सर्वात वर

मनोरंजनाची मजा न्यारी : सुरज पे मंगल भारी

श्रीराम वाघमारे, नाशिक

दिवाळी म्हटलं की मोठ्या बनरचे आणि बड्या स्टारकास्टचे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतात आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळतो. दिवाळीत प्रदर्शित होणारा चित्रपट म्हणजे हमखास यश असं जणु समीकरणच आहे. पण यंदाची दिवाळी याला अपवाद ठरली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली चित्रपटगृहे जरी सुरू झाली असली तरी यंदाच्या दिवाळीत नविन चित्रपट प्रदर्शित करण्यास निर्मात्यांमध्ये फारसा उत्साह दिसुन आला नाही. त्याला कारणही तसंच होतं. कोरोनाचे सावट  आणि OTT चा पर्याय आताशा अंगवळणी पडलेला असतांना प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतील का हे प्रश्नचिन्ह होतेच.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या “सुरज पे मंगल भारी” या चित्रपटाने मात्र ही रिस्क उचलली. लॉकडाऊन नंतर प्रथम झळकलेल्या या चित्रपटाचं स्वागत मात्र अतिशय थंड झालं. चित्रपटाला अल्प प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याचप्रमाणावर टिकादेखील झाली. पण हा चित्रपट बऱ्यापैकी मनोरंजन करणारा आहे. काही द्विअर्थी संवाद असले तरी कुटुंबासह एकत्र पाहण्यासारखा आहे.

चित्रपटाचे कथानक हे १९९५च्या काळात घडते. मधुमंगल राणे हा एक वेडींग डिटेक्टीव्ह. विवाहेच्छुक मुलींसाठी आलेल्या स्थळांची म्हणजेच मुलांची माहिती काढुन ती मुलीच्या घरच्यांना पुरविणे हा त्याचा व्यवसाय. त्या अनुषंगाने आजवर अनेकांचे विवाह मोडण्यात तो यशस्वी ठरला आहे.

दुसऱ्या बाजुला सुरज ढिल्लन हा लग्नाळु तरूण. दुध डेअरी हा ढिल्लन परिवाराचा व्यवसाय. पण काही केल्या सुरजचे लग्न जमत नाहीय. त्या मागचं कारण मात्र चित्रपटात स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मंगल हा सुरजचे देखील लग्न मोडण्यास कारणीभुत ठरतो.आणि इथुनच सुरज आणि मंगल यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच रंगते. पुढे कथेत अनेक वळणे येतात. त्यात सुरज-तुळशी यांची प्रेमकथा, तुळशीचे खरे रूप, काव्या गोडबोले ही मंगलची लग्न झालेली प्रेयसी, तिचा विचित्र नवरा आणि इतरही अनेक मजेशीर पात्र.

मुळात चित्रपटाची कथा वेगळी आहे. त्यात नाविण्य आहे. हलक्याफुलक्या प्रसंगांनी अभिषेक शर्मा या दिग्दर्शकाने केलेली हाताळणी पण उल्लेखनीय. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही की उगाच कुठे रेंगाळतही नाही. जोडीला बऱ्यापैकी जमुन आलेलं गीतसंगीत. नाही म्हणायला पुर्वाधापेक्षा उत्तरार्धात पकड थोडी सैल होते. पण एकंदर परिणाम मात्र कमी होत नाही. चित्रपट दोन घटका मनोरंजन नक्कीच करतो.

पण तरी काही गोष्टी अधिक उण्या आहेतच. मधुमंगल राणेच्या भूमिकेसाठी मनोज बाजपेयीची निवड चुकीची वाटते. एकतर तो मराठी वाटत नाही की सुप्रिया पिळगांवकर या अभिनेत्रीचा मुलगा. खरंतर या भुमिकेसाठी एखाद्या मराठी भाषिक अभिनेत्याची वर्णी लागायला हवी होती. तरूणपणीच्या अमोल पालेकर सारखा एखादा नट अधिक शोभुन दिसला असता. असे असले तरी मनोज बाजपेयीने बऱ्यापैकी अभिनय केला आहे. ही गोष्ट सोडली तरी बाकी चित्रपट जमुन आला आहे. सुप्रिया पिळगांवकर आणि फातिमा सना शेख या दोघी मात्र मायलेकीच्या भुमिकेत एकदम चपखल. फातिमाने तर तुळशी हे मराठी पात्र उत्तमच साकारले आहे. तिची तुळशी मात्र अनेकांना रूचलेली नाही. (चुल आणि मुल हेच स्त्रीचं विश्व ही मानसिकता कधी बदलणार???? एखादी या चाकोरीतुन बाहेर पडुन वेगळं काही करू इच्छित असेल तर ते अजुनही स्वीकारलं जात नाही). दिलजीत दोसांझ अभिनयात कुठेही कमी पडलेला नाही. त्याचा संपूर्ण चित्रपटातील वावर सुखावणारा आहे. अन्य सहाय्यक भुमिकांमधे अन्नु कपुर (आता लुक एकदम बदललेला आहे), विजय राज, मनोज पावा, सीमा पावा, नेहा पेंडसे या सगळ्यांनीच उत्तम साथ दिली आहे.

शीर्षक गीत, बसंती, ये लडकी ड्रामेबाज है, वारेया, बडबॉईज सारखी गाणी सध्याच्या ट्रेंडनुसार तरूणपीढीला आवडतील अशीच आहेत. हिंदी चित्रपटात मराठी संवाद, गाणी पाहणं यात पण एक आनंदच. पंजाबी मुलगा आणि मराठी मुलगी यांची प्रेमकथा, शेवट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारखा रेल्वे प्लॅटफॉर्मवर.. असा मसाला पण यात आहेच. ९५चा काळ दाखवण्यासाठी पेजर, एसटीडी बुथ, टेपरेकॉर्डर यांचा केला गेलेला वापर योग्य असला तरी पुर्णपणे तो काळ उभा करता आलेला नाही ही पण एक खटकणारी बाब. तसे  हे कथानक आजच्या काळातही घडतांना दाखवता आले असते. १९९५चा अट्टाहास का ते समजले नाही.

बाकी मल्टीप्लेक्सच्या जमान्यातील एक मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून “सुरज पे मंगल भारी” कडे पाहता येईल. योग्यवेळी तो प्रदर्शित झाला असता तर चांगला चालला असता. पण लॉकडाऊन नंतरच्या काळात आल्याने त्याची पुरती वाट लागली आहे असेच म्हणावे लागेल.

श्रीराम वाघमारे, नाशिक