सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड ३३

Advertising World

टेलिव्हिजन कॅमेरा वर्क भाग १

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – प्रशांत कुलकर्णी (ज्येष्ठ कॅमेरामन DOP), नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग), निवेदिका – किशोरी कुलकर्णी

निवेदिका – प्रशांतजी, गेली अनेक वर्षं तुम्ही स्वत: व्हिडिओ जाहिराती करत आहात, तर त्यासाठी विशिष्ट कॅमेरामन असतो का?

प्रशांतजी- हो. सर्वसाधारण असं असतं की, सर्वसामान्यांच्या दृष्टीने कॅमेरामन म्हणजे एखादा इव्हेंट किंवा एखादा समारंभ, सेमिनार, वर्कशॉप हे होत असतं तेव्हा डॉक्युमेंशन करण्यासाठी कॅमेरामन बोलावतात. तो सगळा इव्हेंट शूट करतो; पण ठराविक जाहिरात, (Advertising World) सीरिअल, सिनेमा यासाठी जी कामं करतो तो वेगळ्या प्रकारचा असतो. त्याला स्पेशल नॉलेज असतं, त्याचा अभ्यास असतो. त्या अभ्यासातून त्याची पद्धत तयार झालेली असते. त्यातून तो सगळं लक्ष ठेवत असतो.

नंदनजी- कॅमेरामन पुढे जाऊन त्याची एक पद्धत डेव्हलप करतात. म्हणजे जाहिरात, सीरिअल, सिनेमा पाहिल्यावर कळतं की, हाच कॅमेरामन असला पाहिजे. इतकी त्याची पद्धत डेव्हलप झालेली असते.

निवेदिका – म्हणजे एखाद्या गायकाची गायकी जशी लोकांच्या स्मरणात राहाते, त्यांची शैली डेव्हलप झालेली असते. तसंच कॅमेरामन हा पण कलाकार असतो. त्याची विशिष्ट शैली तो त्याच्या ज्ञानातून, अनुभवातून विकसित करत असतो.

प्रशांतजी- कॅमेरा वर्क ही एक संकीर्ण कला आहे. म्हणजे त्याला फक्त छायाचित्रण करण्याचं तांत्रिक ज्ञान असून चालत नाही. तो चांगला चित्रकार असेल तर खूपच चांगलं. म्युझिक सेन्स पाहिजे. अ‍ॅस्थेटिक सेन्स पाहिजे. सौंदर्य दृष्टिकोन पाहिजे. चांगले जे दिसतंय ते टिपण्याची त्याच्याकडे उत्सुकता पाहिजे, आवड पाहिजे. आवड असेल तर तो चांगला परिणाम छायाचित्रणातून देऊ शकतो. एखादा समारंभ, सेमिनार याचं छायाचित्रण करणार्‍यांकडे एखादा उद्देश नसतो. त्यांना माहीत असतं हा एक इव्हेंट शूट करायचाय. स्क्रिप्ट नसतं. हॉलमध्ये जे उपलब्ध लाईटिंग असतं त्यात तो शूट करतो. त्याचं चित्रीकरण करतो आणि त्यांना देतो.

निवेदिका – म्हणजे जे काय समोर घडतंय ते कॅमेरामध्ये चित्रीत करणं, एवढाच उद्देश असतो.

प्रशांतजी- पण जेव्हा तुम्हाला जाहिरातीचं चित्रीकरण करायचंय, सीरियलचं करायचंय, तर त्या कॅमेरामनच्या मागे एक मोठी यंत्रणा उभी असते. उदा. स्क्रिप्ट, जागा, उत्तम लाईटिंग, कुठल्या प्रकारचा कॅमेरा वापरता, तो अत्याधुनिक असावा. जेणेकरून ती जाहिरात कुठे दाखवणार आहात, तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे, हे सगळं बघून त्याचं काम तिथ होत असते आणि यासाठी जेवढा दिग्दर्शक महत्त्वाचा तेवढाच कॅमेरामन महत्त्वाचा असतो. दोघांमध्ये समन्वय होणं खूप गरजेचं आहे.

निवेदिका – म्हणजे शूटिंग सुरू होण्यापूर्वी कॅमेरामनने स्वत:चा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.

नंदनजी- मला असं सांगायचंय की, एखादे प्रॉडक्शन करायला घेतलं, तर दिग्दर्शक जसा कलाकार डोळ्यासमोर आणतो, तसा पहिला कॅमेरामन नक्की करतो. तो ठरवतो हा कॅमेरामन या प्रॉडक्शनसाठी पाहिजे; कारण त्या त्या गोष्टींची त्यांची खासियत असते. दोघांचा समन्वय झाल्यावर पुढचं प्रॉडक्शन सुरू होतं.

प्रशांतजी- म्हणजे दिग्दर्शक-कॅमेरामन ट्युनिंग असणं फार महत्त्वाचं आहे. उदाहरण म्हणजे राज कपूरचा जो कॅमेरामन होता राघू कर्मकार. त्या दोघांची इतकी ट्युनिंग होती की, तो शेवटपर्यंत राज कपूरसाठी काम करत राहिला. दिग्दर्शकाला काय हवंय हे त्याच्याशी बोलतानाच कॅमेरामनला कळून जातं. ट्युनिंग असते तेव्हा फिल्म खूप छान होते.

निवेदिका – एडिटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय?

प्रशांतजी- एडिटरच्या दृष्टीने शूटिंग करणे म्हणजे काय तर एखादा व्यक्ती रस्त्याने जात आहे, असा शूट घेतला. तो लांबच्या शॉटमध्ये घेतला. लांबचा शॉट म्हणजे तो माणूस पूर्णपणे त्यात दिसतो. पुढचा शॉट मला एक माणूस येतो आणि त्याला शेकहँड करतो असा हवा असेल तर मी तो एडिटरच्या दृष्टीने त्या शॉटमध्ये घेईलच; पण मी त्याच्या मागे जाईन आणि तो चालताना त्याची सलगता तो माणूस, हे दोघे मला दिसतील. त्याच्या मी उजव्या खांद्यावरून शूट करत असेन तर तिकडच्याही व्यक्तीच्या समोर जाऊन त्याच अँगलने शूट करून ही व्यक्ती समोरून चालत येतोय हे शूट करेन. तसेच शेकहँडचा क्लोज-अप येणं आवश्यक आहे. म्हणजे ही चार शॉटची कंटिन्यूटी एकत्र होऊन शेकहँडचा परिणाम साधला जाईल. तसं एका शूटमध्येही हे घेता येईल; पण दृश्य परिणामकारकता दाखवण्यासाठी आपण हे वेगवेगळे शॉट घेतो यालाच एडिटरच्या दृष्टीने शूटिंग करणं म्हणतात.

नंदनजी- थोडक्यात सर्वसामान्य माणसाला उघड्या डोळ्यांनी जे दिसतं, जे त्याला जाणवतं, भासतं, ते भासवण्याचा सायकॉलॉजीकल परिणाम होईल अशा पद्धतीचं शूटिंग करणारा कॅमेरामन हा सर्वोत्कृष्ट ठरतो.

निवेदिका – टीव्ही, व्हिडिओ जाहिरात बघताना 20-30 सेकंदांची जाहिरात दिसत असते; पण त्याच्यामागे इतकी टिम कार्यरत असते. इतकंच नाही तर कॅमेरामनचंही मोठं योगदान या प्रक्रियेमध्ये असतं.

नंदनजी- हे सगळं आपण बघतो त्यावेळी आपण स्वत: त्यात इतकं समाविष्ट झालं पाहिजे की, आपणही त्या कथेचा एक भाग आहोत, असं जाणवलं पाहिजे. अशा पद्धतीचं शूटिंग, कॅमेरा शूटिंग, एडिटिंग झालं पाहिजे. या सगळ्यांचा चांगला समन्वय होतो त्यावेळी उत्तम गोष्ट तयार होते. त्याला आपण स्वीकारतो.

निवेदिका – जेव्हा एखादी व्हिडिओ जाहिरात (Advertising World) करायची असते तेव्हा कॅमेरामन हा किती महत्त्वाचा असतो हे कळतं.या अनुषंगाने नंदनजी तुमच्याकडे किस्सा आहे का?

नंदनजी- दागिन्याची जाहिरात करायची होती. त्यांचे दागिने हे सगळ्यांमध्ये उठून दिसतात, असा विषय होता. जाहिरात करताना मोठे परिश्रम करावे लागतात. त्याची थीम काय तर मुंबईतल्या शिवाजी टर्मिनस म्हणजे व्हिटी स्टेशनच्या बाहेर गर्दीत ते मॉडेल पूर्णपणे शालू नेसून, दागिने घालून चालत बाहेर पडत आहे, असे दाखवायचे होते. आम्ही समोरच्या कॅपिटल सिनेमाच्या समोर कॅमेरा लावून त्या गर्दीचं शूटिंग केलं आणि त्याच्यात सगळ्या गर्दीत ते मॉडेल कसं उठून दिसतं, दागिने कसे उठून दिसतात हा एक वेगळा अनुभव आम्हीदाखवला.

निवेदिका – वैशिष्ट्यपूर्ण थीम असल्याने त्यावेळी कॅमेरामनचं पण कौशल्य पणाला लागलं असणार !

नंदनजी- हो आणि आम्हाला खूप प्रीकॉशन्स घ्याव्या लागल्या; कारण ती प्रसिद्ध मॉडेल होती. तिच्या अंगावर दागिने होते, तर त्या गर्दीत तिच्या बाजूने आमची 4-5 माणसं पेरलेली होती. जी तिला संरक्षण देत चालली होती; पण हे दिसलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून उत्तम शूटिंग करणे हे महत्त्वाचं काम कॅमेरामनचं असतं; शिवाय हा शॉट परत करणे खूप अवघड आहे. परत तिला चालत आणणे, परत शूट घेणं अवघड आहे. त्यामुळे मला शॉट एकदाच मिळणार आहे हे भान कॅमेरामनला पाहिजे. आवश्यक तो परिणाम देणे, झूम करणे, फ्रेम उत्कृष्ट असणे, लुकिंग रूम देणे ह्या टेक्निकल गोष्टींचा अभ्यास असणे गरजेचे असते.

निवेदिका – म्हणजे अनेक जाहिराती अशा असतात की, ज्या एका टेकमध्ये ओके व्हायला लागतात. अशावेळी कॅमेरामन ज्ञानी, अनुभवी, तोलामोलाचा असावा.

पुढचा विषय – टेलिव्हिजन कॅमेरा वर्क भाग २ (क्रमशः)


टिप –(Advertising World) सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी
खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

jahirat VIshwa

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१ प्रशांत कुलकर्णी – ९४०३७ ७४६८२
Website – www.nirmitiadvertising.com