सर्वात वर

ऑनलाईन प्रेम संबंध : सोशल मीडियाचा होतोयं गैरवापर

सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

आजकाल अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप त्या मार्फत  सोशल मीडियाचा (Social Media) मधील विविध अँप्लिकेशन वापरत नाही असे खूपच कमी जण असतील. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत आजकाल प्रत्येक जण स्मार्ट फोन शी परिचित आहे. मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असून, महिला देखील मोठया प्रमाणात दैनंदिन, कार्यालयीन कामकाजासाठी, व्यावसायिक कारणांसाठी, करमणुकीसाठी  विविध अँप्लिकेशन वापरताना दिसतात. टेकनॉलॉजि जशी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे तसेच सोशल मीडिया (Social Media) वर होणारे प्रेम देखील प्रचंड वेगाने वाढत आहे. ऑनलाईन प्रेम करण्याचा नवा ट्रेंड सध्या मोठया प्रमाणात पाहायला मिळतोय. वास्तविक  सामाजिक माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, माहिती होतात या प्लॅटफॉर्म चा  सुयोग्य वापर जर करता आला तर आपण खूप काही आत्मसात करू शकतो. अनेक सकारात्मक विषय, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक कार्य, आध्यत्मिक माहिती, आरोग्य या सारख्या असंख्य गोष्टी आपल्याला समाज माध्यमातून मिळतात. महिला तर अतिशय उत्साहाने नवीन नवीन अँप्लिकेशन शिकून, त्याबद्दल माहिती घेऊन ती हिरीरीने वापरतात.  महिला कुतूहलापोटी अनेक व्हाट्सअप, फेसबुक , इंस्टाग्राम अश्या समूहात सामील होतात. मोठया प्रमाणात माहितीचे आदानप्रदान, गप्पा, फोटो, विडिओ एकमेकांना शेअर करून सगळ्यांशी आपण कनेक्ट आहोत, अपडेटेड आहोत, आपल्याला समाजातील अनेक जण ओळखतात, आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असतात, आपण  सोशल मीडियाचा  वर खूप प्रसिद्ध आणि ऍक्टिव्ह आहोत याचा महिलांना सार्थ अभिमान वाटतो.

अश्या अँप्लिकेशन मधील ग्रुप्स  विषयी जर बघितलं तर, आपण जॉईन केलेल्या किंवा आपल्याला ऍड केल्या गेलेल्या ग्रुप मधील सर्व व्यक्तींचा आपल्याला परिचय नसतो. फारफार तर ग्रुप ऍडमिन ला आपण थोडंफार ओळखत असतो. अनेक ग्रुप मध्ये समूहातील सदस्यांनी त्यांचे नाव, गाव त्यांच्या नंबर समोर ठेवलेले नसते. त्यामुळे कोणकोण समूहात आहे याची बेसिक कल्पना सुद्धा आपल्याला नसते. कोणाचेही बॅकग्राऊंड, ठाव ठिकाणा उद्योग, व्यवसाय आपल्याला माहिती नसतो . अश्या परिस्थिती मध्ये देखील  महिला खूपच बेसावध पद्धतीने ग्रुप वर वावरताना दिसतात.  काहीवेळा ग्रुप मध्ये असलेले काही पुरुष सदस्य महिला सदस्यांना विनाकारण वैयक्तिक मेसेज, फोन करताना दिसतात. यावेळी  महिला कोणत्या पद्धतीने, कसा प्रतिसाद देते यावर पुढील कथानक अवलंबून असते. आपण पाहतो की आजकाल अनेक प्रेम कथांचा जन्म  सोशल मीडियाचा   मधूनच होतो आहे. प्रेमाच्या आणि प्रेम करण्याच्या संकल्पना मध्ये आमूलाग्र बदल आताशा झालेला दिसतो. 

सोशल मीडियावर (Social Media) ऍक्टिव्ह असलेल्या महिलांना वैयक्तिक मेसेज, फोन केलें जातात, त्यांचेशी ओळख वाढवली जाते, त्यांच्या फोटो च कौतुक केल जात आणि त्यांचेशी सातत्याने संवांद ठेवायला सुरुवात होते.  वैयक्तिक माहितीची देखील देवाणघेवाण होते.  सामाजिक माध्यमातून भेटणारी, ओळख झालेली प्रत्येक नवीन व्यक्ती चुकीची किंवा त्रासदायक नक्कीच नसते. पण काहीवेळा चुकीच्या लोकांना प्रतिसाद दिला गेल्यास, त्यांचा हेतू लक्षात न आल्यास, अथवा  जास्तच विश्वास ठेवल्या गेल्यास महिलांना स्वतः च्याच अश्या उतावीळ पणे वागण्याचा त्रास सहन करावा लागतो.

आपली जी स्वप्न, जे विचार, ज्या अपेक्षा प्रत्यक्ष जीवनात पूर्ण होत नसतात त्या पूर्ण करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यात काही चुकीचं नाही,  प्रत्येकाचं स्वतः च असं एक मन असत ज्यामध्ये तो स्वतः च्या फॅनटसी पूर्ण करण्याची स्वप्न पाहत असतो. आजकाल मोबाईल मुळे, अनेकांच्या संपर्कात राहता येत असल्यामुळे,  नवीन नवीन अँप्लिकेशन मार्फत संवाद साधने सोपे झाल्यामुळे आपली स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसतोय. सामाजिक माध्यमातून जी आभासी दुनिया आपल्याला खुणावत असते तिच्या किती आधीन जायचं हे ठरवणं प्रत्येकाला जमेलच असं नाही.  

महिला मुळातच भावनाप्रधान असल्याने त्यांना या स्वरूपाच्या आभासी प्रेमाची पटकन भुरळ पडते. महिलांना हे समजत नाही की जरी त्यांनी अश्या प्रकारच्या ऑनलाईन प्रेम प्रकरणात भावना गुंतवल्या असतील तरी त्या कोणत्या मर्यादेपर्यंत असाव्यात ?  चॅटिंग करताना आपली तसेच समोरच्याची भाषाशैली, भाषेचा दर्जा किती घसरू द्यावा, समोरून चुकीच्या विडिओ अथवा फोटो ची मागणी झाल्यास ती पूर्ण करावी का ? ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष ओळखत नाही, भेटलेलो नाही, किंवा अतिशय अल्प परिचय ज्या व्यक्तीबाबत आपल्याला आहे, त्याला आपले स्वतः चे  फोटो अथवा विडिओ अथवा आपली वैयक्तिक माहिती  अतिशय कमी कालावधी च्या परिचयात पाठवणे कितपत योग्य आहे?  समोरील व्यक्ती याचा गैरवापर करणे, ब्लॅकमेल करणे हा विषय तर खूपच वेगळा आहे यावर आपण सध्या तरी बोलणार नाही आहोत. 

हे सगळे करत असताना महिला मात्र समोरच्या व्यक्ती च चॅटिंग वर केलेलं हितगुज खरं समजून आपल्या सर्व भावना, विश्वास, प्रेम समर्पित करून त्याच्या  ऑनलाईन मागण्या पूर्ण करीत असते. आभासी आणि ऑनलाईन प्रेम पण महिला समरस होऊनच करते कारण ती त्या व्यक्ती पासून शरीराने दूर असली तरी मनाने पूर्ण गुंतलेली असते. पुरुष मात्र अश्या प्रेमाला किती गांभीर्याने घेतात ?  त्यांच्या भावना तितक्यात समर्पित असतात का? की केवळ काही मिनिटासाठी असे फोटो, विडिओ एन्जॉय करून ते विसरून जातात.!  

अश्या प्रकारचे सामाजिक माध्यमातून केलें गेलेले स्त्री पुरुषाचे प्रेम, पुरुषाने महिलेकडे याच माध्यमातून केलेल्या विविध मागण्या, भेटण्याचे, फिरण्याचे केलेले प्लॅन, दिलेली वचन किती तात्पुरती आणि पोकळ असतात हे समुपदेशन ला आलेल्या अनेक प्रकरणांमधून लक्षात येते.
सामाजिक माध्यम, त्यातून निर्माण झालेली प्रेमप्रकरण आणि महिलांची झालेली भावनिक कोंडी अथवा हार हि गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण एक सत्य उदहारण या ठिकाणी मांडणार आहोत. 

स्वाती (काल्पनिक नाव ) व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून तिला तिचा जुना महाविद्यालयीन  वर्गमित्र तुषार (काल्पनिक नाव ) भेटला.  तुषार बद्दल बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे स्वातीने थोड्याच अवधीत त्याच्या कडून प्रेमाबद्दल झालेल्या विचारणेला होकार दिला. दोघेही विवाहित होते आणि वेल सेटल होते. दोघांनी एकमेकांच्या जवळ येण्याची तयारी दाखवली आणि ऑनलाईन प्रेमात सतत संपर्कात राहणे, चॅटिंग करणे, एकमेकांच्या फोटो ची देवाणघेवाण करणे, कुठे भेटायचं, कस भेटायचं, कधी कुठे फिरायला जायचं यासारख्या बाबींवर चर्चा व्हायची. विडिओ कॉल च्या माध्यमातून एक मेकांशी बोलणे, बघणे जमेल तसें सुरु होते. ऑनलाईन पद्धतीनेच स्वातीने आपलं सर्वस्व तुषार ला अर्पण केलेल होत.  तिला ठाम विश्वास होता की तुषार प्रत्यक्षात देखील तिच्या जीवनात आहे आणि कायम असणार आहे. ते लवकरच प्रत्यक्ष भेटणार, बोलणार आणि जसे चॅटिंग मध्ये बोलतो तसेच प्रत्यक्ष सगळं आपल्या आयुष्यात होणार अशी अपेक्षा स्वाती ठेऊन होती. स्वाती मनापासून तुषार चा विचार करणं, त्याच्या वर प्रेम करणं तसेच त्याला आपला जिवाभावाचा प्रियकर  समजून राहत होती.

स्वाती तुषार च्या प्रेमात अखंड बुडाली होती आणि त्याच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ,आतुरता तिला अस्वस्थ करत होती. त्यामुळे तिच्या मार्फत तुषार ला सतत भेटीची विचारणा होत होती. तुषार मात्र तिला ऑनलाईन प्रेमातच खेळवत होता. तरी आज न उद्या आपल्या जीवनात तुषार नक्कीच आहे आणि कायम असेल या भरवश्यावर ती त्याला मागेल तसें फोटो, विडिओ, मेसेज पाठवत होती. तोही त्यावर भरभरून दाद देत होता, त्यामुळे स्वाती त्यात समाधान मानत होती. कालांतराने तुषार मध्ये मध्ये गायब होऊ लागला, मध्येच तिला ब्लॉक करणे, ब्लॅक लिस्ट ला टाकणे असं  देखील व्हायचे. कामात होतो, बाहेर गावी होतो, आजारी होतो, घरी होतो अशी कारण सांगून तो  तिला टाळायचा. स्वाती ला मात्र तो एकदिवस जरी बोलला नाही तरी अस्वस्थ होणं, घालमेल होणं असे परिणाम जाणवत होते. 

इतपर्यंत स्वाती ने सांगितल्यावर तिला विचारलं किती दिवसापासून असे सुरु आहे ऑनलाईन प्रेम?  तिने सांगितलं तीन वर्षांपासून ! उत्तर ऐकून कोणालाही धक्का बसेल. किती दिवस एखादी बाई वेड्यात निघू शकते आणि किती दिवस एखादा पुरुष बाईला वेड्यात काढू शकतो याच मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे तुषार आणि स्वाती असच वाटून गेलं.  स्वातीने पुढे सांगितले की तिने तीन वर्षात अनेकवेळा तुषार कडे प्रत्यक्ष भेटण्याची, एकत्र येण्याची, बोलण्याची, असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने जगण्याची, अनुभवण्याची विनंती केली होती. दरवेळी तुषार ने तिच्या पदरात निराशा टाकली होती. स्वाती तुषार प्रती इतकी समरस होती की ती त्याच्या शिवाय जगणं अशक्य समजत होती. का टाळत होता तुषार तिला भेटायला ?  ज्या गोष्टी तो फोन वर बोलू शकत होता, पाहू शकत होता, त्या प्रत्यक्षात अनुभवायची त्याची तयारी का नसावी ? फक्त ऑनलाईन प्रेमाच्या गप्पा मारणं, एकमेकांना नको त्या अवस्थेत ऑनलाईन बघणं, हा प्रेमप्रकरणांचा नवा प्रकार कधीपासून उदयाला आला?  काय साध्य होत आहे अश्या प्रेमप्रकरणातून ?  कोणते समाधान, शांती मिळते ? तुषार ला स्वतः ला यात आनंद वाटत असला तरी स्वाती चा त्याने विचार का केला नाही ?  तुषार ला जर प्रत्यक्ष भेटण्यात, नातेसंबंध कायमस्वरूपी टिकवण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता तर त्याने स्वाती ला असं आशेला लावणं योग्य आहे का ?  त्याला विवाहबाह्य संबंधातील रिस्क नको होती? की हे नाते प्रत्यक्षात आणण्यासाठी  करावी लागणारी कोणतीही जबाबदारी  त्याला घ्यायची नव्हती ? की त्याला प्रत्यक्ष भेटीगाठी साठी करावे लागणारे प्रयत्न करायचे नव्हते ?  त्याची यासाठी मानसिक, आर्थिक तयारी नव्हती ? की स्वाती च्या भाव भावनांपेक्षा त्याला स्वतः ची पत प्रतिष्ठा जास्तच महत्वाची होती ?  कशातच त्याला स्वतः ला पुढाकार घ्यायचा नव्हता ? की तो स्वाती चा वापर फक्त टाइम पास म्हणून करीत होता ? पुरुष असून, कमावता असून, वेल सेटल असून  सुद्धा तो स्वाती साठी, तिच्या समाधानासाठी,  ती करत असलेल्या प्रेमासाठी काहीच हालचाल करत नव्हता.   

स्वाती सारखं  बेभरोसे  केलेलं प्रेम, गुंतवलेली भावना, समर्पण  महिलेसाठी किती त्रासदायक होते याची थोडीही जाणीव पुरुषाला नसावी का ? अश्या पुरुषांना जे पाहणं आवडत, अथवा त्यांचं मनोरंजन होऊ शकत अश्या अनेक गोष्टी इंटरनेट वर फुकटात आणि मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु वास्तविक जीवनात जेव्हा एकादी स्त्री तुम्हाला तुमच्या मागणीनुसार अतिशय खाजगी असे सर्व काही पाठवत राहाते, सगळ्या मर्यादा विसरून जाते, तुमच्याशी बोलत राहाते  तेव्हा स्त्री च्या भावना त्याच्यात अडकलेल्या असतात.  त्यातून तिलाही काही अपेक्षा असतात. तिने त्या व्यक्ती वर डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो.   

महिलांनी स्वतः लाच अश्या प्रकरणात गुंतू न देणे रास्त राहील असे वाटते. कारण  सोशल मीडियाचा (Social Media) वापर करताना जो काही प्रोटोकॉल आपल्याकडून किंवा समोरच्या कडून वेळीच पाळला गेला नाही तर असा भावनांचा ऑनलाईन खेळ सुरु होतो आणि मग प्रेमात पडायला वेळ लागत नाही. व्हाट्सअप वरील ईमोजी देखील किती पटकन वापरतो आपण! मग त्या इमोजीचा अर्थ काय, त्यातून काय प्रकट होते याचा थोडासुद्धा विचार आपण करीत नसतो. आपण कोणताही विचार न करता पाठवलेले ईमोजी, विविध इमेज, वैशिष्ट्य पूर्ण चित्र  समोरच्याच्या मनात काय विचार आणि भावना निर्माण करतात याची जाणीव महिलांनी तसेच पुरुषांनी देखील ठेवणे आवश्यक आहे.अनेकदा पुरुष देखील चुकीचा हेतू ठेऊन संबंध प्रस्थापित करणाऱ्या महिलांना प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद देऊन स्वतः च्या समस्या वाढून घेतात. 

आपल्याला समोरची व्यक्ती पूर्ण पणे ओळखू आल्याशिवाय, ती खरंच त्या दर्जाची असल्याशिवाय, तीच आणि तुमचं भविष्यातील नातं खरंच कायमस्वरूपी टिकू शकणार असल्यास, त्या नात्याला प्रत्यक्षात आणण्याची दोघांची हिम्मत आणि  तयारी असल्याशिवाय,  ती तुमच्या भावनांची कदर करणारी असल्यास, तसेच फक्त आणि फक्त तुम्हाला खरंच वास्तविक आयुष्यात साथ देण्यासाठी सकारात्मक असल्याशिवाय असं कोणताही ऑनलाईन प्रेम प्रकरण मग ते लग्नाअगोदर च असो अथवा लग्न झाल्यानंतर च विवाहबाह्य असो, कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुषांमधील असो, महिलांनी ते पुढे नेणं म्हणजे एखाद्यासाठी फक्त आणि फक्त टाइम पास चे साधन बनून राहण्यासारखं आहे.  समोरच्या व्यक्तीची आपण प्रायोरिटी आहोत का, असलो तरी किती प्रमाणात, त्याच्या आयुष्यात, मनात आपले स्थान काय, अस्तित्व काय  हे जाणून घेऊन नच पुढे मार्गक्रमण करणे योग्य राहील असे वाटते. 

आपल्या शाश्वत आयुष्यात कोण किती काळ खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी राहणार आहे याचा शहानिशा केल्याशिवाय अश्या कोणत्याही समाज माध्यमाच्या फ्लॅटफॉर्म वरून तयार झालेले नाते संबंध, व्हरचुएल शारीरिक संबंध आपल्या खऱ्या आयुष्याला देखील डॅमेज करतात. ऑनलाईन रिलेशनशिप  मध्ये समोरच्याची गरज संपली, तुमच्यातील इंटरेस्ट संपला की ती व्यक्ती तुम्हाला टाळायला सुरुवात करते, तुमच्याशी न बोलण्याची विविध कारण आणि सबबी सांगू लागते. तुम्ही स्वतः त्या व्यक्ती पुढे लाचार होऊ लागतात आणि तुमची मनस्थिती बिघडायला सुरुवात होते.  

स्वाती मागील तीन वर्षांपासून तुषार सोबत जे काल्पनिक प्रेम मोबाईल च्या माध्यमातून करत होती त्यात तिचा प्रत्येक मूड, प्रत्येक काम, प्रत्येक मिनिट हा तुषार च्या वागणुकीनुसार, चॅटिंग नुसार, मेसेज नुसार सतत परिणाम करीत होता. ज्या दिवशी तुषार तिच्या शी फोन वर बोलणार नाही,  तो ऑनलाईन असून सुद्धा जेव्हा तिच्या मेसेज ला उत्तर देणार नाही, जेव्हा तिचा फोन उचलणार नाही, तेव्हा तेव्हा ती डिस्टर्ब होत होती. तिच्या तब्येतीवर, कामावर, कुटुंबातील इतर नातेसंबंध वर त्याचा परिणाम तिला जाणवू लागला होता. सातत्याने मोबाईल चेक करणे, त्याचा मेसेज आला आहे का, तो काय म्हणतोय यावर तीच लक्ष असायचा. तिने स्वतः मार्फत सर्वतोपरी प्रयत्न करून देखील तुषार अजून प्रत्यक्ष भेटणं, बोलण किंवा ऑनलाईन अनुभवलेल, बोलण्यातून केलेलं प्रेम प्रत्यक्षात आणायला तयार नव्हता. तीन वर्षाचा प्रदीर्घ कालावधी स्वाती ने आपल्या आयुष्यात कोणीतरी असं आहे फक्त या जाणीवेवर घालवला होता. एका शहरात राहून, एकमेकांना कॉलेज जीवनापासून ओळखत असून, दोघेही उच्च शिक्षित आणि अत्यंत चांगल्या घरातील असून देखील त्यांचं हे प्रेम प्रत्यक्षात आलं नव्हतं तर स्वातीने तुषार ला समोर ठेऊन भविष्या साठी पाहिलेली स्वप्न तर खूपच लांब होती. त्यामुळे आजमितीला स्वाती समुपदेशन साठी आली होती. 

त्यामुळे रिलेशनशिप  कोणतीही असो ती जर प्रत्यक्षात येणार असेल आणि प्रामाणिक पणे मनापासून दोघेही इन्व्हॉल होणार असतील तरच ती पुढे नेण्यात अर्थ आहे. आपल्या सोयीसाठी, कामासाठी आपण मोबाईल वापरत आहोत आणि त्यातून काही सकारात्मक ज्ञान, माहिती मिळाली तर ती आत्मसात करणार आहोत याची पूर्ण जाणीव महिलांनी ठेवणे आवश्यक आहे.  हाच मोबाईल आपल्या दुःखाचे कारण बनू शकतो, आपली मानसिकता पूर्ण पणे बिघडवू शकतो, आपलं कौटुंबिक, सामाजिक आयुष्य उद्वस्त करू शकतो याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे असे वाटते.  

या ऑनलाईन प्रेमप्रकरणात दोन्ही बाजूने सगळ्या स्टेप्स इतक्या पटापट घेतल्या जातात आणि त्या फिजिकल लेवल ला जाऊन पोहचतात की त्यात कोणतीही प्रेमाची भावना, प्रेम फुलवण्याची प्रक्रिया, जीव लावणं, एकमेकांची काळजी घेणं,  एकमेकांना पूर्ण समजून घेणं, एकमेकांचे स्वभाव तसेच गरज समजून घेणं, दोघांची  जुळत असलेल्या नात्यासाठी कितपत तयारी आहे,  ते नातं निभावण्याची कितपत मनापासून इच्छा आहे हे जाणून घेणं याला वेळच घेतला जात नाही. यामुळे अश्या ऑनलाईन प्रेमकहाण्या जितक्या वेगाने पुढे जातात तितक्याच वेगाने त्यातलं नावीन्य संपूर्ण त्या संपुष्टात देखील येतात.  

खऱ्या, निष्पाप आणि प्रांजल प्रेमाची अनुभूती अश्या प्रकरणात अनुभवायला मिळत नाही. अतिशय प्रॅक्टिकल पद्धतीने, महिला प्रोफेशनल असल्यासारखं महिलांना गृहीत धरून त्यांना या ऑनलाईन संबंधात पुरुषाकडून अनुभव मिळतोय. ऑनलाईन प्रेम, संबंध फक्त आपल्याला काहींना काही नवीन फिजिकल पाहायला मिळेल त्याचा वरचेवर आनंद घ्यायला मिळेल, चार दोन रोमँटिक डायलॉग मारले की महिला स्वतः च्या सगळ्या मर्यादा ओलांडू शकते असे समजून आणि यासाठीच केलें जातात का? हि गोस्ट विचारात घेणे आवश्यक आहे. 


आजकाल निर्माण होऊन फोफावत चाललेले  हे आभासी प्रेमाचे मोहजाल महिलांना खूप लवकर आकर्षित करते आहे. आपल्या सौंदर्याची स्तुती, आपल्यासाठी वापरलेले गोड गुलाबी शब्द, मग ते कोणत्याही सामाजिक माध्यमातून असोत त्यातील हेतू वेळेत लक्षात घेणे अनिवार्य आहे. एखाद्या महिलेशी  अश्या प्रकारे संवाद साधणारा पुरुष त्याचवेळी इतरही महिलांवर असे ऑनलाईन प्रेम करून स्वतःच्या करमणुकीसाठी मटेरियल मागवत नसेल याची काय शाश्वती आपल्याकडे असते.  एकच प्रेमाचा मेसेज किंवा सिम्बॉल एकाचवेळी अनेक मैत्रिणींना फॉरवर्ड करणारे महाभाग देखील  सोशल मीडियावर (Social Media) सराईतपणे स्वतः चा हेतू साध्य करतांना दिसतात.  व्हाट्सअप वर प्रत्येकीसाठी वेगवेगळे स्टेटस ठेऊन प्रत्येकीला भावनिक दृष्टीने वेड्यात काढणारे शातीर लोक पण सोसिअल मीडिया वर दिसतात.


कोणत्याही महिलेचा जरासा सुंदर अथवा मॉड फोटो डीपी ला, प्रोफाइल ला दिसला की लगेंच तिने तो आपल्यासाठीच ठेवला आहे आणि ती तशीच असावी, प्रयत्न करायला काय हरकत आहे इतकी उथळ विचारसरणी ठेऊन वावरणारे स्वतः ला सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून घेणारे हाय प्रोफाइल व्यक्तिमत्व देखील यात मागे नाहीत.

आपण शालेय किंवा महाविद्यालयीन मुलामुलीबाबत बोलताना म्हणतो की यांची पिढी मोबाईल मुळे बिघडत आहे, आजकाल ची मुलं अतिरिक्त प्रमाणात मोबाईल वापरतात. आजकाल मुलं  सोशल मीडियाच्या (Social Media) आधीन गेलेले आहेत. पण याठिकाणी आपण स्वतः आत्म परीक्षण करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपली तिशी पार केलेली, चाळिशीला आलेली किंवा त्यापुढे गेलेली  पिढी जर इतके वय होऊन पण ऑनलाईन प्रेमप्रकरणात रमून जाऊ शकते, तर नवीन पिढीला  दोष देण्यात काय तथ्य आहे. यातून इतकंच सांगावस वाटतं की आपल्या वास्तववादी जीवनापासून दूर जात आपण जी आभासी दुनिया स्वीकारत आहोत, आपण ज्याला प्रेम समजत आहोत, ज्या अनुषंगाने  रिलेशनशिप वाढवत आहोत, ते सगळं बहुतांश वेळा फोल आणि पोकळ असल्याचेच  कालांतराने लक्षात येते. त्यामुळे असे प्रत्यक्ष अस्तित्वातच नसलेलं प्रेमाचं, आपलेपणाचा, अंतःकरणापासून निर्माण न झालेलं नातं आपल्याला आयुष्यभर सोबत करणार का हा विचार नक्की करावा.

सोशल मीडियाचा(Social Media) हाताळतांना महिलांना अनेक विचित्र अनुभव येत असतात. महिला रात्री च्या वेळी कोणत्याही अँप वर ऑनलाईन दिसली की तिच्याबद्दल चुकीचाच विचार पुरुषाच्या मनात का यावा?  ती रात्री अपरात्री कोणाशी तरी चॅटिंग च करीत असेल, किंवा रात्री ऑनलाईन आहे म्हणजे कोणाशीही गप्पा करायला  उपलब्ध असेल अशीच विचारसरणी आढळून येते. कोणत्याही स्त्रीला दिवसभर च्या घरातील, ऑफिस मधील घरातील कामातून रात्री निवांत वेळ मिळाला म्हणून ती काही आवडीच्या पोस्ट वाचत असेल,  काही नवीन शिकत असेल. एखादी स्त्री रात्री जागून आपल्या पाल्याचा अभ्यास घेताना काही माहिती मोबाईल वर शोधत असेल, किंवा एखादी स्त्री आपल्या पतीसोबत, कुटुंबासोबत दिवसभरात आलेल्या  काही विनोदी पोस्ट, वैचारिक पोस्ट चा आस्वाद घेत असेल.अथवा ती तीच कोणतंही महत्वाचं वैयक्तिक  काम मोबाईल वर करीत असेल ! पण इतका परिपक्व विचार आपल्या समाजात स्त्री च्या बाबतीत केला जात नाही हे दुर्दैव आहे. रात्री ऑनलाईन दिसणाऱ्या स्त्री ला ताबडतोब हाय, हॅलो,,झोपली नाहीस का?  झोप येत नाही का?  बिझी आहात का?  असे बालिश मेसेज पाठवून ती आता रात्रभर संबंधित व्यक्ती शी चॅटिंग करणारच आहे असा समज करून घेतला जातो. महिलांनी कोणतेही अँप वापरताना अश्या कोणत्याही ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तीला कोणत्या वेळेस किती एंटरटेन करायचं हे ठरवणं आवश्यक आहे. कारण इथूनच संबंधित महिलेबाबत चे पहिले मत बनवले जाते आणि स्वाती सारखा पुढचा त्रासदायक प्रवास वर्षानुवर्षे करावा लागू शकतो. 

बहुतांश स्त्रियांच भावविश्व खूप मर्यादित असत. कथा, कांदबरी, सिनेमा नुसार प्रेमाच्या भाबड्या संकल्पना त्यांच्या डोक्यात असतात. परंतु प्रॅक्टिकली बाहेर च जग किती फास्ट फॉरवर्ड झालंय, रिलेशनशिप  किती तकलादू झाल्या आहेत हे त्यांनी वेळेत समजून घेणं आणि स्वतः च्या काल्पनिक विचारशक्ती ला आवर घालणं महत्वाचे आहे. ज्या नात्यातून काही सकारात्मक आउटपुट निघू शकेल, खरोखरच मानसिक शांती लाभेल, हक्काचं, प्रेमाचं, समजून घेणार,  फक्त शारीरिक नाही तर वैचारिक, भावनिक दृष्टीने आपला  विचार करणार, सुख दुःखात बरोबरीने साथ देणार,  आपला आदर करणार आणि आपला आत्मसन्मान जपणारी व्यक्ती जर अश्या नात्यात लाभत असेल तर आणि तरच महिलांनी या बाबतीत विचार करावा. 

कोणत्याही गोष्टीला अपवाद हा असतोच. समाजातील काही टक्के महिला या पुरुषांना स्वतः हुन आकर्षित करणाऱ्या, त्यांचा आर्थिक फायदा घेणाऱ्या, एकाशीही प्रामाणिक न राहता निव्वळ स्वतः च्या स्वार्थासाठी अनेक पुरुषाशी सलगी करणाऱ्या असू शकतात. श्रीमंत पुरुषाशी मैत्री करून, ती पुढे नेऊन, त्याच पुरुषाला ब्लॅक मेल करणे, त्याच्याकडे विविध मागण्या करणे त्याने त्या पूर्ण केल्या नाहीत तर त्याच आयुष्य उध्वस्त होईल अश्या धमक्या देणे, मुद्दाम स्वतःच्या जाळ्यात सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित, उचभ्रु पुरुषाला  सोशल मीडियाचा   मार्फत आपल्या मोहपाशात अडकवणे यात देखील काही महिला सक्रिय असे काही प्रकरणं घडली आहेत.

पुरुषांकडून अनैतिक मार्गाने पैसे उकळण्यासाठी देखील सोशल मीडियाचा (Social Media) चुकीचा वापर महिला करताना दिसल्या आहेत. अनेक चांगल्या घराण्यातील, नावलौकिक असलेले पुरुष अश्या महिलांच्या प्रलोभनातून स्वतः ला वाचवण्यास असमर्थ ठरतात.  पण अश्या ठराविक महिलांमुळे सर्वच महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होतोय. सर्वसामान्य महिलेला देखील त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. अश्या ठराविक वर्गातील महिलान सोबत समस्त स्त्री जातीलच पुरुष चुकीच्या अर्थाने पाहतो आणि तिला इतकी खालच्या दर्जाची वागणूक  मिळते ज्याची तिने कधी कल्पना केलेली नसते.  

पुरुष कोणत्याही महिलेला ओळ्खताना कोणता निकष लावतो हे त्याच्या वैयक्तिक विचारसरणी वर आणि कुवतीवर अवलंबून असते,  त्याच्या पूर्व अनुभवावर अवलंबून असते,  किंवा त्याने आजूबाजूला पाहिलेल्या उदाहरणांवर त्याच महिलेविषयी च मत तो ठरवत असतो.  सगळेच पुरुष सारखे नसतात हेही तितकंच सत्य आहे.  पण जर त्यांना कोणताही कटू अथवा अप्रिय अनुभव कोणत्याही स्त्री कडून आलेला असेल, तर  तो प्रत्येक वेळी, प्रत्येक स्त्रीला त्याच मापात तोलू शकतो.  त्यामुळे समस्त महिला वर्गाची ही नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे कि आपण समाजात ताठ मानेने जगू शकू आपल्या घराण्याचे नाव मोठे करू शकू यावर काम करावे.त्यामुळे च कोणत्याही माध्यमातून प्रकट होताना स्त्रियांनी सुद्धा आपल्यातील स्त्रीत्वाचा कोणीही सहजासहजी अपमान करणार नाही, आपल्या बद्दल चुकीचे समज करून घेणार नाही आणि आपला, आपल्या भावनांचा गैरवापर करणार नाही, आपण स्वतः च्या नजरेत उतरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Meenakshi Krishnaji Jagdale
सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 


संपर्क. 9834114342 9766863443
(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)