सर्वात वर

Nashik : वॉक्हार्ट हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या सूचना

कोरोनाच्या रुग्णाला दिले अवाजवी बिल : बिल न भरल्याने रुग्णाचा डिस्चार्ज नाकारला 

नाशिक – कोरोना रुग्णाला जास्त रक्कम आकारून ती रक्कम अदा न केल्याने रुग्णालयातून तीन दिवस डिस्चार्ज न केल्याप्रकरणी वॉक्हार्ट हॉस्पिटल (Wockhardt  Hospital) वर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य वैद्यकीय विभागास दिल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टिमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी दिली आहे. 

 नाशिक शहरातील वॉक्हार्ट हॉस्पिटल (Wockhardt Hospital) मध्ये ६८ वर्षीय व्यक्ती कोरोनाने बाधित असल्याने काहीदिवसापूर्वी उपचारासाठी  दाखल झाली होती.रुग्णाला दिलेल्या बिलात जादा रक्कम आकारली होती त्यामुळे ती  रक्कम रुग्णाने न दिल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून या रुग्णावरील उपचार बंद करण्यात आले होते.तो रुग्ण बरा झाल्यानंतर ही त्याला घरी सोडत नव्हते या सर्व बाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर वॉक्हार्ट हॉस्पिटलच्या (Wockhardt Hospital) कोरोना अतिदक्षता विभागात सी बी आर एस सिस्टिमचे प्रमुख सुरेश खाडे यांच्या सोबत मुख्य लेखा परीक्षक बी.जे सोनकांबळे व डॉ.पावसकर यांच्या पथकाने पाहणी केली.त्या रुग्णाची समक्ष भेट घेऊन त्याच्याशी चर्चा करून त्याची तक्रार समजावून घेतली. 

त्यावेळी वॉक्हार्ट हॉस्पिटलचे  (Wockhardt Hospital) डॉ. निलेश गुमारदार व डॉ. नीलिमा जोशी हे उपस्थित होते.तक्रारदार रुग्णाने वॉक्हार्ट प्रशासनाबाबत केलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन वाढीव आकारलेली रक्कम कमी करण्याच्या सूचना वॉक्हार्ट प्रशासनास देण्यात आल्या तसेच त्वरित त्या रुग्णास घरी सोडण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. तसेच या गंभीर तक्रारीबाबत आरोग्य वैद्यकीय विभागास हॉस्पिटलवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टिमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी दिली