सर्वात वर

नाशिक मधील शाळा ४ जानेवारी पासून सुरू होणार

नाशिक– जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ३ जानेवारी पर्यंत बंद असलेल्या नाशिक मधील शाळा (Nashik school)आता ४ जानेवारी पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या भीतीने नोव्हेंबर महिन्यातील आढावा बैठकीत शाळा ३ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आज जिल्ह्याधिकारी कार्यालयात कोरोना संबंधी जिल्ह्या प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शहरासह ग्रामीण भागातील ९ वी ते १२ वीचे वर्ग होणार सुरू

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा ४ जानेवारी पासून सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टिने जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य या प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन करावे. तसेच कोविड लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्व तयारी करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहेत,असे पालकमंत्री छागन भुजबळ यांनी सांगितले 

शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच आरोग्य यंत्रणेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोविड चाचण्या करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जेणेकरून शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत सर्व संबंधित शिक्षक व शाळेतील कर्मचारी वर्ग यांचा कोविड तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होवून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना अडचण निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व शाळांचे(Nashik school) निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व नियमित सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहिल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी  सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट येण्याची शक्यता कमी वाटते असे श्री भुजबळ म्हणाले. नाशिक शहरात व जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे.त्यात लवकरच कोरोनाची लस हि येणार असून सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्ह नाहीत.त्यामुळे शाळा (Nashik school)सुरु करण्यासाठी आता प्रशासना कडून हिरवा कंदील मिळाला आहे.

येत्या काही महिन्यात उपलब्ध होणाऱ्या कोविड लसीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मीती करण्यात येत असून या लसी देण्याचे प्रमाण व पद्धती देखील भिन्न आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच प्रकारची लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बैठकीत केले. याबाबत राज्य स्तरावर मुद्दा उपस्थित करण्यात येईल असे भुजबळ यांनी आश्वासित केले. 

लसीकरण मोहिमेसाठी नाशिक प्रशासन सज्ज

लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. या लसीकरणासाठी जिल्ह्यात ६५० लसीकरणाचे बुथ निर्माण करण्यात येणार असून एका बुथवर किमान १०० नागरिकांना एका दिवसात लसीकरण केले जाईल, या दृष्टिने प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. तसेच एक लस ही काही दिवसांच्या अंतराने दोन वेळा देण्यात येणार असल्याने त्याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणाकडून तयारी करण्यात येत आहे, अशी माहितीही पालकमंत्री  श्री. भुजबळ यांनी दिली आहे. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्यासह  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, मालेगाव महानगरपालिका आयूक्त दिपक कासार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिका नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, आगतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नंदापूरकर, डॉ. उत्कर्ष दुधडीया आदी उपस्थित होते.