सर्वात वर

शिस्त न पाळल्यास आता पूर्ण लॉकडाऊन अटळ – छगन भुजबळ

पालकमंत्री यांनी दिला निर्वाणीचा इशारा

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.नागरीकांनी स्वतःची जवाबदारी आता घेतली पाहिजे नियमित मास्क लावणे व डिस्टन्स ठेवणे असे नियम पाळले पाहिजे.आजही जणू काहीच झाले नाही अशा अविर्भावात लोक रस्त्यावर फिरता आहे.भाजी मार्केट मध्ये गर्दी आहे.जीवनावश्यक च्या नावाखाली वेगळेच काहीतरी सुरु आहे.रुग्ण संख्या नियंत्रित होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी न केल्यास संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) करणे अटळ आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.   

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस विशेष महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर ,अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या समन्वय उपजिल्हाधिकारी वासंती माळी, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. अनंत पवार ,आरोग्य विभागाचे अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले,कोरोना रुग्णांना रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन पुरवठा प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जाऊन देखील या बाबींची टंचाई भासत आहे.कोरोना रुग्णांना वेळेवर रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी घटना व्यवस्थापक म्हणून वरीष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. तसेच  कोविड रुग्णालयांना प्रधान्याने रेमडेसिव्हिर पुरविण्यात येवून रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन पुरवठ्याच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच कोविड रुग्णालयात रुग्णांचे व्यवस्थापन योग्य होत आहे किंवा नाही याची देखील तपासणी करण्याबाबतची सूचना, पालकमंत्री श्री. भुजबळ  यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केली आहे. 

शहरात व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलीस विभागाने  ‘ब्रेक द चेन’  मोहिम हातात घेणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर, सॅनिटायर्झचा आणि मास्कचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत नागरिकांना केले आहे. 

कंन्टेमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कंन्टेमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, जेणेकरुन वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसेल.  गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

परवानगीधारक कोविड रुग्णालयांनी साधनसामुग्रीचा यथोचित वापर करावा : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जिल्ह्यातील औषध पुरवठा अक्सिजन पुरवठा अतिशय मर्यादित असून या सर्व सामग्रीचं अतिशय काळजीपूर्वक वापर सर्व हॉस्पिटल नी करावा अशी सूचना सूरज मांढरे यांनी दिली. याबाबत पथके नियुक्त करण्यात येणार असून या बाबीची शहानिशा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

पोलीस यंत्रणा, महानगरपालिका व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी पालकमंत्री यांना सादर केली.