सर्वात वर

सोलापूरातील शिक्षक रणजितसिंह डिसलेनां मिळाला ७ कोटीचा ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूर – सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणारा युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली.असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाइन, अमेरिका आणि उत्तर कोरियातील ५० हजार मुलांची ‘पीस आर्मी’ त्यांनी तयार केली. त्यातून त्यांनी परस्पर सौहार्द टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. या शैक्षणिक प्रयोगासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे.