सर्वात वर

मुंबईतील “ब्लॅक आऊट” हा घातपात

गृहमंत्री आणि उर्जामंत्री यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती : महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर

मुंबई – मुंबई मध्ये १२ ऑक्टोबर २०२० रोजी झालेला ब्लॅक आऊट (Black Out in Mumbai) हा घातपाताचा प्रकार असून या ब्लॅक आऊट मध्ये चीनचा हात असू शकतो.अमेरिकेतील कंपनी रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिसने २८ फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबईच्या ईलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी दि. १ मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसेच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे. या बाबत  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सायबर गुन्हे शाखेने याबाबत एक अहवाल दिला असून तो अहवाल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्त केला आहे. 

 श्री. देशमुख म्हणाले की, मुंबईत वीजपुरवठा खंडित प्रकरणी(Black Out in Mumbai) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते.

यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले की, १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीजपुरवठा खंडित (Black Out in Mumbai) झाल्याच्या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीकोनातून तपास करणे आवश्यक वाटल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तपासाबाबत विनंती केली होती. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, ऊर्जा विभागाने याप्रकरणी गठित केलेल्या तांत्रिक तपास समिती आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सायबरचा अहवालही प्राप्त झाला आहे. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या अहवालांच्या अनुषंगाने अधिक माहिती विधानमंडळात सादर केली जाईल.

या पत्रकार परिषदेला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र सायबरचे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव आदी उपस्थित होते.