सर्वात वर

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्य़ात पारा ८ अशांच्या खाली घसरणार ! – प्रा.किरणकुमार जोहरे

Maharashtra News Today- नवीन वर्षांचे स्वागत हाडे गोठणार्या कडाक्यांच्या थंडीने !

अंदाज नव्हे माहिती..!

पुणे: राज्यात २८ डिसेंबरपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे नवीन वर्षांचे स्वागत यंदा हाडे गोठणार्या कडाक्याच्या थंडी करावे लागणार आहे. देशाच्या राजधानीसह लडाख, सिमला आदी ठिकाणाच्या तापमानात मोठी घट झाली आहे. दिल्लीच्या तापमानात घट झाल्यानंतर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर ३ ते ८ दिवसात होत असतो असे वैज्ञानिक सत्य आहे. त्यामुळे आता २८ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान राज्यातील (Maharashtra News Today) काही भागात थंडीचा पारा तब्बल ५ अंशापर्यंत खाली येणार असून नागरिकांना हाडे गोठणार्या कडाक्याच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ थंडीचा सामना करावा लागेल, अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी जनस्थानला दिली.

उत्तरे कडून म्हणजे अफगाणिस्तानातून हिमालयाला वळसा घालून भारतात प्रवेश करणार्या पश्चिमी वार्‍यामुळे निर्माण होणारा क्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हा परीणाम असणार आहे असे या मागचे विज्ञान देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

देशातील लखाड, जम्मू-काश्मिर, शिमला आदी भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे देशाची राजधानी गारठणार आहे.

नुकतेच दिल्लीतील तापमान साडेतीन अंश सेल्सिअस एवढे कमी झाले अशी नोंद झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला नवीन वर्षांचे स्वागत करतांना सोबत कडाक्याची थंडीचा सामना देखील करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातही गारठणारी थंडी पडणार आहे. त्या खालोखाल पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीचे तापमान असा ढोबळ मानाने तापमानाचा आलेख असणार आहे. यंदा महाबळेश्वरला पुन्हा एकदा दव गोठून सफेद चादर पहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. तसेच जानेवारी महिन्यात रात्रीच्या वेळी नाशिक येथील निफाडचे तापमान काही कालावधीसाठी शुन्य अंश सेल्सिअसला घसरलेले देखील दिसून येऊ शकते.

द्राक्षांना तडे आणि अर्थव्यवस्थेला फटका !

उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे पिक घेतले जाते. साधरण: ५ अंशाच्या खाली तापमानात घट झाल्यानंतर द्राक्षाला तडा जाण्याची अधिक भिती असते. याशिवाय धुके आणि दव याचाही धोका असतो.

राज्यात थंडीची लाट येणार असल्याने तोडणीला आलेल्या द्राक्षांना तडा जाण्याची भिती आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी युद्ध पातळीवर द्राक्षांची तोडणी, विक्री आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. जेणे करून नुकसान टाळता येईल. अन्यथा तीस टक्के ते सत्तर टक्के एवढे द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम थेट द्राक्ष निर्यातीवर होऊन महाराष्ट्र व एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. विशेषतः उत्तर महाराष्ट्राला व पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष पिकाला हा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे हि प्रा.जोहरे यांनी सांगितले. 

… अशी असेल ‘रेकॉर्ड ब्रेक’ थंडी

महाराष्ट्रातील विविध शहरात ‘रेकॉर्ड ब्रेक’ थंडी पुढील काही दिवसात पडल्याचे दिसून येईल.  राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात घट होणार आहे. यामध्ये मुंबई १५ अंशाच्या खाली तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. तर पुणे ६, नाशिक ५, औरंगाबाद ७, नागपूर ६, लातूर ८, कोल्हापूर, सातारा, सांगली १० तर परभणी जिल्ह्याचे तापमान जानेवारीत ५ अशांपर्यंत खाली जाण्याची दाट शक्यता आहे.

‘हेल्थ अलर्ट’!

राज्यातील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि विशेष करून लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हृदरोग, मधुमेह, दमा, अस्थमा आदी आजार असल्याने नागरिकांनीही थंडीपासून आपला बचाव करीत खबरदारी घ्यायला हवी. थंडीत नागरिकांनी आहारविहार योग्य वेळेवर घ्यावा. थंडीने त्रास झाल्यास घाबरून न जाता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असा हेल्थ अलर्ट हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी संपुर्ण महाराष्ट्रासाठी दिला आहे.

रब्बी पिकांसाठी ‘गुड न्यूज’ !

राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बी पिकांची पेरणी मोठ्या क्षेत्रावर झाली आहे. रब्बी पिकांना थंडी अधिक फायद्याचे असते. त्यामुळे ही थंडी गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना फायद्याचे ठरेल.

कांदा उत्पादकांची चांदी

येत्याकाळात येणारी थंडी हि कांदा पिकासाठी पोषक असल्याने कांद्याचे उत्पादन हे दिड ते दोन पट वाढू शकते अशी माहिती देखील हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.

Prof.-KiranKumar-Johare
भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे

‘न्यू नाॅर्मल’ आणि ‘यशाची गुरुकिल्ली’!

येत्या काळात करडई, तिळ, भुईमूग तसेच विविध तेलबिया आदी बहुपिक पद्धतीचा अवलंब भारतीय शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार आहे. रासायनिक खते,  किटकनाशके आदींच्या फवारणीने शेतीचा खर्च वाढतोच परंतु कॅन्सर सारखे असंख्य रोग देखील वाढत आहे.असे तज्ज्ञांचे मत आहे. 

परीणामी देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च व ताण वाढत आहे. अशावेळी मातीतील आॅरगॅनिक कार्बन (सेंद्रिय कर्ब) वाढवत सेंद्रिय खते वापरल्याने निर्माण होणार्‍या व दिर्घायुष्य देणार्या शेती उत्पादनाला भारतातील शहरांमध्ये तसेच संपूर्ण जगभर विविध देशात दहा ते बारा पट किंमत वाढ मिळत प्रचंड मागणी असल्याने असे उत्पादन घेणारे शेतकरी यापुढे आर्थिक उन्नती करु शकतील. बदलत्या वातावरणाच्या न्यू नाॅर्मल मध्ये केवळ देशी बियाणे तग धरू शकते त्यामुळे असे बियाणे वापरणारे व वाढवणारे शेतकरी हेच यापुढे अग्रेसर असतील अशी ‘यशाची गुरुकिल्ली’ देखील हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.