सर्वात वर

बिग गेम

(Entertainment news)

एनसी देशपांडे

फिनलँडच्या उत्तरेकडील बाजूस विखुरलेला आणि विरळ लोकवस्तीचा ‘लॅपलँड’ या प्रदेशातील घनदाट जंगल आणि पर्वतराजींमध्ये वसलेलं एक लहानसं गाव दर्शवून या चित्रपटाचं बरचसं बाह्य-चित्रण आल्प्स पर्वतात आणि बाकीचं जर्मनीत करण्यात आलंय. ‘एअरफोर्स वन आणि डाय हार्ड’ या गाजलेल्या हॉलीवूडपटांच्या धर्तीवर अतिशय हिंसक आणि चित्तथरारक बनलेला ‘बिग गेम’, फिनलँडमध्ये तयार झालेला सगळ्यात महागडा चित्रपट, अशी त्याची नोंद झालीय. एका १३ वर्षांच्या मुलाच्या आयुष्यातील महत्वाच्या वळणावर बेतलेल्या कथानकात, त्यालाच नायकपद बहाल करून, ‘उत्कंठा, गूढत्व, इर्षा, स्पर्धा, आत्मविश्वास आणि शूरत्व’ याचं एक उत्तम उदाहरण आजच्या तरुण पिढीला दिलंय. कथानकाची फारशी गरज नसतांनाही यातील पटकथा आणि संवाद अपशब्दांनी भरलेले आहेत.

कथासार

एका अंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ”एअरफोर्स वन’ मधून ‘अमेरिकेचे अध्यक्ष मूर(सॅम्यूअल जॅक्सन)’ प्रवास करत असतात. त्यांचा मुख्य सुरक्षा अधिकारी ‘मॉरीस(रे स्टीव्हनसन) याला विमानावर अतिरेकी हल्ला झाल्याची माहिती मिळते आणि तो अध्यक्षांना ‘पराशूट पॉड’ मध्ये जबरदस्तीने बसवून फिनलँडचा निर्जन वन्य प्रदेशात विमानातून खाली सोडतो. 

त्याचवेळेस जवळच्या गावातील ओस्कारी(ओन्नी टोमिल्ला) परंपरागत संस्कारांतर्गत २४ तासांच्या आत जंगलामध्ये जाऊन शिकार करण्याच्या मोहिमेवर असतो. एका शूर बापाचा मुलगा असल्याने त्याच्यावर शूरत्व सिद्ध करण्याची फार मोठी जबाबदारी असते. मुळात ओस्कारी हा या संस्कारांसाठी लायक असूनही केवळ आत्मविश्वास नसल्याने वेळोवेळी तो अपयशी ठरत असतो. स्वत:च्या बचावासाठी आणि शिकार करण्यासाठी त्याच्याजवळ केवळ एक धनुष्यबाण असतो. 
चोवीस तासांच्या आत मृत जनावराचं मुंडकं आणल्यानंतरच त्याचं धैर्य आणि पुरुषत्व सिद्ध होणार असतं आणि हाच त्या गावचा प्रघातही.

वरील दोन्ही घटना समांतरपणे सुरु असतांनाच, घनदाट जंगलात शिकार हुडकतांना अचानक ओस्कारीला ‘पराशूट पॉड’ दिसतं. यापूर्वी कधीही न बघितलेल्या या प्रकारामुळे ओस्कारी घाबरून जातो. ‘पराशूट पॉड’वर बाण सोडण्याचा प्रयत्न तो करतो, परंतु इथेही त्याचा नेम काही लागतच नाही. निराशेने आणि घाबरलेल्या अवस्थेत तो त्या नवख्या मशिनजवळ जाऊन तपासणी करतो, परंतु फलित शून्यच. त्याचा वेळेस आतमध्ये सुखरूप असलेले अमेरिकेचे अध्यक्ष मूर यांना बाहेर यायचे असल्याने काचेवर बोटांनी सिक्रेट कोड लिहितात आणि ओस्कारीला बटन दाबायचे सुचवतात. दरवाजा उघडला जातो आणि मूर बाहेर पडतात. तोपर्यंत ओस्कारी घाबरून दूर पळालेला असतो. 

एकमेकांना जोखत ते दबकतच एकमेकांशी संवाद साधायला लागतात आणि मूरच्या लक्षात येतं, की या घनदाट जंगलात आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला ओस्कारीची नितांत गरज आहे. ही बाब ओस्कारीच्या लक्षात येताच, हा लहानगा मूरला जंगलाची भयानकता आणि केवळ आपलाच पर्याय असल्याच्या मिजाशीत त्याच्या नियमांचा बांध मूरच्या भोवती घालून दादागिरीच करतो.

त्याच्या मर्जीने मजल-दर-मजल करत असतांना अध्यक्ष ओस्कारीशी संवाद साधत असतात आणि त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. 

इकडे मॉरीस आणि हजार यांनी आखलेल्या योजनेनुसार हजारने अध्यक्षांच्या विमानावर हल्ला करून त्यांना जबरदस्तीने जंगलात सोडले असते. जेणेकरून अध्यक्षांना ताब्यात घेणे सोपे होणा असते. अध्यक्षांच्या पाठोपाठ मॉरीसही सुरक्षारक्षकांवर गोळीबार करून विमानातून पॅराशूटच्या साह्याने जंगलात उडी मारतो आणि अध्यक्षांच्या शोधार्थ निघतो. त्याची आणि हजारची भेट होते आणि ती सर्व मंडळी शोध-मोहिमेवर निघतात. त्यांच्या नजरेस ‘पराशूट पॉड’ जेव्हा पडतो तेव्हा त्यांना अत्यानंद होतो. ते ‘पराशूट पॉड’ उघडतात, परंतु त्यात अर्थातच अध्यक्ष नसतात. थोडी अजून शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अध्यक्षांची कोणीतरी सुटका केलीय आणि तो एक लहान मुलगा आहे. त्या दोघांच्या शोधार्थ ही तमाम मंडळी कूच करतात. तर अमेरिकेत अध्यक्षांच्या कार्यालयात त्यांची शोध मोहीम सुरु होते. उपाध्यक्ष स्वत: जातीने त्यावर लक्ष ठेऊन आहेत.
आपण शिकार करू शकणार नाही आणि आपली प्रतिष्ठा राखली जावी म्हंणून वडिलांनी मारून फ्रीजमध्ये हरणाचे मुंडके कापून आणून ठेवलेले असते. हे बघितल्यानंतर ओस्कारीला खूप वाईट वाटते आणि तो तेथून निघून जायला लागतो आणि नेमकं तेव्हाच मॉरीस तेथे अवतरतो.

अध्यक्षांच्या हातात मशीनगन असूनही ती त्यांना वापरता येत नसल्याने, ते आयतेच मॉरीसच्या ताब्यात येतात. हजारही तेथे पोहोचतो आणि अध्यक्षांना फ्रीजमध्ये घालून नेण्याची योजना आखली जाते. ते हेलिकॉप्टरने फ्रीज उचलून जायला निघतात आणि ओस्कारी अचानक धावत जाऊन त्या फ्रीजवर उडी घेतो. फ्रीज उघडून अध्यक्षांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो. ही बाब मॉरीसच्या लक्षात येताच तो ओस्कारीला पाडून टाकण्याचा प्रयत्न करतो. मग दोघेही फ्रीजमध्ये सुरक्षितपणे बसतात आणि झाडांवर आपटल्यामुळे दोरी तुटून फ्रीज नदीत कोसळतो. ते कसेबसे फ्रीज मधून बाहेर पडतात आणि त्यांच्या नजरेस अध्यक्षांचे विमान पडते. ते त्या विमानात शिरतात. परंतु मॉरीस आणि हजार त्यांच्यावर हल्ले करतात. तेवढ्यात अध्यक्षांना कल्पना सुचते आणि ते कॉकपिटसह हवेत झेप घेतात. मॉरीसच्या नजरेस पडल्यानंतर मॉरीस त्यांच्यावर गोळीबार करतो. त्याचवेळेस आत्मविश्वास गमावलेला ओस्कारी मॉरीसवर बाण सोडतो. हा प्रयत्नही निकामी ठरतो असे वाटते,

परंतु मॉरीस कोसळतो. आपला मुलगा आता काही परतत नाही या विवंचनेत असलेल्या ओस्कारीच्या वडिलांना अचानक धक्का बसतो कारण ओस्कारी आणि अध्यक्ष दोघेही डोंगराआडून अवतरतात. ओस्कारी वडिलांना अध्यक्षांची ओळख करून देतो आणि अध्यक्ष त्यांना सांगता की तुमचा मुलगा हा एक शूरवीर आहे आणि त्यानेच मला या महाभयंकर संकटातून वाचवलेय.इकडे अमेरिकेहून आलेली सेना अध्यक्षांच्या जवळ पोहोचते. ओस्कारीला मानसन्मानपूर्वक पुरस्कार दिला जातो.
लहान मुलांनी आवर्जून बघावा असाच हा चित्रपट आहे.

N C Deshpande
एनसी देशपांडे


९४०३४९९६५४