सर्वात वर

असिमरेखा…

पल्लवी पटवर्धन

क्षितिजा कडे एकटक बघत असतांना….

अचानक एक वा-याची झुळुक मनाला हेलावुन गेली किती काळ उलटला तरी तो प्रवाह अजुन तसाच….

मी थोडीशी दचकले खुप दिवसांनी माझं मन हललं होत. कोरड्या, शुष्क वलयात ते घिरट्या घालत होते.. ती मीच होते ना..! का माझं अपुर्णंत्व डोकावत होत माझ्या आत..

माझ्या डोळ्यापासुन अंतरंगातला प्रवास.. ह्या चळवळींना ,ह्या हालचालींना मी कसे सुसह्य करु…पुर्णत्वाकडे जाण्याची ओढ… तिथल्या तिथेच वळसे घेणारं हे मनं..

त्याचा वर्षांनवर्षांचा तोच लंपडाव.. काही वेळा जाणवतं कि माणुस खुप वरवर जगत असतो… डोळ्यांना दिसेल त्या भौतिक गोष्टींना भुलतो … आत अंतराळात चाचपडायला कोणालाच वेळ नसतो… नाही त्या गोष्टींना खूप महत्त्व देतो…

नको त्या गोष्टींच्या मागे धावत रहातो लांब लांब पर्यंत मृगजळामागे… वास्तव खुप भयंकर असतं .. पण तो विरुद्ध गोष्टींना मुलामा देत रहातो… खुप चढाओढ आहे प्रत्येक मार्गावर, सतत खच्चीकरण या ना त्या पद्धतीने…

मानसिक ओढाताणीत सुकणं आणि सुकुन मिळणं यातलं मग अंतरच गवसत नाही … खुप गोंधळ आहेत… अति चांगल शोधण्याच्या नादात खुप चांगलं आपण हरवुन बसतो…अती सजावटीकडे धावतो कारण त्या गोष्टी मोहीत करत असतात ..पण त्या किती उथळ असतात याचा थांग लागण्याच्या आधिच माणुस भरकटलेला असतो…

जे स्वच्छ आणि नितळ असतं ते ओळखण्यासाठी सुध्दा साधना लागते… दिर्घकाळ टिकणार चिरकाल सुख …

आपल्याला जेवढं कळतं तिथपर्यंतच ठिक त्यापलिकडे ना कधी डोकावायचे ना कधी शोध घ्यायचा … आत जेव्हा कंपार्टमेंट करता नाही येतं तेव्हा फक्त आत थप्प्या पडतात… मग ती बाराखडी एकत्र बाहेर येते… वेगवेगळ्या आकारात … न संपणारं स्टोरेज…

काहींना अती गती असते …काही अगदीच मंद… परिस्थितीनुरुप बाहेर पडतात …पुर – महापुर येतात… काही तिथेच थांबतात काही चालत रहातात …

माणसं हि येतात .. निघुन जातात .. काही टिकतात ..काहींना टिकावच लागत नाही … ह्या अमुर्त स्वरुपातलं क्षणिक जीवन अनेक भिंती फोडत पुढे जातं तेव्हा त्याला सकारात्मक रस्ता पायाला जाणवायला लागतो….

जो अनंत आवरणं छेदुन गवसलेला असतो… ज्याला एक विस्तीर्ण आयाम असतो…न संपणारी असिमरेखा…

Pallavi-Patwardhan
पल्लवी पटवर्धन