सर्वात वर

मुलांचा स्क्रीन टाईम कमी कसा करता येईल ?

डॉ. स्वाती गानू टोकेकर 

How To Reduce Children’s Screen Time ?

पूर्वी ज्या मुलांना आपण मोबाईलला हातही लावू देत नव्हतो त्यांना घे तो मोबाईल आणि बस अभ्यासाला असं म्हणावं लागतंय.13-14 वर्षापर्यंत मुलांना अजिबात मोबाईल देऊ नये असं वाटणा-या पालकांची आता फारच अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात आणि अर्थात यापूर्वीही मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढल्याच्या ,त्याच्यावर अवलंबून असण्याच्या ,मोबाईल, टॅब, टी.व्ही ॲव्हलेबल  नसला की अस्वस्थ ,बेचैन, संताप, डिप्रेशन,येणा-या ,ॲडिक्शनच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुलांना कितीही सांगितलं तरी ती ऐकत नाहीत. फार कडक निर्बंध घातले तर चोरून रात्री, मध्यरात्री नाहीतर बाथरुममध्ये जाऊन ऑनलाईन राहतात. पालक अक्षरशः हतबल, चिंताग्रस्त झाले आहेत.अगदी दोन वर्षांचं मूलसुद्धा लीलया मोबाईल, टॅबवर ‘यू टयूब’ लावू शकतं हे कौतुकाने आईवडील सांगतात हे दुर्दैव. 

मुलांचा हा प्रश्न सोडवण्यापूर्वी थोडा मोठ्यांचा विचार करु या.

1) दिवसभरात मोबाईल, टी.व्ही ,टॅब,लॅपटॉप सगळं मिळून एकूण किती वेळ तुमचा स्क्रीन टाईम होतो ते तपासून पहा.

2) आपण स्क्रीनवर जे पाहतो ते का पाहतो आहोत कारण काय मनोरंजन, ज्ञान, टाईमपास, माहिती नेमकं काय ते स्वतःला विचारा.

3) आपण सगळेजण किंवा कुटुंबाबरोबर विशेषतः मुलांशी बोलताना, नवरा -बायको एकमेकांशी बोलताना मोबाईल चक्क बाजूला ठेवून गप्पा मारतो का ?

4) मी आणि माझं कुटुंब 7-8 तासांची पूर्ण झोप घेतं का ?

5) मला मोबाईल, टी.व्ही न पाहता जास्तीतजास्त किती वेळ लांब राहता येतं ?

तुम्हाला वाटेल प्रश्न मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा हा आहे आणि तुम्ही पालकांनाच पिंज-यात उभं करताय.तुमची शंका रास्त आहे पण मूल आपलं आहे आणि म्हणूनच स्वतःपासून सुरुवात करायला हवी.मुळात या गॅझेटस् वर आपण काय पाहतो यावरुन आपल्याला कळेल की मी आणि माझी मुलं जो स्क्रीन टाईम घालवतो तो योग्य,उपयोगी आहे की अयोग्य आणि वेळ वाया घालवणारा? इतके चॅनेल्स, ओटीटी प्लॅटफाॅर्म्स ,यू ट्यूब, फेसबुक, इनस्ट्राग्राम यासारखी लोकप्रिय  इंटरनेटची असलेली बालकं ह्यातून सतत आपल्यावर माहिती ,मनोरंजन यांचा मारा होत असतो.पण निवड करण्याचा अधिकार आणि बुद्धी आहे न आपल्याजवळ? मग त्यातलं मला काय आणि का बघायचंय असा विचार करण्याची सवय आपण ,आपली मुलं यांना लावा.मला हे पाहिल्यावर काय मिळणार आहे  ? काय मिळालं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे.

शाळा, प्रोजेक्ट यामुळे तर तरूण मुलं त्यांच्या आवडीच्या अनेक गॅझेटस् मध्ये तासन् तास असतात.गेमिंगमध्येही सुरुवातीला उत्साह, मजा ,मस्त वाटतं.पण नंतर विशिष्ट चॅलेंजेस,गेम्स लेव्हल अचीव्ह करणं,रॅकिंग मिळवणं त्यातून मग अस्वस्थता निर्माण होते. मेंदूवर,शरीरावर होणारे त्याचे परिणाम इतके टोकाचे आहेत की शेवटी कौन्सिलिंग किंवा सिरियस केसमध्ये सायकॅट्रिस्टची मदत घ्यावी लागते.फेसबुक,इनस्टाग्रामवर मुलं विचित्र,डेंजरस चॅलेंजेस घेतात. मुलींच्या फोटोजचा चुकीचा वापर होतो.पण मुलं झपाटलेली असतात.कळत असतं समोर खड्डा आहे तरी आत्मघातकीपणाने  वागतात.मी तर मोठया वयाच्या, स्त्रिया,पुरुष यांना रोज फोटो टाकून त्याच्या लाईक, कमेंटससाठी तळमळताना पाहिलंय तर मग मुलं तर अजाणच असतात.

तरीही मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी काही गोष्टी नक्की करता येतील. 

1) मुलांना ‘स्क्रीन टाईम ‘ठरवूनच द्या. 

2) मी का पाहतोय,काय पाहतोय,मला यातून काय मिळणार आहे हा विचार करायला शिकवा.

3) जेवताना, गप्पा मारताना तुम्ही आणि मुलांनाही या गॅझेटस् ना बंद ठेवायला सांगा. 

4) एक दिवस चक्क इलेक्ट्रॉनिक गॅझेटस् चा उपास करा पहा किती गोष्टी करता येतील.पत्ते, लगोरी, दोरीच्या उडया, गाण्याच्या भेंड्या, चित्र काढणं.जे तुम्हाला आवडतं पण करतच नाही.असे छंद जोपासून सुद्धा किती आनंदात वेळ जातो ते पहा.

5) घरातल्या सगळ्यांची 8 तास झोप होऊच द्या. 9.30 ला सगळं बंदच करा.

6) मुलांसाठीची काही चांगल्या, त्यांना आवडतील अशा साईटस् आहेत त्या शोधून काढता येतील. पॅरेन्टस् ग्रुप मधून हे काम होऊ शकेल.

7) आपला किती वेळ यात जातोय ह्याची नोंद खरंच एक दिवस केली तर समजेल की आपण आपल्या आयुष्याचं सोनं करतोय की माती ?

8) मुख्य म्हणजे ह्या  आभासी ,व्हर्चयुअल जगात आणि वास्तव जगात रिॲलिटी मध्ये काय फरक आहे ते मुलांना लिहून काढायला सांगा. या विषयावर त्यांच्याशी चर्चा करा कारण ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं सांगतील.

मुलांना सायबर गुन्ह्यांची गंभीरता नककी सांगा.सायबर गुन्हा  शाखेत काम करणा-या ऑफिसरचं  व्याख्यान सोसायटी,शाळेत ॲरेंज करायचा आग्रह धरा.

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की इंटरनेट म्हणजे वाईटच नाही.त्याद्वारे जी माध्यमं आपण वापरतो ती कशी आणि किती सुरक्षिततेने वापरायला हवीत याचे शिक्षणच देण्याची गरज आहे. मिडिया हे एक दुधारी शस्त्र आहे. ते वापरण्याची प्रगल्भता,मिडिया एज्युकेशन केवळ मुलांनाच नव्हे तर मोठया वयाच्या लोकांना ही देण्याची गरज आहे. आपलं पर्सनल लाईफ सर्वांसाठी खुलं करणारी जशी मुलं आहेत तशी मोठी माणसं ही आहेत.आपणही या जाळ्यातून बाहेर पडा आणि मुलांनाही सुरक्षित करा.

Swati-Tokekar
डॉ. स्वाती गानू टोकेकर