सर्वात वर

आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

वडिलांच्या निधना नंतर काही तासातच मोनालीचे निधन 

नाशिक – आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे (Monali Gorhe) यांचे निधन झाले आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता काल रात्रीच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाला काही तास उलटतात तोच मोनालीने ही अखेरचा श्वास घेतला आज दुपारी ११ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. 

उत्कृष्ट महिला नेमबाज व आपल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवणाऱ्या मोनाली गोऱ्हे (Monali Gorhe) यांनी नाशिकमध्ये अनेक खेळाडूंना घडवलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयानेही मोनाली यांच्या कार्याची दखल घेत तिची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आणि साऊथ एशियन गेम्स मध्ये १-२ पदकांवर समाधान मानणाऱ्या श्रीलंकन संघाला तब्बल ८ पदके पटकावली. नाशिक मधील फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल मध्ये मोनालीने अनेक वर्ष रायफल शूटिंगचे प्रशिक्षण दिले होते. 

दुर्दैवाने त्यांचे वडिल मनोहर गोऱ्हे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली व पाठोपाठ मोनालीला (Monali Gorhe) पण कोरोना संक्रमण झालं.त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काल रात्री ११च्या दरम्यान मोनालीचे वडिल मनोहर गोऱ्हे यांनी आपली जीवनयात्रा संपवली तर अगदी १२ तासांच्या अंतराने मोनाली यांनी आज सकाळी ११ च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातचं विशेषतः नेमबाजी, रायफल शूटिंग खेळाडुंचे अतोनात नुकसान झाले आहे.वडिलांच्या निधना नंतर काही तासातच मुलीच्या निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

श्रद्धांजली !
आंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसेच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे आज कोरोनामुळे दु:खद निधन झाले. आज उपचार सुरु असतांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काही काळातच मोनाली यांची देखील प्राणज्योत मालवली. ही अतिशय दु:खद बातमी आहे. मोनाली गोऱ्हे यांनी भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक, श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा तज्ञ कै.भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. क्रीडा प्रशिक्षक मोनाली यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रशिक्षक मोनाली व त्यांच्या वडिलांच्या निधनाने गोऱ्हे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय गोऱ्हे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर मृतांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ

मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.