सर्वात वर

Nashik : नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद

शहीद नितीन भालेराव यांचे पार्थिव विशेष विमानाने आज मुंबईत आणणार 

नाशिक-छत्तीसगढ येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफच्या २०६ कोब्रा बटालियन मध्ये कार्यरत असलेले नाशिकचे सुपुत्र कमांडंट नितीन भालेराव शहीद झाले आहे.तर १० जवान जखमी झाले आहेत. सन २०१० सालापासुन भालेराव सीआरपीएफच्या २०६ कोब्रा बटालियन मध्ये कर्तव्य बजावत होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. 

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ पुन्हा एकदा कोब्रा २०६ बटालियनच्या जवानांना लक्ष्य केले आहे.सूत्रांच्या माहिती नुसार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे सर्व जवान एक ऑपरेशन पूर्ण करुन येत असताना नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनास लक्ष्य केले. त्यानंतर त्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. हल्ल्याची माहिती मिळताच रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. सर्व जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार करण्यापूर्वीच  नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आल्याचे समजते. 

शहीद भालेराव यांचे मुळगाव निफाड तालुक्यातील देवपूर हे असून वडिलांच्या नोकरी निमित्त हे कुटुंब  काही वर्षापूर्वी नाशिक येथे स्थायिक झालेले होते. नितीन यांचे वडील पुरुषोत्तम भालेराव हे नाशिक येथे इंडिया सिक्यूरिटी प्रेसला कामगार होते. वीस वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. नाशिक शहराच्या राजीव नगर परिसरातिल श्रीजी सृष्टी अपार्टमेंट मध्ये आपल्या कुटुंबासमवेत ते राहत होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई आणि ५ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. नितीन यांचे मोठे बंधू अमोल भालेराव हे नाशिकच्या नोट प्रेसमध्ये काम करतात तर लहान भाऊ सुयोग हे एका महाविद्यालयात शिक्षक आहेत. नितीन यांच्या अशा अचानक जाण्याने भालेराव कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. 

शाहिद नितीन भालेराव यांचे पार्थिव  विशेष विमानाने मुंबईला आणणार असून त्यानंतर ते नाशिकला आणण्यात येईल.त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील त्यावेळेस त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल असे नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.