सर्वात वर

शाळा भरली, स्क्रीनच फुटली ! (बाल मानसशास्त्र व संगोपन लेख-५)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)  

चित्रपटात एका गाण्यामध्ये पळता-पळता लहान मुलाचं मोठ्या हिरो मध्ये रूपांतर होतं, हे आपल्याला शक्य आहे का? नाही, तीन मिनिटांच्या गाण्याचा नाही तर प्रत्येक क्षणाचा हा प्रश्न आहे. मुलांचा प्रत्येक क्षण त्यांना काहीतरी शिकवणारा असतो, काहीतरी अनुभव देणारा असतो म्हणून शिक्षण थांबू शकत नाही.

“ए आई, या वर्षी तरी मला नवीन दप्तर देशील ना घेऊन? बाबांना तू सांग हं”“बापरे, जून महिना आला सुद्धा, शाळेची किती तयारी बाकी आहे अजून!”“जून महिना म्हणजे खर्चाचा महिना! मुलांचे गणवेश, पुस्तकं, वह्या, दप्तर, बुट सगळा खर्च या एकाच महिन्यात येतो, सगळं गणित बसवावं लागेल” ही आपल्या ओळखीची वाक्य आता यावर्षी ऐकायला मिळणार नाहीत. 

यावर्षी पुस्तक ई-बुकच्या स्वरूपात आहेत, गणवेशाचा खर्च नाही, स्कुल बसचा पण खर्च नाही, फक्त खर्च आहे तो मुलांना मोबाईल घेऊन देण्याचा, नुसता मोबाईल नाही ‘स्मार्टफोन’ घेऊन देण्याचा आणि त्याच्यामध्ये अखंडपणे चालू राहणाऱ्या वाय-फायचा ! अर्थात याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीच.माझं मूल तीनच वर्षाचं आहे. आता या वर्षी शाळेत नाही पाठवलं तर पुढच्या वर्षी डायरेक्ट पुढच्या वर्गात बसवु, एक वर्ष नाही पाठवलं तर काही बिघडत नाही, ही आपली विचार करण्याची पद्धत आपल्या मुलाच्या प्रगतीच्या आड येते आहे हे आपल्याला जाणवत नाही. 

एक वर्ष नाही पाठवलं तर काही बिघडत नाही असं म्हणत आपण मागचं वर्ष काढलं पण दुर्दैवाने याहीवर्षी जर परत तसच म्हणाल तर मुलाची सर्वांगीण वाढीची महत्त्वाची दोन वर्ष तुम्ही स्वतःच वाया घालवणार आहात याची गंभीर दखल घ्या. एखादं वर्ष ‘झिरो इयर’ असं गोंडस नाव देऊन आपण पूर्णपणे आपल्या आयुष्यातुन पुसून टाकू शकत नाही. मी या वर्षाला उपहासाने ‘झिरो इयर’ नक्कीच म्हणेन पण शिक्षणाच्या बाबतीत झिरो इयर असू शकतं हे मला मान्य नाही. हे वर्ष झिरो म्हणून गृहीत धरले पाहिजे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा खरंच त्याचा अर्थ “शून्य” असा होतो का? मुलं तर रोज वाढणार आहेत, नवीन काहीतरी शिकणार आहेत. मग त्यांचं रोजचं वाढणं, त्यांचं रोजचं नवीन शिकणं हे शून्य करायचं? असा विचार आपण नाही करू शकत! शैक्षणिक वर्षाला तुम्ही झिरो इअर म्हणू शकता पण मुलांच्या शिकण्याला, त्यांच्या नवीन नवीन गोष्टींचा विचार करण्याला आपण झिरो इयर नाही म्हणू शकत.

खरंतर पहिलीपासून पुढच्या शिक्षणाला ऑनलाइनची मान्यता तरी मिळाली पण पहिलीच्या आधीचं शिक्षण ज्याला आपण प्री प्रायमरी स्कूल म्हणतो, त्या शिक्षणाचं महत्व कोणालाच वाटत नाहीये का?

आपली संस्कृती आपल्याला अभिमन्यूची आठवण करून देते. अभिमन्यूचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अभिमन्यू जन्माला येण्याच्या आधीपासून शिकत होता. आईच्या पोटात असतानाच अभिमन्युने चक्रव्यूहाची रचना ऐकली होती. त्याचा उपयोग कुरुक्षेत्रावर त्याला झाला. जर आईच्या पोटात असताना अभिमन्यू व्यूहरचना ऐकू शकतो तर जन्माला आलेली आपली मुलं पहिलीत जाईपर्यंत काहीच शिकत नाहीत का? माझ्या मते मूल जन्माला येताच पहिल्या सेकंदापासुन शिकत असतं. आईचं लक्ष वेधून घ्यायचं तर रडायला हवं हे त्याला कोण शिकवतं? आपल्याला भूक लागली आहे तर मुठी चोखायला हव्यात हे त्याला कोण शिकवतं? आपलं काही दुखतं आहे हे कळवळून आपल्या आवाजातुन आई-वडिलांना पर्यंत कस़ पोहोचवावं, हे त्याला कोण शिकवतं?

आपल्याकडे सगळे दुर्लक्ष करत आहेत, त्यांचं लक्ष कसं खेचून घ्यायचं, हे त्याला कोण शिकवतं? या गोष्टी ते लहान बाळ स्वतःच्या अनुभवातून शिकत असतं! आपण थोडासा आवाज काढला की कोणीतरी आपल्या जवळ येतं, आपल्याला उचलून घेतं, ही गोष्ट ते बाळ खूप लवकर शिकतं आणि मग कोणाला आपल्या जवळ बोलवायचं असेल तर आपण वेगवेगळे आवाज काढायला हवेत हे त्याला कळतं.आपण मा..मा..मा..मा म्हटल्यानंतर आपली आई जवळ येते आहे म्हणजेच “मा” या शब्दाचा अर्थ “आई” होतो का, याचा विचार बाळ करायला लागतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून मुल स्वतःचे स्वतः शिकायला लागलेलं असतं. मग त्याच्या जाणीवांना एका नवीन उंचीवर नेण्याचं काम शिक्षण करतं. त्याच्या आजूबाजूची माणसं ओळखीची झाली की मुल त्याच्या बाहेरचं वर्तुळ तपासायला सुरुवात करतं. घराबाहेरचं पहिलं वर्तुळ असतं ती त्याची शाळा आणि मग या शाळेत आल्यानंतर त्याच्याबरोबर असलेल्या मुलांशी त्याचं वागणं, त्यांच्याशी जमवून घेणं, वेगवेगळ्या अनुभवातून  एक एक नवीन गोष्ट शिकणं असा हा मुलांचा शाळेचा प्रवास सुरू होतो. 

दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे लहान मुलांचं शाळेत जाणे थांबलं पण शिक्षण तर थांबलेलं नाहीये ना ! या शिकण्याला एक योग्य दिशा देण्याची गरज आहे. वर्च्युअल शाळा लहान मुलांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ऑनलाइन किंवा वर्च्युअल म्हटलं की पालकांची एक कॉमन तक्रार मला ऐकायला मिळते, “आमची मुलं स्क्रीन समोर बसत नाहीत” आणि तेच पालक नंतर म्हणतात की, “आमची मुलं मोबाईल खालीच ठेवत नाहीत” म्हणजे नक्की काय खरं मानायचं? तुमची मुलं मोबाईल तर घेतात पण तुमची मुलं ऑनलाईन शिकायला तयार नाहीत असंच ना?  

आता हे त्यांना आपण शिकवायला हवं की “मी तुला मोबाईल देणार आहे, त्याच्यामध्ये मी जे सांगेल ते तुला थोडा वेळ बघावे लागेल. मग थोडा वेळ आपण तुझ्या आवडीचं बघू” असं जर  ठरवून घेतलं तर थोडासा फरक नक्कीच पडू शकतो. 

या सगळ्या परिस्थितीमध्ये पालकांची किंवा मुलांची कुठलीही चूक नाही. वर्षानुवर्षे शाळेत जायचं म्हणजे दप्तर घ्यायचं, बूट घालायचे, वॉटर बॉटल घ्यायची आणि शाळेच्या वर्गामध्ये जाऊन बसायचं हेच बिबलंय म्हणून आपल्याला सुद्धा शाळेत जाणं म्हणजे मोबाईल ऑन करून त्या स्क्रीनसमोर बसणं आणि शिक्षक जे शिकवतात ते समजून घेणं हे पचायला जरा वेळ लागेल.  या परीस्थितीमध्ये  मुलांना सगळ्यात जास्त तुमची  गरज आहे. लहान मुलांना कुठलीही स्क्रीन दाखवली तरी त्यांना तो टीव्हीच वाटतो. मुलं मोबाईल किंवा टीव्ही त्यांच्या आवडीने बघतात कारण त्यांना कंटाळा आला की ते बंद करता येतं याची त्यांना जाणीव असते पण गोष्ट जेव्हा वर्च्युअल शिक्षणाची असते त्या वेळेला मुलांना कितीही कंटाळा आला तरी ते स्क्रीन समोरून हलु शकत नाहीत, यामुळे मुलं वर्च्युअल शिक्षण टाळतात. आपलाच विचार केला तर आपण सुद्धा टीव्हीवर खूप वेळ एकच गोष्ट बघत नाही, रीमोटने सतत चॅनल बदलतो. मग ही लहान मुलं तासन्तास वर्चुअल साठी मोबाईल समोर बसतील असं आपण गृहीत धरणं चुकीचं ठरेल.

व्हर्च्युअल लर्निंग ही पालकांची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची एक प्रकारे भागीदारी असायला हवी. हा शिक्षणाचा त्रिकोण आहे असं समजा. त्याच्यामध्ये पहिली बाजू ही शिक्षक आणि मूल, दुसरी बाजू शिक्षक आणि पालक आणि तिसरी बाजू मुलं आणि पालक अशी असायला हवी. काही गोष्टी शिक्षक पालकांशी बोलून ठरवतील, काही गोष्टी शिक्षक मुलांना करायला सांगतील आणि त्या गोष्टी पालकांनी मुलांकडून करून घेतल्या तर हा वर्च्युअल शिक्षणाचा त्रिकोण पूर्ण होईल. शाळांनी आणि पालकांनी एकत्र काम करण्याची हीच खरी वेळ आहे. चित्रपटात एका गाण्यामध्ये पळता-पळता लहान मुलाचं मोठ्या हिरो मध्ये रूपांतर होतं, हे आपल्याला शक्य आहे का? नाही, तीन मिनिटांच्या गाण्याचा नाही तर प्रत्येक क्षणाचा हा प्रश्न आहे. मुलांचा प्रत्येक क्षण त्यांना काहीतरी शिकवणारा असतो, काहीतरी अनुभव देणारा असतो म्हणून शिक्षण थांबू शकत नाही. माझी स्वतःची शाळा असून सुद्धा मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते की या वर्षी शाळेची इमारत महत्त्वाची नाही, मुलांचे शिकणे महत्त्वाचे आहे. या सगळ्या शिकण्याच्या प्रवाहामध्ये आता आपण मुलांसाठी एकत्र यायला हवं, वर्च्युअल शिक्षण स्विकारायला हवं.

माझ्या मते व्हर्च्युअल लर्निंगने आपल्या सारख्या पालकांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आज पर्यंत तुम्ही एखाद्या शाळेबद्दल खूप चांगलं ऐकलं असेल आणि त्या शाळेत आपल्या मुलांनी जावं असं तुम्हाला वाटलं असेल पण ती शाळा तुमच्या घराजवळ नसेल किंवा तुमच्या शहरातच नसेल तर आपला नाईलाज होता. आता मात्र तुमची मुलं घरात सुरक्षित राहून, त्याच शाळेच्या विविध गोष्टींचा, तिथल्या शिक्षकांच्या ज्ञानाचा,  त्या शाळेमध्ये चालणाऱ्या उपक्रमांचा लाभ वर्च्युअल पद्धतीने घेऊ शकतात. 

माझी शाळा मी मागच्या वर्षापासूनच वर्च्युअल सुरू केली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच वर्षी पुणे, अहमदाबाद येथील मुलं माझ्या वर्च्युअल शाळेमध्ये दाखल झाले.   त्यापलिकडे जाऊन सांगायला आनंद होतो कि यावर्षी चक्क सिंगापूर मधली एक छोटी मुलगी ईस्कुलिंग व्हर्च्युअल शाळेत दाखल झाली आहे. 

आपली मुलं चार तास, पाच तास किंवा आठ तास शाळेत जात होती आता ऑनलाईन मध्येही ते तेवढेच तास स्क्रीन समोर बसतील तरच त्यांचा अभ्यास पूर्ण होईल ही आपली मानसिकता बदलायला हवी. मागच्या वर्षी अनेक पालकांचं म्हणणं होतं की अभ्यास आम्ही घरी करून घेतो मग शाळा काय करते? शाळा काहीच करत नाही तर आम्ही फि का भरायची? आठ तासाच्या शाळेची तीच फी आणि आता ऑनलाईन मध्ये दोन- तीन तासच घेतात तरी फी तेवढेच घेतात हा आपला तक्रारीचा मुद्दा नक्कीच असू शकतो पण आठ तास मुले जेव्हा त्यांच्याकडे जात होती त्यापेक्षा आता तीन तास मुलांना तेच शिक्षण ऑनलाइन देण्यासाठी शिक्षक 24 तास प्रयत्नशील असतात. व्हिडिओ बनवत असतात, ऑडिओ रेकॉर्ड करत असतात, मटेरियल गोळा करत असतात, लेसन प्लान बनवत असतात. या सगळ्याचा विचार आपण सकारात्मकतेने करायला हवा. 

एकीकडे काही मुलांचं शिक्षण पूर्णपणे थांबलेलं असतांना, त्यांचं भविष्य अंधकाराकडे जात असताना, आपल्या मुलांचं रोज काहीतरी शिकणं चालू आहे, रोज काहीतरी नवीन गोष्टी बघणं चालू आहे आणि ते “शाळा” या संकल्पनेशी अजूनही जोडले गेलेले आहेत ही एक चांगली बाजू आपण लक्षात घ्यायला हवी.

येत्या आठवड्यापासून आपल्या मुलांची ऑनलाईन शाळा सुरू होईल. तेव्हा या बदलाला सामोरे जातांना अतिशय सकारात्मक मानसिकतेने जा आणि आपल्या मुलांचं ऑनलाइन शिक्षण आनंददायी बनवा ! त्यांच्या प्रगती मधला आपला वाटा ‘पालक’ म्हणून नाही तर “पार्टनर” म्हणून उचला आणि मुलांचं भविष्य योग्य दिशेने घडवायचा श्रीगणेशा करा! तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

[email protected] | 8329932017 / 9326536524

https://www.instagram.com/theblooming.minds/