सर्वात वर

कोरोना लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

एकजुटीने पेलणार लसीकरणाचे शिवधनुष्य

नाशिक: जिल्ह्यातील कोरोना(Corona Update) परिस्थिती जरी आटोक्यात आली असली तरी सर्वांना कायमस्वरूपी सुरक्षाकवच मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने लसीकरणाचे शिवधनुष्य पेलणार आहेत. आणि या लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापुरकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, पालकमंत्री, कृषिमंत्री, जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणेच्या सर्व विभागांच्या समन्वयातून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यास यश मिळाले आहे. या सोबतच नागरी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोरोना (Corona Update) विषाणूला आळा घालण्यास यश मिळाले आहे.

लसीकरणासाठी शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संघटना, आरोग्य यंत्रणा, वाहतूक विभाग यासोबत इतर लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी कलाकार, नाट्यप्रेमी यांची मदत घेतली जाणार आहे.

जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही याचीही काळजी जिल्हा प्रशासन घेणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या, कोरोना हद्दपार करण्यासाठी लवकरात लवकर लस उपलब्ध होणार आहे. लस आल्यानंतर आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर सुद्धा नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ ठेवणे ही त्रिसूत्री पाळायची आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून आपण कोरोना(Corona Update) बाधितांचे प्रमाण कमी करण्यात आपण यश मिळविले आहे. येणाऱ्या काळात होत असलेली लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा एकवटलेली आहे. नागरिकांनी देखील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर ही जबाबदारीने नागरिकांनी वागले पाहिजे.