सर्वात वर

विशाखा व बाबुराव बागुल पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे मुक्त विद्यापीठाचे आवाहन

नाशिक : दर वर्षी नवोदित लेखक, कवींना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या बाबूराव बागूल कथा पुरस्कार तसेच व विशाखा काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव (Submit Proposals For Visakha and Baburao Bagul Awards) मागविण्यात असून  २०२० व २०२१ अशा दोन वर्षांसाठी हे दोन्ही पुरस्कार दिले जाणार आहेत, प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मेपर्यंत असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.

२०२० २१ या दोन वर्षांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. कथासंग्रह पुरस्कारासाठी लेखकाचा हा पहिला संग्रह असणे आवश्यक आहे. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०२० च्या कथासंग्रह पुरस्कारासाठी पुस्तक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत, तर २०२१ च्या कथासंग्रह पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. संबंधित लेखकांनी किंवा त्यांच्या प्रकाशकांनी कथासंग्रहाच्या पाच प्रती व लेखकाची थोडक्यात माहिती विद्यापीठास सादर करायची आहे. 

विशाखा काव्य पुरस्कार

विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गौरवार्थ, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ‘विशाखा’ या कवितासंग्रहाच्या नावाने दर वर्षी नवोदित कवींच्या प्रथम प्रकाशित काव्यसंग्रहांना विशाखा काव्य पुरस्कार दिला जातो. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २१, पंधरा आणि दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

२०२० च्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी पुस्तक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत, तर २०२१ च्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव डॉ. विजया पाटील, समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन शिवार, गंगापूर धरणाजवळ, नाशिक, ४२२ २२२ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९४०३७७४६२० या क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन विद्यापीठा तर्फे करण्यात आले आहे.