सर्वात वर

न्यूटन

पार्श्वभूमी

मानवी जीवनात ‘सिस्टीम’ हा रोजच्या वापरातला शब्द असून आपला कुठलाही व्यवहार एका सिस्टीमशी निगडीतच असतो. माणसाच्या रोजच्या जीवनातील बहुताशी प्रत्येक ‘वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शासकीय’ कामासाठी आखलेली आणि नियमित व्यवस्था ही आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे माणूस या ठराविक व्यवस्थेच्या नीती-नियमांमध्ये बंदिस्त आहे. या व्यवस्थेच्या किंवा सिस्टीमच्या पलीकडे जाऊन विचार करणे, हमखास मूर्खपणाचे ठरते. आपली ‘बुद्धिमत्ता, कूवत आणि तार्किक विचारसरणी’ यांच्या आधारे एखाद्याने या सिस्टीमच्या बाहेर पडण्याचा जरासाही प्रयत्न केला तर त्याला वेडं ठरवण्यात येतं, ही पण एक सिस्टीमच आहे. या सिस्टीमचे सगळेच नीती-नियम योग्यच आहेत, असं गृहीत धरणंही अयोग्यच. त्यातही विसंगती निश्चितपणे आढळते, परंतु त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. सिस्टीमच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्यांचा शेवट चांगला होतच नाही, हा अनुभव. 

‘न्यूटन’ हा चित्रपट म्हणजे एक ‘ब्लॅक कॉमेडी ड्रामा’ आहे. या चित्रपटाची निर्मिती मनीष मुद्रा, पटकथा मयंक तिवारी आणि अमित मसुरकर यांनी लिहिली असून दिग्दर्शन अमित मसुरकर यांनी केलंय. दिग्दर्शकाने वर नमूद एकुणात व्यवस्थेतील मूळ विसंगती उघड केलीय आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलंय. भारतीय लोकशाही, निवडणुका आणि व्यवस्थेतील गृहीतके यावर स्पष्ट उजेड पाडलाय. त्यासाठी यातील पात्रांच्या सहज बोलण्यातून आणि चर्चेतून लोकशाहीप्रणीत मुक्त-विचारसरणी, अधिकार आणि व्यवस्थेपुढे नतमस्तक झालेले आपण यावर अचूक बोट ठेवलंय. ही पात्रे संहिता आणि दिग्दर्शक बरहुकूम सूत्रधाराची भूमिका बजावतात. यातील पात्रे कोणी सुपरमॅन वगैरे नाहीत तर साधी-सुधी अशी या सिस्टीमचा एक भाग आहेत. धडधडीत डोळ्यादेखत होणारा भ्रष्टाचार निमुटपणे सहन करत जगणारी ही माणसं सिस्टीमला शरणागत आहेत. 

न्यूटन या नावाचा आणि सिनेमाच्या कथानकाचा तसा काहीही संबंध नाही. नूतन कुमार या मूळ नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करून न्यूटन हे नाव मुख्य पात्राला आणि सिनेमाला देण्यात आलंय. 

न्यूटन(राजकुमार राव) हा एक तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक माणूस. त्याची ही ‘क्वालिटी’ हा गूण की अवगुण याची त्याला अजिबात पर्वा नसते. त्यात त्याला सरकारी नोकरीची संधी मिळते आणि त्यातही निवडणूक अधिकारी पदावर त्याची नेमणूक होते, मग तर काय विचारायलाच नको. ज्या भागात कोणीही जायला तयार नाही, अशा छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात तो स्वत:हून जाण्याची इच्छा दर्शवतो. त्याचा हा अती प्रामाणिकपणा आणि तत्वनिष्ठता या गुणांचा(अवगुणांचा) वरिष्ठांना परिचय असल्याने, सांभाळून राहण्याचा सल्ला ते त्याला देतात. 

हा चित्रपट म्हणजे एकाच सिस्टीममधल्या दोन प्रवृत्तींमधला सामना आहे. एक ‘न्यूटन कुमार’ जो तत्वांशी बांधील आहे तर दुसरा सिस्टीमचा एक भाग मानून वरिष्ठांच्या हुकुमाचे पालन करणारा मेजर आत्मा सिंग. या चित्रपटात न्यूटनचं व्यक्तिगत आयुष्य, त्यातील घडामोडी, उलथापालथ आणि सरकारी काम नियमानुसार करण्याची तत्वनिष्ठता आणि अट्टाहास याचा उहापोह केलेलाय. छत्तीसगड जवळील केवळ ७६ मतदार असलेल्या नक्षलग्रस्त जंगलात लष्करी संरक्षणात गेलेल्या टीमचा दिवसभराचा व्यवहार, हेच या चित्रपटाचं कथानक. परंतु या काही तासांच्या घटनेतून लेखक आणि दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी एकुणात मानवी स्वभाव वैशिष्ठ्ये आणि प्रवृत्ती याचं दर्शन घडवलंय. प्रिसायडिंग ऑफिसर-निवडणूक अधिकारी म्हणून नेतृत्व करतांना न्यूटनची तत्वनिष्ठा, नियमानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची जिद्द, त्याला मिळणारा सहकार आणि असहकार या माध्यमातून एक महत्वाचा संदेश समाजाला दिलाय. एकीकडे लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असून प्रत्येकाला संधी दिलीच पाहिजे, या विचारांनी झपाटलेला ‘न्यूटन’, तर दुसरीकडे या जंगलात मतदान झाले नाही तर काय फरक पडणारय, अशा मतांचा सुरक्षा व्यवस्था देणारा मेजर आत्मा सिंग. हा इलाका खतरनाक आहे, नक्षलीवृत्ती सिस्टीमच्या विरोधात असून वेळ पडली तर जीवाला धोका निर्माण करतील, अशी भीती घालून या टीमला परतपाउली पाठवण्याचा चंग बांधलेला ‘मेजर आत्मा सिंग’ या विरुद्ध प्रवृत्तींचा सामना आहे. एकमेकांवर वाक्बाण, शह देत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन प्रवृत्तींचा संघर्ष सुरु असतांना, यावर सामान्य विचारसरणीचं प्रतिनिधित्व आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न न्यूटनचे सहकारी लोकनाथ(रघुवीर यादव), शंभुनाथ(मुकेश प्रजापती) आणि माल्को(अंजली पाटील) करतात.

दिग्दर्शकाने या चित्रपटात कंटेंट आणि कथानकापेक्षाही यातील ‘व्यक्तिगत, सामाजिक आणि राजकीय’ संदेशाला जास्त महत्व दिलंय. यातील पात्रांच्या बाबतीतही तोच नियम लागू केल्याने या व्यक्तिरेखा प्रभावी न ठेवता, त्यांच्या विचारांना जास्त महत्व प्राप्त होतं. तरीही ही पात्रे संदेशासाठी ओढून-ताणून घुसवलेली अजिबात वाटत नाही. कारण मूळ व्यवस्थेशी निगडीत एक महत्वाचा विचार स्पष्ट करण्याच्या उद्देशाने मांडलेली ही सर्कस उत्कृष्ट आणि प्रामाणिक आहे. देशाच्या सर्वांगीण आणि दूरगामी विकासाच्या, राज्यकर्त्यांच्या वल्गना फोल असल्याचे सत्य सर्वज्ञात आहे. त्यामुळे लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया म्हणजे केवळ एक नाटकच असतं, हेही सर्वांना माहिती आहे. अशा परिस्थितीत ‘न्यूटन’ सारखा एखादा हट्टी निवडणूक अधिकारी जीद्दीलाच पेटतो, तेव्हा केवळ दिखाऊपणा चालत नाही. म्हणून ‘मेजर आत्मा सिंग’ गावातील लोकांना दरडावून, धमकावून आणि बळजबरीने मतदानासाठी खेचून आणतो. तत्ववेड्या ‘न्यूटन’च्या हट्टापुढे नाही म्हटलं तरी ‘आत्मा सिंग’ नतमस्तक होतोच. परंतु त्यातही त्याची कृती केवळ दाखवण्यापुरतीच आणि उद्देश न्यूटन-पिडा आणि डोकेदुखी टाळण्याचाच असतो. त्याचबरोबर कोणताही अनर्थ घडू नये म्हणून त्याची एक सुरक्षा-व्यवस्था असतेच. त्यामुळे वेळेपूर्वी या सगळ्यांना सुखरूप परत नेण्याच्या जबाबदारीची जाणीव कर्तव्यता त्याच्याही ठायी असतेच, ही त्याची दुसरी बाजू. गेल्या अनेक वर्षांचा निवडणुकांचा अनुभव आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखरूपपणे बाहेर पडण्याची कला अवगत असेलेलं ‘लोकनाथ’ हे पात्र, म्हणजे अनिच्छेने सिस्टीमला शरण गेलेला सरकारी बाबू. ‘न्यूटन आणि आत्मा सिंग’ या विरुद्ध प्रवृत्तींच्यामध्ये सहजपणे वावरणारा लोकनाथ, प्रसंगांचा ताण कमी करण्यात यशस्वी ठरतो. तणावपूर्ण स्थितीतही दंडकारण्याचा संदर्भ, सीतेला विमानातून पळवून नेणारा पहिला वैमानिक ‘रावण’ विमानाचा रनवे अशी माहिती खात्रीने पुरवणारा ‘लोकनाथ’ रघुवीर यादव या कलाकाराने अतिशय ‘सहजतेने, सक्षमतेने साकारलाय. नक्षलग्रस्त भागातली ‘माल्को’ ही या टीमची ‘BLO- Booth Level Officer’ असते. तिला या भागाची, इथल्या प्रवृत्तीची,  नक्षलग्रस्त भागाचे प्रॉब्लेम्स, सरकारची अनास्था आणि एकुणात येथील निवडणूक प्रक्रियांची पूर्ण कल्पना असते. तिच्या परीने ती ‘न्यूटन’ला सगळी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. या भूमिकेसाठी तिची निवड तिने सार्थ ठरवलीय. 

विशेष म्हणजे या भुमिकेसाठी नाशिकच्या ‘अंजली पाटील’ हिची निवड करण्यात आली. ‘अभिनेत्री आणि दिग्दर्शिका’ या दोन्ही भूमिका तिने सक्षमपणे पार पाडल्यात. ‘देल्ही ईन अ डे, चक्रव्यूह, न्यूटन आणि तिचा अभिनय पहायला मिळतो. आजवर तिने इफ्फी-बेस्ट स्त्री कलाकार आणि श्रीलंकन चित्रपट विथ यु विदाउट यु’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिने ४३ वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये – सिल्व्हर पिकॉक अवार्ड, मिळवलाय. शिवाय २०१३ मध्ये ‘ना बंगारू तल्ली’ या तेलगु चित्रपटासाठी नॅशनल फिल्म अवार्ड आणि राज्य नंदी अवार्ड – उत्कृष्ट अभिनेत्री प्राप्त केलाय.

मुकाभिनय आणि केवळ डोळ्यातून बोलणारा ‘राजकुमार राव’ न्यूटनला पूर्णपणे न्याय देतो. तोच या चित्रपटाचा प्राण आहे. तरीही वेब-सिरीज मधून चमकणारा, गाजलेला ‘पंकज त्रिपाठी’ आत्मा सिंगच्या भूमिकेत आपली छाप सोडतो.

सादरीकरण हाच आत्मा असलेल्या या चित्रपटात अगदी साधं कथानक, साधे संवाद, वास्तववाद, प्रभावी चित्रण, उत्तम अभिनय याच्या बळांवर प्रक्षोभता, अतिरेक आणि टाळ्यांचे संवाद पूर्णपणे टाळलेलाय.

N C Deshpande
एनसी देशपांडे

एनसी देशपांडे

Mobile-९४०३४ ९९६५४