सर्वात वर

छलांग

एनसी देशपांडे

पार्श्वभूमी

मानवी जीवनात ‘खेळ, क्रीडा आणि कला’ यांना अनन्यसाधारण महत्व आहे. पुर्वी शाळांमधून ‘खो-खो, कबड्डी आणि मलखांब’ हे मैदानी खेळ शिकवले जात. मग हळूहळू ‘टेनीक्वाईट, टेबल-टेनिस आणि बॅडमिंटन’ अशा श्रीमंती खेळांचा जमाना सुरु झाला. ‘क्रिकेट, गोल्फ आणि पोलो’ हे अती महागडे खेळ सर्वांनाच परवडणारे नव्हते. तरीही समाजातल्या प्रत्येक स्तरातले लोक आपापली ‘आवड, क्षमता आणि आर्थिक कुवत’ यानुसार आपलं मन रिझवतांना शारीरिक व्यायामही करतात. आजच्या युगात मैदानी खेळांची जागा जरी ‘संगणक आणि मोबाईल’ वरील खेळांनी घेतली असली तरीही मैदानी खेळांसाठी मुलांना स्पेशल क्लासेस लावण्याची नवीन टूम निघालीय. तरीही कॉर्पोरेट जगतात एचआर सेमिनार्समध्ये मैदानी खेळाचेच दाखले दिले जातात, हे विशेष. सिनेमा सृष्टीनेही मैदानी खेळांवरील चित्रपटांची निर्मिती करून बॉक्स-ऑफिसवर गल्ला जमवल्याचे दिसून येते. ‘चक दे. मेरी कोम, भाग मिल्खा भाग, गोल्ड, दंगल, लगान आणि छीछोरे अशी काही चित्रपटांची नावे वानगीदाखल देता येतील. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक-हंसल मेहता यांनी ‘छलांग’ या चित्रपटाला पेश केलंय. हमखास यशाची हमी देणारा कलाकार ‘अजय देवगण’ निर्मात्याच्या स्वरूपात या चित्रपटाला लाभल्याने एकुणात प्रक्रीया सुलभ झाली. सध्याच्या OTT प्लॅटफॉर्ममुळे सुपरस्टारविना यश लाभू शकते, हा शोध निर्मात्यांना लागल्याने अनेक प्रतिभावान कलाकार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘राजकुमार राव’, ज्याने आपल्या समर्थ अभिनयातून अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्याच्यासोबत नुसरत भरुचा, मोहम्मद झीशान अय्युब, सतीश कौशिक, सौरभ शुक्ला, ईला अरुण, नमन जैन, गरिमा कौर, बलजिंदर कौर या कलाकारांनी दिग्दर्शकबरहुकुम आपापली जबाबदारी पार पाडल्याने अगदी साधंसुधं कथानक असलेला हा चित्रपट यशस्वी ठरलाय.

कथासंहिता

हरयाणातील एक छोटंसं गाव, तेथील शाळा आणि सामान्य घरातील विद्यार्थी सोबत घेऊन या चित्रपटाची कथा बांधलीय. त्या शाळेत पिटी शिक्षकाची नोकरी करणारा ‘मनजित हुडा उर्फ मोंटू ‘(राजकुमार राव) जीवनात कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करू शकत नसल्याने ‘हरकाम्या’ असतो. त्याला संपूर्णपणे ओळखणारे परंतु मैत्रीच्या नात्याने त्याच्या सोबत सावलीसारखे असणारे, मार्गदर्शक आणि सल्लागार ‘शुक्ला सर(सौरभ शुक्ला), शाळेची मुख्याध्यापिका ‘उषा गेहलोत(ईला अरुण) वडील(सतीश कौशिक), आई(बलजिंदर कौर) आणि मित्र डिम्पी चौताला(जतीन सरना) या गोत्यावळ्याचा ‘कम्फर्ट झोन’ मध्ये मोंटू बेजबाबदारीने जीवनाचा आनंद घेत असतो. त्याला शाळेत कम्प्यूटर शिकवणारी नवीन शिक्षिका नीलिमा(नुसरत भरुचा) भेटते आणि पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. तिचं मन जिंकण्याचा तो खूप प्रयत्न करतो. परंतु तिच्या आईवडिलांना त्यानेच एकदा अकारण त्रास दिला असल्याने तिच्यासहित तिचे आईवडीलही त्याच्यावर नाराज असतात. त्याचबरोबर एके दिवशी अचानक नवीन रुजू झालेले आय.एम. सिंग(मोहम्मद झीशान अय्युब) सर मुलांना शास्त्रशुद्ध पिटी शिकवतांना दिसतात आणि त्याला एक चॅलेंजच निर्माण करतात. शालेय शिक्षणात पिटी हा विषय सक्तीचा झाल्याने शाळेला हा निर्णय घ्यावा लागतो. आजवर त्याने मुलांना सिरीयसली काहीही शिकवलं नसल्याने, त्याच्यावर त्यांना असिस्ट करण्याची पाळी येते. सोबतच ते निलूशीही जमवून घेत असल्याने त्याच्या मनात नोकरी सोडून देण्याचा विचार येतो. मात्र निलु त्यावेळी त्याला पळपुटा न बनता सामना करण्याचा सल्ला देते आणि मदतीचे आश्वासनही.इथून चित्रपटाला आणि मोटूच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते आणि तो मुख्याधिकला भेटून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी निर्माण करतो. तिचा या गोष्टीला पूर्ण नकार असतो परंतु शुक्ला सर मदतीला धावून येतात आणि मुख्याध्यापिका बाईंना समजावून सांगता आणि ‘आय.एम.सिंग सर आणि मोंटू’ यांना आपापली टीम निवडून तयार करण्याची जबाबदारी देण्यात येऊन त्यांच्यातील सामना आयोजित केला जातो. या दोन प्रशिक्षकामधे लायक उमेदवार निवडण्याची ही प्रक्रिया हा या चित्रपटाचा उत्तरार्ध. मग ‘कबड्डी, धावणे आणि बास्केटबॉल’ अशा तीन खेळांची निवड होते. पहिल्यांदा सिंग सरांना टीम निवडण्याची संधी दिल्याने ते उत्तमोत्तम खेळाडू निवडतात. मात्र मोंटू पुस्तकी किड्यांना सोब घेऊन स्वत:ची टीम तयार करतो. या प्रक्रियेत त्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये पालकांचा असहकार, मुलांची नकारात्मक मानसिकता या मुख्य बाबी असतात.

सादरीकरण

आशयघन संहिता, उत्तम इंटरप्रिटेशन आणि दिग्दर्शन, सोबतच विषयाला बांधील राहून सर्वांनी केलेला अभिनय यामुळे हा चित्रपट आवश्यक तो परिणाम साधू शकलाय. मुख्याध्यापिका बाईं आणि शुक्ला सर यांच्या निकोप, विश्वासार्ह आणि गाढ नातेसंबंध, सुशिक्षित, स्वतंत्र विचारांची, डोळस प्रेम करणारी आणि व्यवहारी नीलिमा, आपल्या नाकर्त्या मुलातील गुण हेरून त्याला भक्कम पाठींबा देणारे मोंटूचे वडील आणि मित्रत्वाच्या नात्याने मोंटूवर निस्सीम प्रेम करणारे शुक्ला सर या बळांवर मोंटू ही लढाई लढतो आणि जिंकतोही, हा या चित्रपटाचा यु.एस.पी. दिग्दर्शक हंसल मेहता आणि राजकुमार राव या दुक्कलीने आजवर अनेक यशस्वी चित्रपट दिलेत. तसंच बघायला गेलं तर ही हरयाणातल्या एका लहान गावातली गोष्ट. परंतु त्याला लेखक दिग्दर्शक हंसल मेहता याने पहिल्यांदाच आपला जॉनरपेक्षा वेगळ्या धाटणीने खेळाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट करून समाजाला एकुणात मानवी आयुष्यातील महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकलाय. त्याने दिग्दर्शित केलेली ‘स्कॅम १९९२’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय. या चित्रपटाची संहिता जरी सामान्य दिसत असली तरीही एका लहान गावाचा फील येईल असे ‘लेखन, वास्तव मांडणी, दिग्दर्शन आणि सादरीकरण’ यामुळे हा चित्रपट मनाला भावतो. यातील कोणतीही पात्रे एकमेकांना मारक ठरत नसल्याने आवश्यक तो कंटेंट यशस्वीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि त्याचा साकारात्मक परिणाम जाणवतोही. संहितेनुसार हरियाणवी शब्दोच्चार, वाक्यांची मांडणी आणि आवश्यक तेवढाच अभिनय यामुळे, ही पात्रे खरी-खुरी भासायला लागतात. त्याचबरोबर प्रत्येक पात्रासाठी निवडलेली कलाकार मंडळी, हे यशप्राप्तीसाठी पूरक ठरते.

राजकुमार राव या कलाकाराने ‘मोंटू’ उत्तम साकारलाय. या चित्रपटातील तो एक प्रमुख पात्र असून हिरो नाही. हिरो नसल्याने कथानकाला खलनायकाची गरज भासत नाही. स्त्री पात्र जरूर आहे, पण ती नायिका नाही. यातील सर्व पात्रे मिळून लेखक आणि दिग्दर्शकाने कल्पिलेलं कथानक अतिशय तरलतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. ‘मोंटू आणि आय.एम. सिंग’ हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी जरूर आहेत, परंतु ते एकमेकांना पाण्यात पहात नसतात, हे विशेष. आपली टीम तयार करण्यासाठी ‘मोंटू’चे गावठी प्रयत्न, हेच त्याच्या यशाचं गमक आहे. प्रत्यक्ष सामना घडताना दिग्दर्शकाने प्रेक्षकांना प्रेरित आणि उत्साहित करण्यात कोणतीच कसूर ठेवली नाही. यातील ‘संघर्ष, सामना, कुरघोडी आणि मात’ याचा उहापोह केला नसून सर्वांनाच एक शिकवण दिलीय. त्यामुळे उतम कथानक, संहिता, पटकथा, पात्रांसाठी केलेली कलाकारांची निवड, दिग्दर्शन आणि सादरीकरण यामुळे हा चित्रपट सकारात्मक आणि सुखद ‘छलांग’ मारण्यात यशस्वी होतो.

N C Deshpande
एनसी देशपांडे

Mobile-९४०३४ ९९६५४