सर्वात वर

“डान्स रे मोरा” (बाल मानसशास्त्र व संगोपन लेख – ४)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

डान्स रे मोरा,  मँगोच्या गार्डनमध्ये  डान्स रे मोरा डान्स ! अशी अंग्लो इंडियन कविता तुमच्या घरातली लहान मुलं म्हणत असतील किंवा शाळेतले शिक्षक “तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागतील ,युवर चाईल्ड कान्ट स्पीक इन इंग्लिश” असं म्हणत असतील किंवा “बेटा, प्लीज मला एक पोटॅटो दे आणि हे ॲप्पल खाऊन घे, इट फास्ट हं!” अशी भाषेची भेळ तुम्हीही बनवत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी!

मी आज इथे या लेखामध्ये मराठीतून व्यक्त होते आहे आणि तुम्ही सगळे ते मराठी भाषेतच वाचत आहात याचा अर्थ असा नाही ही कि मला किंवा तुम्हाला इंग्लिश येत नाही. आपण सगळेच उच्चशिक्षित आहोत पण जेव्हा मनातलं, मनापासून, मनापर्यंत पोहोचवायचं असतं त्या वेळेला आपल्याला मातृभाषेशिवाय चांगला पर्याय नाही !

माझ्या शाळेत येताना , बरेच पालक इंग्लिश मीडियमसाठी खूप आग्रही असतात. मुलांना जर इंग्रजी आलं नाही तर भविष्यात त्यांचं काही खरं नाही, असा एक विचार पालकांच्या मनात असतो. पुढच्या स्पर्धेत आपली मुलं टिकायला हवी असतील तर त्यांना इंग्लिश आलेच पाहिजे हा पालकांचा अट्टाहास असतो. माझ्याकडे येणारी मुलं दीड वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतची असतात. प्रत्येकाच्या घरी कुठलीतरी एक भाषा ‘मातृभाषा’ म्हणून बोलली जाते. आज पर्यंत मला भेटलेल्या कुठल्याही कुटुंबाची मातृभाषा इंग्रजी नव्हती, मात्र प्रत्येक कुटुंबाचा आग्रह हा इंग्रजीसाठीच होता.  गेले दीड वर्ष शाळा ऑनलाइन चालू आहेत आणि या दीड वर्षात मुलं शाळेत येत नाहीत. मुलांचा पूर्णवेळ पालकांबरोबर व्यतीत होत आहे. अशा वेळेला मुलांना मातृभाषे व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेची ओळख होणे जरा कठीण आहे. नुकतीच घडलेली गोष्ट आहे. घरी मराठी बोलणाऱ्या नभाने दोन वर्षांपूर्वी किंडरगार्टन मध्ये जायला सुरुवात केली. तिच्या आईने नभाला इंग्रजी शिकण्यासाठी चांगल्या अभ्यासक्रमाची निवड केली होती आणि अवाजवी फी असुनही महागडी इंग्रजी शाळा त्यांनी निवडली होती. शाळेमध्ये प्रवेश केल्यापासूनच नभाने इंग्रजीतच बोलावे असा तिथल्या शिक्षकांचा आग्रह होता. लवकरच नभा वर्गात बोलेनाशी झाली. घरी असताना सतत प्रश्न विचारायला लागली. “आई मला पाणी हवे असेल तर मी इंग्लिश मध्ये काय म्हणायला हवं?आई मला शु लागली तर मी टीचरला कसं सांगायचं?” अशा प्रश्नांमधून नभा थोडीफार मदत शोधायला लागली. 

या सगळ्याचा अर्थ नभाला इंग्रजी बोलायची गोडी लागते आहे असा तिच्या आईने काढला, खरंतर हे प्रश्न तिची वर्गातली असहाय्यता दाखवत होते. तिला वर्गामध्ये तहान लागल्यानंतर शिक्षकांना इंग्रजीतून सांगता येत नाही म्हणून ती पाण्यावाचून बराच वेळ राहत होती, शु लागल्यानंतर शिक्षकांना इंग्लिश मधून कसं  सांगायचं हे माहीत नसल्याने तिला वॉशरूमला देखील जाता येत नव्हतं. शाळेतल्या शिक्षिका वेळोवेळी मुलांना शिकवत होत्या, सांगत होत्या पण नभाला ते समजतच नसल्याने ती व्यक्त होऊ शकत नव्हती. त्यांच्या बिल्डींग मधली नभापेक्षा एखादं वर्ष मोठी असलेली मुलगी छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आता इंग्लिश मधून देत होती, त्यामुळे आपली नभा पटकन इंग्लिश कधी बोलायला लागेल याची तिच्या आईला घाई झाली होती. घरात सगळेजण मराठी बोलतात आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षक इंग्रजीत बोलतात त्यामुळे नभाचा आत्मविश्वास कमी होत गेला. 

आपला “चाफा बोलेना” हा लेख वाचून नभाच्या आईने मला संपर्क साधला. खूप बडबड करणारी नभा आता का बोलत नसेल? या प्रश्नाचे उत्तर त्या शोधत होत्या.त्यांच्याकडून नभाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी नभाशी व्हिडिओ कॉल वर बोलायचं ठरवलं आणि “आज दुसऱ्या एका शाळेच्या टीचर तुझ्याशी बोलणार आहेत, याची कल्पना नभाला द्या”  असं नभाच्या आईला सांगितलं. शाळेतल्या टीचर बोलणार म्हटल्यावर नभाला जरा गोंधळल्यासारखं झालं. “आई, त्या मला काय प्रश्न विचारतील? मी त्यांना काय उत्तरं देऊ? मला इंग्लिश मधून बोलावं लागेल का?” असे प्रश्न विचारून झाल्यानंतर जरा नाराजीनेच नभा माझ्याशी बोलायला तयार झाली.  (अर्थात हे मला तिच्या आईकडून नंतर समजलं) ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी मी व्हिडिओ कॉल केला. शाळेच्या टिचर आहेत म्हटल्यानंतर नभाने मला व्यवस्थित गुड मॉर्निंग म्हणून ग्रिट केलं. आता तिची अशी अपेक्षा होती की जश्या तिच्या टीचर इंग्लिश मधून बोलतात तसंच मीही सुरुवात करेन पण मी मात्र “अरे वा नभा, खूप सुंदर फ्रॉक आहे गं तुझा! किती गोड दिसतेस.”अशी सुरुवात केल्यावर तिचा चेहरा खुलला आणि नंतर तिने आनंदाने मराठीतुन माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. “आमच्या नभाला काही येतं आहे की नाही हेच आम्हाला समजत नाही , आमच्या प्रश्नांची ती काहीच उत्तरं देत नाही’ या नभाच्या आईच्या वक्तव्याला छेद देणारं नभाचं आत्ताच वागणं होतं.

दुर्दैवाने भारतातल्या कित्येक प्ले स्कूल मध्ये नभासारखी मुले आहेत ज्यांना भाषेच्या अडचणीमुळे काय शिकवले जात आहे ते समजत नाही. बहुतेक शाळांमध्ये शिकवण्याचे माध्यम इंग्रजी असते आणि संवादही इंग्रजीमधूनच होत असतात पण एखादी संकल्पना, एखादी नवीन गोष्ट लहान मुलांच्या मनात पक्की करण्यासाठी मातृभाषेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. आपली मुलं लहानपणापासून मातृभाषा शिकत असतात आणि अचानक एके दिवशी त्यांना पूर्णपणे वेगळ्या भाषेच्या जगामध्ये प्रवेश करावा लागतो. तिथे त्यांनी उत्तम यश मिळवावं अशी अवास्तव अपेक्षा देखील केली जाते. लहान मुलं आपली मातृभाषा समजून घ्यायचा प्रयत्न करत असताना, त्या भाषेचे बारकावे समजून घेत असताना त्यांचे लक्ष इंग्लिश सारख्या पूर्णपणे वेगळ्या नवीन आणि अपरिचित भाषेकडे वळवल्याने नकारात्मक परिणाम होऊन दुसरी भाषा समजून घेणे अवघड जाते आणि मग त्याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर दिसून येतो. याचा अर्थ मुलांना इंग्रजी शिकवू नये असा मात्र अजिबात नाही. एका संशोधनानुसार एक ते चार वर्षे वयात दोन भाषा शिकल्या तर मानवी मेंदूची अनेक भाषा शिकण्याची क्षमता विकसित होते, मात्र यासाठी मुलांना शिस्तबद्ध पद्धतीने भाषा शिकवण्याची गरज असते. लहानपणी मातृभाषेतून शिक्षण दिले तर मुलांचा दुसरी भाषा शिकण्याचा पाया जास्त पक्का होतो हे कित्येक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे.

नवीन आलेल्या शैक्षणिक धोरणात देखील इयत्ता पाचवी पर्यंत मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला गेला आहे. जर तुम्हाला मुलांना दुसरी भाषा किंवा इंग्रजी व्यवस्थित शिकवायचं असेल तर शाळेतील शिक्षकांच्या बरोबरीने तुम्हीदेखील मुलांशी अस्खलित इंग्रजीमध्ये संवाद साधायला हवा. “इकडे ये” म्हटल्याबरोबर लगेच ‘कम हियर’ असं म्हणायचं तर ‘इकडे ये’ म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘कम हियर’ हे मुलांना समजेल. नुसत्या शब्दांवर भर न देता ते शब्द तुमच्या शारीरिक हालचाली मधून देखील व्यक्त करा जसं “इकडे ये” म्हणताना हाताने त्यांना जवळ बोलवण्याची खुण करा, परत “कम हियर” म्हणताना तीच खुण करा, जेणेकरून तुम्ही बोलत असलेल्या शब्दांचा अर्थ तुमच्या खुणेमधून त्यांना समजेल. 

आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांनी भाषेमध्ये प्रभुत्व मिळवावं असं वाटत असेल तर शाळेपेक्षा जास्त जबाबदारी आपल्यावर आहे हे नाकारून चालणार नाही.  शेवटी चोवीस तासांपैकी सात आठ तास मुलं शाळेत असतात पण उरलेला सगळा वेळ ते आपल्या बरोबर असतात. ते आपल्याशी मोकळा संवाद साधत असतात. त्यांना पडणारे प्रश्न ते आपल्याला विचारत असतात. याच संधीचा फायदा घेऊन त्यांना अलगद दुसऱ्या भाषेची ओळख करून द्या आणि त्यांच्या प्रगती मध्ये त्यांच्या सोबत रहा‌. त्यांच्यावर नुसता शब्दांचा वर्षाव करू नका तर ज्ञानाचा वर्षाव करा मग आपली मुलं व्यवस्थित आणि अस्खलित नाच रे मोरा म्हणायला शिकतील नाहीतर त्यांच आयुष्य “डान्स रे मोरा, मँगोच्या गार्डनमध्ये डान्स रे मोरा डान्स” अशा अडनीड भाषेनं व्यापून राहील आणि ते स्पष्टपणे स्वतःला कधीही व्यक्त करू शकणार नाहीत.

तुमच्या मुलांबद्दलचे (Child Psychology) प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह !

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक) संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

[email protected] | 8329932017 / 9326536524

https://www.instagram.com/theblooming.minds/