सर्वात वर

‘भारूडरत्न’निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन

मुंबई – ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने राज्यभर प्रसिद्ध झालेले सुप्रसिद्ध लोककलावंत ‘भारूडरत्न’ निरंजन भाकरे (Niranjan Bhakre) यांचे शुक्रवारी कोरोनाने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.काही दिवसापासून औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

निरंजन भाकरे (Niranjan Bhakre) यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली.वडिलांकडून त्यांना भजन या भारुडाचा वारसा मिळाला.वडिलांच्या निधना नंतर त्यांना जगण्य्साठी मोठा संघर्ष करावा लागला. निरंजन भाकरे खासगी कंपनीत कामगार होते. लोककलेचे अभ्यासक अशोक परांजपे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना सोंगी भारुड’ सादरीकरणाची संधी मिळाली. काही वर्षांतच भाकरे नावारुपाला आले. त्यांचे देश-विदेशात कार्यक्रम सादर झाले. निरंजन भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी आजही चर्चेत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली. 

Bharudkar Niranjan Bhakre Passed Away

‘बुरगुंडा होईल बया गं’ असे भारुड ऐकले की, निरंजन भाकरे (Niranjan Bhakre) आठवल्याशिवाय राहत नाहीत. भारुडाला जिवंत ठेवणारा हा गुणी कलावंत नेहमी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत आले. ‘व्यसनमुक्ती पहाट’ कार्यक्रमातून चार वर्षे त्यांनी जनजागृती केली. त्यांनी ‘मराठी बाणा’, ‘लोकोत्सव’ कार्यक्रम गाजविले. टीव्ही शो, वेरूळ-अजिंठा महोत्सव, लोकगाथा अशा कार्यक्रमात भाकरे यांचे भारुड सादरीकरण गाजले होते. सोंगी भारुडासाठी भाकरे राज्यभर परिचित झाले होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.  

लोककला सादरीकरणासह नवीन कलाकार घडविण्यासाठी भाकरे (Niranjan Bhakre) सक्रिय झाले होते.काही संस्थांचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ते योगदान देत होते.त्यांचं मुळगाव असलेल्या रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथे लोककला प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. या माध्यमातून लोककला क्षेत्रात योगदान देता येईल, असे त्यांनी सांगितले होते. दुर्दैवाने, भाकरे यांचे स्वप्न अपूर्ण राहिले