सर्वात वर

कलातीर्थच्या व्यासपीठावर रंगणार रुपेरी संगम सोहळा

नाशिक (प्रतिनिधी)-चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “कलातीर्थ लघुपट महोत्सव – २०२१” चे आयोजन  करण्यात आले आहे. शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड येथे १० जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता हा महोत्सव पार पडणार आहे. चंदेरी दुनियेत आपलं अढळपद कायम करणाऱ्या दोन महान कलावंताची घराणी “कलातीर्थ लघुपट महोत्सव – २०२१”च्या व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत. या रुपेरी संगमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली.

चित्रपटमहर्षी दादासाहेबांची १५० वी जयंती अनोख्या पध्दतीने साजरी करावी या उद्देशाने “कलातीर्थ”चे सदस्य कोल्हापूर येथे गेले होते.तेथे पेंढारकर कुटुंबियांना महोत्सवाची माहिती देऊन आमंत्रित करण्यात आले. दादासाहेब फाळके यांची नात स्वाती काळे तसेच भालबांचे नातू भरत दैनी आणि नात सई सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती हे या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. महोत्सवातील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. आयोजकांच्या वतीने फाळके व पेंढारकर कुटुंबीयांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या तसेच तिला संजीवनी प्रदान करण्यासाठी या दोन्ही कलावंतांचे योगदान सर्वश्रुत आहेच.त्यांना अभिवादन करण्याचा हा यशस्वी प्रयत्न कलातीर्थच्या चमूने केला आहे. यावेळी “कलातीर्थ”चे शौनक गायधनी, जयदीप पवार, अभिषेक पिंगळे, महेश चौधरी, तेजस बिल्दीकर, तेजस देव आदी उपस्थित होते.या लघुपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा रुपेरी संगम सोहळा रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.