सर्वात वर

रेमडिसिव्हीर इंजेक्शन वाटपाचा भुजबळांनी केला पर्दाफाश

अन्न आणि औषध प्रशासनाची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून झाडाझडती

नाशिक- नाशिक मध्ये रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. रेमडिसिव्हीर मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईकांना वणवण भटकावे लागते आहे असे चित्र सर्वत्र आहे. नुकतेच रुग्णांच्या नातेवाईकांनी कोरोनाच्या उपचारासाठी उपयोगी पडणारे  रेमडिसिव्हीर (Remedisivir) इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे यासाठी ठिय्या आंदोलन केले होते नाशिक मध्ये रेमडिसिव्हीर औषधांचा साठा कमी असतांना नाशिक शहरात या औषधाची प्रचंड टंचाई असतांना अन्न, औषध प्रशासन विभागाकडून सर्वांना सुरळीत वाटप न करता एका खाजगी हॉस्पिटलला एकाच दिवशी १००० इंजेक्शनचासाठा देण्यात आला. त्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अन्न, औषध प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली.

अन्न, औषध प्रशासन विभागाकडून रेमडिसिव्हीर (Remedisivir) इंजेक्शनचा साठा सुरळीत न करता एका खाजगी हॉस्पिटलला १ हजार इंजेक्शनचा पुरवठा केल्याची बाब आज पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कानावर आली.त्यानंतर त्यांनी अन्न, औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंन्त भामरे यांना बोलावून  झाडाझडती घेत शहरात मोठ्या प्रमाणात आवश्यकता असतांना टंचाई असतांना केवळ एकट्या हॉस्पिटलला एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शनचा पुरवठा केल्याबाबत त्यांची कानउघडणी केली. 


संतप्त झालेल्या भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याशी  संपर्क करुन जिल्ह्यातील सदर गंभीर प्रकाराबाबत माहिती देऊन नाशिक जिल्ह्यातील रॅमिडिसिव्हीर(Remedisivir) इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.


भुजबळांच्या रुद्रावतरा नंतर औषध उत्पादक कंपनीच्या प्रशासनाने संपर्क करून उद्या ७०००  रेमडिसिव्हीरचा(Remedisivir) साठा देण्यात येईल आणि हे औषध जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे वितरित करण्याची ग्वाही दिली.

कोणत्याही हॉस्पिटलना यापुढे अवाजवी पुरवठा करु नये – जिल्हाधिकारी  सूरज मांढरे

याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एक निवेदना द्वारे स्पष्ट केले आहे


निवेदन 
औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 मधील शेडूल के प्रमाणे हॉस्पिटल ला थेट उत्पादकांकडून औषध खरेदी करण्याची मुभा अन्न व औषध प्रशासनाने दिलेली आहे. त्या तरतुदीनुसार नाशिक मधील अशोका हॉस्पिटल ने थेट उत्पादकाकडून  खरेदी केली असल्याचे दिसून आले आहे.

खरेदीची मुभा जरी दिली असली तरीसुद्धा सद्यस्थितीत रेमीडीसिविरचा (Remedisivir) निर्माण झालेला तुटवडा विचारात घेता रुग्ण संख्येपेक्षा अव्यावहारिक रित्या जास्तीचा साठा थेट उत्पादकाकडून प्राप्त करून घेणेसुद्धा अभिप्रेत नाही


त्या अतिरिक्त साठ्या संदर्भात आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना लिखित स्वरूपात आज दिल्या आहेत. 

त्याचबरोबर उत्पादक कंपनीशी सुद्धा संपर्क करून त्यांनी कोणत्याही हॉस्पिटलना यापुढे अवाजवी पुरवठा करु नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून केंद्रीय पद्धतीने वाटपासाठी अधिक कोटा जिल्ह्याला उपलब्ध राहील. 

नाशिक जिल्ह्यात आपण थेट हॉस्पिटलला कोटा वाटप करण्याची सुरू केलेली कार्यपद्धती परिणामकारक ठरत असून त्यामुळे उपलब्धतेच्या प्रमाणात, अत्यवस्थ रुग्णांना औषध पोहोचवणे आपल्याला शक्य होऊ लागले आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे  जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रीय कंट्रोल रूम द्वारे संपूर्ण नियंत्रण केले जाणार आहे.


– सूरज मांढरे

जिल्हाधिकारी नाशिक