सर्वात वर

जाहिरात विश्व (Advertising World)- एपिसोड २५

टेलिव्हिजन जाहिराती

(Advertising World)

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

Jahirat Vishwa - Television Advertising

(Advertising World)

निवेदिका- म्हणजे हे माध्यम वापरून ज्यावेळी जाहिराती करायच्या असतात त्यावेळी बारीकसारीक गोष्टींचासुद्धा विचार त्यामध्ये झाला पाहिजे;  तरच तुमचं प्रॉडक्ट योग्यरित्या आणि प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल.

1959 साली प्रायोगिक तत्त्वावर फक्त दिल्लीपुरतीच सुरू केलेली टेलिव्हिजनची सेवा आज भारतातल्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचली आहे. आज एकही घर असं नाही की टेलिव्हिजन नाही. मग हे माध्यम जाहिरात (Advertising World) करण्यासाठी किती महत्त्वाचं आणि फायदेशीर असणार हे लक्षात येते. आपल्या कार्यक्रमात आपण सातत्याने सांगतो की, प्रभावी जाहिरात करण्यासाठी पहिली पायरी असते ती योग्य आणि परिणामकारक कॉपीरायटिंगची आणि टेलिव्हिजन या माध्यमासाठी जाहिरात करताना त्याला आपण स्क्रिप्ट राईटिंग असं म्हणतो, तर याचं महत्त्व काय आहे?

नंदनजी- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं भान. हे स्क्रिप्ट रायटरला ठेवणं आवश्यक आहे. 30 किंवा 20 सेकंदामध्ये डॉयलॉग ऑर व्हाईस ओव्हर बसवणं त्या संपूर्ण जाहिरातीचा आशय, त्याचे यूएसपी आणि या व्यतिरिक्त फोननंबर, पत्ता, प्रॉडक्टविषयीची माहिती हे सगळं त्यात बसवणं याला फार अभ्यास करावा लागतो. खूप वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारे सर्च स्क्रिप्ट लिहिल्यानंतर फायनल स्क्रिप्ट बनतं.

निवेदिका- म्हणजे स्क्रिप्ट रायटरलासुद्धा खूप अभ्यास करावा लागतो.

नंदनजी- तीन-चार वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रिप्ट कधी कधी 10-12 वेळा त्याला ते लिहावं लागतं. तेव्हा ते कमीत कमी शब्दांमध्ये आणि सेकंदामध्ये ही सगळी स्क्रिप्ट तो बसवतो.

निवेदिका- वेळेची मर्यादा असल्यामुळे नेमके प्रभावी आणि योग्य शब्दच निवडणं जास्त महत्त्वाचं असतं आणि हेच स्क्रिप्ट रायटरचं कसब असतं, असं मला वाटतं.

नंदनजी- यासाठी त्याचं भाषेवर प्रभुत्व असायला हवं. शब्दांचं भांडार त्याच्याकडे पाहिजे आणि अनुभव पाहिजे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की, पहिल्या तीन-चार सेकंदांमध्ये रेडिओची जाहिरात असेल, तर श्रोत्यांचं किंवा टेलिव्हिजनची जाहिरात असेल, तर प्रेक्षकांचं लक्ष केंद्रीत करता आलं पाहिजे. तो एका वेगळ्या मूडमध्ये असतो श्रोता, प्रेक्षक. तो आधीच्या जाहिराती बघत असेल, आधीचा प्रोग्रॅम बघत असेल किंवा कोणाशी फोनवर बोलत असेल किंवा घरात गप्पा मारत असेल, या सगळ्या गोष्टीतून त्याचं लक्ष केंद्रीत करणं हे पहिल्या तीन-चार सेकंदांचं काम; तर हा जो सगळा अभ्यास आहे हा अनुभवातून येत असतो. ज्याप्रमाणे आपल्या घरातील लहान मुलं त्यांना जर एखादी गोष्ट आई किंवा बाबांना, आजी-आजोबांना सांगायची असेल, तर ते पहिले त्याच्याकडे लक्ष केंद्रीत करून घेतं. मग ती गोष्ट त्यांना दाखवतात किंवा सांगतात. असाच काहीसा प्रकार या स्क्रिप्टचा असतो.

निवेदिका- आणि म्हणूनच कोणतीही जाहिरात लक्षवेधी झाली तरच ती ग्राहकांवर परिणाम करू शकते. मग अशावेळी स्क्रिप्ट रायटिंग करताना कोणत्या ठळक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे ?

नंदनजी- प्रॉडक्टची सगळी सविस्तर माहिती स्क्रिप्ट रायटरने घेतली पाहिजे. त्या प्रॉडक्टसारखी आणखी किती सिमिलर प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या जाहिराती कशा पद्धतीने चालू आहेत, कुठल्या प्रकारे चालू आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. त्यापेक्षा वेगळी थिम घेऊन जर स्क्रिप्ट केली तर ती जास्त प्रभावी जाहिरात होऊ शकते, हटके होऊ शकते. त्याची भाषा अतिशय सोपी असावी, साधी असावी. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांना समजेल अशी भाषा असेल, तर कुठल्याही माणसाला आकलन करायला सोपी जाते.3

निवेदिका- कारण टेलिव्हिजन हे माध्यम असं आहे की, ते कोणत्याही घरात असतं. मग तो माणूस ग्रामीण असो किंवा शहरी असो.

नंदनजी- त्याचबरोबर नेहमीच्या वापरातले शब्द त्या स्क्रिप्टमध्ये असतील, खूप अलंकारी भाषा नसेल तर ती आणखीन समजायला सोपी जाते. त्याच्या व्यवहारातले शब्द असतील तर त्याला ते पटकन समजतात. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ती बोलीभाषा असावी,  पुस्तकी नको, लेखी नको. बोलीभाषा असेल तर आपण कशा गप्पा मारतो त्या पद्धतीची जर ती जाहिरात वाटली तर ती त्याला पटकन आपलीशी वाटते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या जाहिरातीशी दर्शक पटकन रिलेट होतो आणि म्हणून ती ग्राहक म्हणूनसुद्धा त्या प्रॉडक्टकडे लवकर आकर्षित होतो.

निवेदिका- नंदनजी बर्‍याचदा आपण बघतो की, मार्केटमध्ये एका प्रकारची अनेक प्रॉडक्टस् उपलब्ध असतात किंवा एखादं नवीन प्रॉडक्ट लाँच करायचं असतं तेव्हा किंवा ऑलरेडी एस्टॉब्लिश असलेल्या प्रॉडक्टची नवीन प्रकारे जाहिरात करायची (Advertising World)असेल अशा दोन्ही वेळेस स्क्रिप्ट करताना काही फरक असतो का?

नंदनजी- प्रॉडक्ट जर प्रसिद्ध असेल तर त्याचं स्क्रिप्ट आणि त्याचा बाज वेगळा ठेवावा लागतो. नवीन प्रॉडक्ट असेल, तर त्याचा बाज आणि त्याचं स्क्रिप्ट वेगळं असतं. 30-20 सेकंदांमध्ये संपूर्ण आशय लोकांसमोर मांडता आला पाहिजे असं स्क्रिप्ट पाहिजे. याचबरोबर स्क्रिप्ट करताना कॉन्स्पेक्ट काय केली आहे, याचा अभ्यास करून त्या कॉन्स्पेक्टला धक्का न लावता 2-3 ऑप्शन्स स्क्रिप्ट राईटर करत असतो किंवा त्याने केले पाहिजेत. त्यातून प्रॉडक्शन टिम ठरवते की, हे योग्य आहे. हे करता येणं सोपं आहे किंवा वेगळं आहे. अशा पद्धतीने ते ग्राहकासमोर जातं.

निवेदिका – म्हणजे अशी ती प्रोसेस असते.

नंदनजी- यामध्ये आणखी एक प्रोसेस फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेस ग्राहक एखादी थिम सिलेक्ट करतो की, या थिमवर आपण जायला पाहिजे. मग प्रॉडक्शनची टीम जेव्हा स्क्रिप्ट रायटरला ब्रीफ देते; त्यानंतर सगळ्यात पहिले वन लाईन बनते. वन लाईन म्हणजे एक गोष्ट असते. त्या गोष्टीत सगळा आशय साठवलेला असतो. त्या गोष्टीचे 3-4 ऑप्शन्स बनतात. त्यातली एखादी गोष्ट निवडली जाते, त्या गोष्टीवरून खरं मास्टर स्क्रिप्ट तयार होतं. त्या स्क्रिप्टमधून जेव्हा स्क्रिप्ट सिलेक्ट होतं आणि जेव्हा फायनल होतं त्यावेळेला प्रॉडक्शनची टीम त्या स्क्रिप्टला स्टोरी बोर्डमध्ये कन्व्हर्ट करते.

स्टोरी बोर्ड म्हणजे उजव्या बाजूला सगळा ऑडिओ असतो; ज्याने स्क्रिप्ट लिहिलेली असतं ते आणि डाव्या बाजूला त्या स्क्रिप्टमधल्या एका वाक्याला काय शॉट असेल, कुठलं चित्र असेल त्या त्या प्रमाणे तिथे तिथे त्याचा क्लोजअप आहे का, त्याचा लाँग-शॉट आहे का, मिड शॉट आहे का, प्रॉडक्ट कुठे येणारआहे,  कॉम्प्युटर ग्राफिक्स कुठे होणार आहेत, त्याचं नाव कुठे येणार आहे, या सगळ्या गोष्टींचं एक पूर्ण चित्र कागदावर तयार होतं. त्यावरून आपण शूटिंग जेव्हा करतो त्यावेळी त्या संपूर्ण टीमकडे त्याची एक एक कॉपी असते. सगळ्यांना माहीत असतं की, आता हा शॉट अशा पद्धतीने करायचा आहे. थोडक्यात काय जेव्हा एखादं प्रॉडक्शन बनवायचं असेल, त्याचं जर पेपर वर्क पक्कं असेल, तर आपल्याला कुठेही अडचण येत नाही आणि काम चपखल होतं. क्वॉलिटी प्रॉडक्ट मिळतं.

निवेदिका- म्हणजे एका योग्य दिशेनेच सगळी प्रॉडक्शन टीम काम करत असते आणि या सगळ्याचा एडिटिंगला नक्कीच फायदा होत असेल.

नंदनजी- नक्कीच फायदा होतो. तो स्टोरी बोर्ड एडिटरच्यादेखील डेस्कवर असतो. कधीतरी असं होतं, आर्टिस्ट छान प्रगल्भ असेल, त्याने खूप चांगला विचार केलेला असेल, डायरेक्शन असेल, कधी कधी लोकेशनवर अशी एखादी छान कल्पना सुचते, तर मग तेवढ्यापुरता बदल करण्यासाठी तिथे वाव असतो आणि त्यातून जे चांगलं निघत असेल, तर करायला काही हरकत नसते; पण बेसिक तुमचं पेपर वर्क चांगलं पाहिजे.

निवेदिका- स्क्रिप्ट रायटिंग हा सगळ्याचा पाया आहे,असं म्हणायला हरकत नाही. वाचकांना हे नक्कीच समजलं असेल की, टेलिव्हिजनवर जाहिरात करताना स्क्रिप्टचं किती महत्त्व आहे आणि ते कसं योग्य आणि प्रभावीपणे केलं पाहिजे. नंदनजी तुम्ही कोणता किस्सा आम्हाला सांगणार आहात या विषयीचा.

नंदनजी- अगदी गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे, जिंगल लिहिणारा जो वर्षानुवर्षे माझ्यासाठी जिंगल लिहितो, त्याला मी आमच्या नेहमीच्या ग्राहकासाठी एक वेगळ्या प्रकारची जिंगल लिहायला सांगितली; नंतर तो आजारीच पडला. म्हणजे एक-दोन महिने तो उठायची शक्यता नव्हती. या स्क्रिप्ट रायटरला दुसरा पर्याय सध्या तरी माझ्याकडे नव्हता. आमचा म्युझिक डायरेक्टर आणि मी तो जिंगल लिहिणारा उभा राहीपर्यंत ग्राहकाला काहीतरी देऊया, असं म्हणून आम्ही स्वत: स्क्रिप्ट लिहायला घेतली.

आमच्या 2-4 मिटिंग झाल्या आणि त्या मिटिंगमध्ये आमच्याकडून एक स्क्रिप्ट चांगलं लिहिलं गेलं आणि ते आम्ही ग्राहकाला पाठवल्यानंतर लगेचच ते सिलेक्ट झालं आणि त्याची चांगली जिंगल तयार झाली. त्या स्क्रिप्टला चांगलं म्युझिक दिलं गेलं. जो आशय आम्हाला पाहिजे, ज्या मीटरमध्ये पाहिजे त्या मीटरमध्ये बसवून उत्तम जाहिरात तयार झाली आणि गेल्या वर्षी त्या जाहिरातीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.

निवेदिका- म्हणजे बर्‍याचदा ध्यानीमनी नसतानासुद्धा अशा काही चांगल्या गोष्टी घडून जातात.

नंदनजी- 25 वर्षांचा अनुभव आहे. तो इथे कामाला आला असं मला वाटतं.

निवेदिका- अतिशय वेगळा अनुभव या निमित्ताने तुम्ही शेअर केलात आणि असं म्हणायला हरकत नाही की, बरेचसे मोठे मोठे कलाकारसुद्धा रिप्लेसमेंटमधूनच घडलेले आहेत. हासुद्धा असाच किस्सा म्हणावा लागेल की, एक नवीन स्क्रिप्ट रायटर तुमच्याकडे या निमित्ताने तयार झाला असणार. धन्यवाद!

पुढचा विषय – टेलिव्हिजन जाहीराती ३  (Advertising World)

 (क्रमश:)

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

jahirat VIshwa

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com