
जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात
दोन दिवसात ५ केंद्रावर झाले ५९८ नागरिकांचे लसीकरण : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक- जिल्ह्यात 5 लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) महाराष्ट्र दिन व कामगार दिनापासून सुरू झाले असून दोन दिवसात या लसीकरण केंद्रावर ५९८ नागरीकांनी लसीकरण घेतले असून जोपर्यंत लसींचा साठा उपलब्ध असेल तोपर्यंत हे लसीकरण ७ दिवस सुरू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
ही आहेत १८ ते ४४ वयोगटासाठीची लसीकरण केंद्रे
१ मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात मोफत लसीकरण (Vaccination) सुरू करण्यात आले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन, नाशिक ग्रामीण क्षेत्रात दोन तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात एक केंद्र सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्राला २ हजार प्रमाणे १० हजार लस स्वतंत्रपणे जिल्ह्यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुढील ७ दिवस लस संपेपर्यंत लसीकरण चालू ठेवण्यात येणार आहेत.
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात इंदिरा गांधी रूग्णालय, पंचवटी कारंजा व नाशिक रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक ग्रामीण क्षेत्रात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र (दिंडोरी) व पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र, निफाड तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य केंद्र निमा येथे ही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
दोन दिवसात झाले ५९८ नागरिकांचे लसीकरण
१ मे रोजी पहिल्याच दिवशी २७६ नागरिकांनी लसीकरण केले असून त्यात नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात इंदिरा गांधी रूग्णालयात ९०, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक रोड येथे ९५ तर नाशिक ग्रामीण भागात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र(दिंडोरी) येथे २८ पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र (निफाड) येथे ४९ इतके तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य केंद्र निमा येथे १४ इतके असे जिल्ह्यातील एकूण २७६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
तसेच २ मे रोजी दुसऱ्या दिवशी ३२२ नागरिकांनी लसीकरण (Vaccination) केले असून त्यात नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात इंदिरा गांधी रूग्णालयात ८७, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक रोड ७१ तर नाशिक ग्रामीण भागात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र(दिंडोरी) येथे ८४, पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र (निफाड) येथे ८० इतके लसीकरण झाले आहे. यानुसार जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर एकूण ३२२ नागरिकांचे लसीकरण (Vaccination) झाले आहे. दोन दिवसात जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५९८ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे.