सर्वात वर

नाशिकला मिळणार दररोज १०० मेट्रिक टन ऑक्सिजन

खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक :  नाशिकच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज लागते आहे. दोन दिवसापूर्वी ऑक्सिजन एक्सप्रेस ने नाशिकला ऑक्सिजनचे (Oxygen) दोन टँकर जरी मिळाले असले तरी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने कोरोना बाधितांवरील उपचारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला दररोज १०५ मे. टन ऑक्सिजनचा (Oxygen) पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली होती. या मागणीची अवघ्या चार दिवसात संबंधितांनी पुर्तता केली असून आता यापुढे नाशिकला दररोज १०० मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी वणवण सुरु होती. यामुळे गेल्या आठवड्यात डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेवून पुरेसा ऑक्सिजनची उपलब्धता करुन देण्याबाबत मागणी केली होती. खा. गोडसे यांनी डॉक्टरांच्या मागणीची दखल घेवून गुरुवारी (दि.२२) अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांसमवेत ऑक्सिजनच्या पुरवठाबाबतची पुरेशी माहिती जाणून घेतली होती. जिल्ह्यात आजरोजी विविध रुग्णालये, कोविड सेंटर आदी ठिकाणी पन्नास हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तेथील रुग्णांवरील उपचारासाठी शासनाकडून केवळ ७५ मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्यामुळे खा. गोडसे यांनी तात्काळ पत्रव्यवहार करुन संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वणीवरुन संपर्क करुन नाशिकसाठी १०५ मे. टन दररोज ऑक्सिजन पुरवठ्याची अवश्यकता असल्याचे पटवून दिले. त्यामुळे रुग्णांवरील पुरेशा उपचारासाठी दररोज १०५ मे. टन. ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली होती.


खा. गोडसे यांच्या मागणीची गंभीर दखल घेवून व नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सोमवारी (दि.२६) शासनाकडून नाशिकसाठी दररोज १०० मे. टन ऑक्सिजन साठा आरक्षित करुन वितरण करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिकसाठी १०० मे. टन ऑक्सिजन पुरवठ्याला शासनाने मान्यता दिल्याने कोरोना बाधितांवरील उपचारासाठीची सोय झाल्याने जिल्हावासियांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नुकतेच दोन दिवसांपूर्वी खा. गोडसे यांनी स्वखर्चातून कोरोना बाधितांवरील उपचारासाठी शंभर ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिली आहे

_________

नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ ऑक्सिजन (Oxygen) साठवणूक केंद्र आहेत. यापैकी दोन केंद्राकडून प्रत्यक्ष हवेतून ऑक्सिजनची निमिर्ती केली जाते. मात्र ते प्रमाण अत्यल्प आहे. शासनाकडून दररोज केवळ ८५ मे. टन ऑक्सिजनचा कोटा मंजूर झाला होता. त्यापैकी केवळ ७५ मे. टन ऑक्सिजनसाठा नाशिकसाठी उपलब्ध होत होता. मात्र खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून आता नाशिकसाठी दररोज १०० मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागते आहेत. याशिवाय ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची देखील वणवण भटकंती सुरु आहे. त्यामुळे शासन दरबारी पाठपुरावा करुन नाशिकसाठी दररोज १०० मे. टन ऑक्सिजनचा साठा मंजूर करुन घेतला आहे. यापुढेदेखील ऑक्सिजनच्या साठ्यासंदर्भातील समस्या सोडविण्यात येतील.

खासदार हेमंत गोडसे, नाशिक


–