसिफिक चित्र त्यांच्यापुढे उभं करता आलं पाहिजे. आवाजातून तुम्हाला अभिनय करायचा असतो; परंतु अभिनय करतानासुद्धा तुम्ही ओव्हर अ‍ॅक्टिंग करताय, असं अजिबात व्हायला नको. एखाद्या वेळी तुमच्या मनातल्या भावना पोहोचवता पोहोचवता वाहावत जाऊन ओव्हर अ‍ॅक्टिंग होऊ शकते. ब्रीफ, प्रिसाईझ, स्पेसिफिक कंटेंट तुम्हाला पोहोचवायचा आहे तो श्रोत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.

निवेदिका – मला एक खूप महत्त्वाचा उल्लेख करायचाय की, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये ऑडिओबरोबरच तू व्हिडिओ अ‍ॅडस्पण केलेल्या आहेत. त्यातली राजहंस अ‍ॅक्वा ही तुझी पहिली अ‍ॅड होती. त्याचा थोडा अनुभव सांग ना…

अमिता– तू मला खूप मागे घेऊन गेलीस एकदम. खरं तर त्या अ‍ॅडसाठी सर माझं सिलेक्शन करतील, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी जेव्हा ती अ‍ॅड केली त्याआधी रेशीमगाठी आणि एक-दोन अ‍ॅडस् मी केल्या होत्या. त्यामुळे मी अ‍ॅज अ व्ही. ओ. आर्टिस्ट म्हणून तेव्हा तयार होत होते आणि अचानक सरांनी मला कॅमेरासमोर उभं केलं. अक्षरश: कॅमेर्‍यात बघायचं कुठे इथपासून माझी सुरुवात होती. तो अनुभव माझ्यासाठी लाईफ टाईम मेमरी असते त्यातला होता. त्या अ‍ॅडची मजा अशी होती की, दोन सिझनमध्ये ती अ‍ॅड शूट केली होती. त्यात उन्हाळा आणि पावसाळा असे दोन सिझन दाखवायचे होते. आम्ही आधी एक शूट उन्हाळ्यात केलं आणि त्यानंतर असं हवं होतं की, पाऊस पडतोय म्हणजे आजूबाजूला ग्रीनरी हवी होती आणि म्हणून त्याचाच दुसरा पार्ट आम्ही पावसाळ्यात शूट केला. तो खूप छान अनुभव होता माझ्यासाठी. त्यातून मला खूपच शिकायला मिळालं. म्हणजे जाहिरातीची ऑडिओ आणि व्हिडिओ ही दोन्ही माध्यमं इक्वली महत्त्वाची आणि मोठी आहेत. त्यापैकी व्हिडिओ माध्यमात कसं काम केलं पाहिजे हे मी त्यातून शिकले.

निवेदिका –  म्हणजे ऑफ स्क्रिन सोबतच तू ऑन स्क्रिनसमोरही काम करण्याचा अनुभव तुला निर्मितीमध्ये मिळाला. शेवटी तुझे मी आभार मानते. धन्यवाद!

पुढचा विषय – टेलिव्हिजन जाहीराती १   

                        क्रमश                                                                                                                                                                  

jahirat VIshwa

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.

या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com

                                                          :