सर्वात वर

स्टार प्रवाहवरील मालिका पाहून हुबेहुब केलं लेकीचं बारसं

‘मुलगी झाली हो’ मालिकेची लोकप्रियता महाराष्ट्राच्या घराघरात

 मुंबई – मालिका आणि त्यामधील पात्र ही प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. त्या पात्रांच्या सुख-दु:खात प्रेक्षक अगदी समरसून जातात. याचच बोलकं उदाहरण म्हणजे मुंबईतील गोरेगाव मध्ये रहाणारं साटेलकर कुटुंब. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) सर्वच मालिका ते आवर्जून पहातात. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका त्यांच्या अत्यंत आवडीची आहे.

काही दिवसांपूर्वीच मालिकेत माऊच्या बारश्याचा प्रसंग दाखवण्यात आला. माऊचे बाबा म्हणजेच विलास पाटील यांना आपली चूक उमजल्यानंतर खुल्या दिलाने त्यांनी माऊचा स्वीकार केला. इतकंच नाही तर तिला घरात हक्काचं स्थान देत तिचं साजिरी असं नामकरणही केलं. मालिकेतला हा भावनिक प्रसंग अंगावर रोमांचं उभं करणारा होता. साटेलकर दाम्पत्याला काही दिवसांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला. मालिकेतल्या माऊच्या बारश्याच्या प्रसंगाने ते इतके भारावून गेले होते की मालिकेप्रमाणेचे अगदी हुबेहुब दिवे उजळून त्यांनी आपल्या लेकीचं नामकरणही साजिरी असं केलं.

मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या किरण माने यांना साटेलकर कुटुंबाने बारश्याचे खास फोटो पाठवले. हे फोटो पाहून किरण माने भारावून गेले. आपला एखाद्या एपिसोडचा किंवा सीनचा एवढा प्रभाव पडावा हे खूप आनंद देणारं आहे. आता आयुष्यभर जेव्हा जेव्हा या गोड गोजिरीला तिच्या नावाविषयी विचारलं जाईल तेव्हा तेव्हा स्टार प्रवाहवरील (Star Pravah) मुलगी झाली हो मालिकेची आठवण निघत राहिल. हे सर्व भारावून टाकणारं आहे अशी भावना अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केली.