सर्वात वर

खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे – गेल्या काही दिवसापासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेस नेते खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं आज पहाटे ५ वाजता  निधन झाले. गेल्या २३ दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते.ते ४७ वर्षांचे होते.काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

राजीव सातव (Rajiv Satav) यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २५ एप्रिल पर्यंत त्यांची प्रकृती चांगली होती उपचारांना प्रतिसाद देत होते मात्र त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर व्हेंटिलेटरद्वारे उपचार सुरू होते. मागील २३ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर आज  त्यांची प्राणज्योत मालवल्याचंच वृत्त आलं.त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

राजीव सातव (Rajiv Satav) हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. सामान्य कार्यकर्त्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद,आमदारकी त्यानंतर ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते , दोन वेळा खासदारकी आणि काँग्रेस पक्षाची सर्वोच्च वर्किंग कमिटीचे ते सदस्यही  होते.महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतही काही दिवसांपूर्वी त्यांचं नाव आघाडीवर होतं. काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये तसेच गेल्या काही वर्षांच्या काँग्रेसच्या प्रवासात राजीव सातव (Rajiv Satav) यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. 

राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. राजीव सातव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवला होता. 

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं होतं.राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.