सर्वात वर

बासरीच्या आणि व्हायोलिनच्या सुरांनी चिंब भिजले जनस्थान कलारंगचे रसिक

नाशिक – बाहेर पावसाचा गारवा आणि कलारंगच्या मैफिलीत मारवा इतका सुरेख संगम अनुभवायला भाग्य लागते. जनस्थान कलारंगाच्या (Janasthan Kalarang) या आठवड्याच्या मैफिलीत सुप्रसिद्ध बासरीवादक, संगीतकार मोहन उपासनी यांच्या बासरीच्या सुरांनी मनाला भुरळ घातली व नामवंत व्हायोलिन वादक अनिल दैठणकर यांच्या व्हायोलिनच्या स्वरांनी रसिकांना एक वेगळाच आनंद दिला.

बाहेरच्या वातावरणाने होरपळलेल्या मनाला या सुरेख संगीत एक मेजवानीने बराच दिलासा मिळाला. जनस्थान कलारंगची (Janasthan Kalarang) संकल्पना सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या करंजीकर यांची असून जनस्थान व्हाट्सअप ग्रुप चे एडमिन अभय ओझरकर, सदस्य स्नेहल एकबोटे, आदिती मोराणकर, गणेश शिंदे,निलेश गायधनी यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे. जनस्थान परिवारामध्ये अनेक नामवंत कलाकार, तंत्रज्ञ, शिल्पकार, मूर्तिकार, चित्रकार, पत्रकार, लेखक आहेत. कलावंतातली कला जिवंत राहायची असेल, बहरायची असेल तर त्याला सराव हवा हे समजून जनस्थानने कलारंग या मैफिलीची सुरुवात केली. या मैफिलीत कलेच्या सर्वच प्रकारांचा आस्वाद दर शुक्रवारी जनस्थानचे रसिक प्रेक्षक घेतात व यापुढेही घेत राहणार आहेत. गेले दोन शुक्रवार (Janasthan Kalarang) आनंद अत्रे व ज्ञानेश्वर कासार यांच्या गायनाने तृप्त झालेल्या श्रोत्यांना या शुक्रवारी मात्र बासरी आणि व्हायोलिन यांच्या सुरेख मैफिलीची मेजवानी होती.

मैफिलीचा शुभारंभ प्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांनी केला. संध्याकाळच्या कातरवेळी तुही रे,अजीब दास्ताँ है ये , ये शाम मस्तानी, रोजा जानेमन या गाण्यांनी रसिकांची संध्याकाळ रमणीय झाली तर बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद देण्यासाठी मोहन उपासनींनी रिमझिम गिरे सावन, मेरे नयना सावन भादो ही गाणी बासरीतुन थेट रसिकांच्या मनात पोहोचवली. काही चित्रपटातून बासरी हे वाद्य हिरोच्या हातात दाखवल्यामुळे त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालं आहे. अशाच एका चित्रपटाची बासरीची धुन सगळ्यांची वाहवा मिळवुन गेली. त्यानंतर संगीतकार आणि व्हायोलिन वादक अनिल दैठणकर यांच्याकडे मैफिलीची धुरा सोपवल्या नंतर त्यांनीही रसिकांना तृप्त केलं. होशवालों को खबर क्या, तुझसे नाराज नही जिंदगी, लग जा गले ,यु हसरतों के दाग या गाण्यांना एकत्र गुंफून त्यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली‌. एका पाठोपाठ शुक्र तारा मंद वारा, एक प्यार का नगमा है, जाने कहा गये वो दिन या गाण्यांनी रसिकांना मोहिनी घातली. या मैफिलीची सांगता भैरवी रागाच्या सुरावटीमधील धून वाजवून करण्यात आली आणि परत एकदा पुढच्या शुक्रवारची वाट बघत, बाहेर पडणाऱ्या पावसाचा गारवा आणि मैफिलीचा मारवा मनात ठेवून रसिकांनी कलारंगचा (Janasthan Kalarang) निरोप घेतला.