सर्वात वर

पॉझ …..

पल्लवी पटवर्धन

क्षणांत तुझ्यात बरसावं
तर क्षणांत शातंता क्षणांत विरघळावं तर क्षणांत स्तब्धता…..

क्षणांत माझ्या काळजाचा वेध घेणारी तुझी भेदक नजर क्षणांत तुझ्या गहि-या डोळ्यात बुडुन जाणारया जिवाची थरथर

क्षणांत माझे स्वप्नपक्षी उंच उंच गगनात क्षणांत तुझे दाटुन येणारे मेघ ओसरती माझ्या नयनात

क्षणांत आकंठ प्रितीची लयलुट चोहीकडे क्षणांत कोरड्या श्वासांची रुक्षता सगळीकडे…..

क्षणाक्षणाला बदलणा-या आपल्या आयुष्यात , क्षणही अपुरे पडतील अशी वळणं आली..आत्तापर्यंत अनेक पॉझ आयुष्यात पाहिलेत चालता चालता…. पॉझ घेत घेत आपण आपलं आयुष्य जगतच असतो की…पण हा पॉझ बराच लांबलाय…आणि तो प्रत्येकाला घेऊन गेलाय गतकाळात… आज जे जगतोय ते  मारून मुटकुन का होईना जे आयुष्य आम्ही जगलोय लहानपणी… ते म्हणजे सातच्या आत घरात ते सगळचं अखंड शिस्तीच आमची पिढी जगलीये हे…काळ बदलला तशी जीवनशैली बदलली , जगण्याच्या पध्दती बदलल्या.. आणि आम्ही ही बदलत गेलो …

तो धाक , ते अखंड प्रेम सगळंच विरत गेलं छोट्या गावाचं शहर झालं , शहराचं महानगर झालं…सगळ्याच आवडी निवडी बदलल्या…गर्दी , गजबज वाढतचं गेली…प्रचंड गर्दीत माणुस एकटा पडायला लागला …स्पर्धा वाढत गेली, चढाओढी वाढल्या .. प्रत्येक क्षणाला त्याला सिध्द करायला लागलं..डिजीटलायझेशन झालं मनाचही आणि मेंदुचही…जुन्या विचारांच्या थप्प्या गळुन पडल्या…

आमच्या पिढीला मात्र खुप जुनही जगता येत नाही आणि फार नवंही जगता येत नाही.. आम्ही मध्येच अडकलोय ना उसपार ना इसपार…गंमत आहे खरी म्हणजे आम्ही सगळेच चढउतार पाहिलेत .. आम्ही स्विकारत गेलो नवंपण ..शिकत ही चाललोय..पण आयुष्यात आलेले पॉझ तुम्हाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडतात, ज्यांना ह्या पॉझचं महत्त्व खरंच कळतं …ते विचारांच शुध्दीकरण करवुन घेतात.. त्यानंतर एक नवं जग तुम्हाला दिसतं ज्यावर तुमची कधीही दृष्टी पडलेली नसते… विचारमंथन हे तुम्ही आत्मसात केलेल्या गोष्टींमधुन माणुस घडवण्याचं काम करत असतं…

पॉझ तुम्हाला नेऊन ठेवतो एका भयाण शांततेत… एका गच्च अंधारातुन प्रकाशाकडे जाणा-या प्रवासाची ओळख करुन द्यायला… सगळं काही स्वच्छ , सुंदर डोळ्यांना दिसतं असतं तरी तुम्हाला छिन्नविछिन्न आंतरीक रस्त्यावरुन चालवतं असतो हा पॉझ… 

जन्मा पासुन सुरु झालेल्या ह्या जिवन चक्रात ह्याचं पण पर्व असावं.. अनंत गोष्टींशी नव्याने पुन्हा ओळख होत जाते यांत… जे हवंहवंसं आयुष्य असतं अगदी त्याच्या पलीकडचं  सगळ्या रंगाचं घट्ट मिश्रण असतं ह्या पॉझ मध्ये , त्याच रंगांचे वैशिष्टय आपण साधारण जाणत असतो पण त्याची ओळख सखोल करत असतो हा पॉझ, खरतर खुप खडतर आहे हे सगळं, काही चालतायतं ह्यात , काही थांबले आहेत ,तर काही कायमचे संपले.. अनेक आवाज तुम्हाला आता स्वच्छ एैकु येऊ लागलेत, ज्या आवाजाना आपण दुर्लक्षित केलं होतं , आता ते ओळखीचे वाटु लागलेतं ..‌ अनेक शब्द जे रोजच्या आयुष्यात आपण नेहमीच वापरायचो त्याला महत्त्व आलयं …

आपण जरी अबोल झाले  असलो तरी किती तरी गोष्टी तुमच्याशी स्वत:हुन गप्पा मारायला लागल्या…काही बदललयं ,काही तसचं आहे .. “मी” ह्या शब्दात अडकलेले… मी ला हा पॉझ त्रासदायक ठरलायं… पण मी मध्ये कुठेतरी आम्ही दडलायं याचा मी ला पत्ताच नाही .. आम्हीला सगळं कळतयं म्हणुन तो पुढे सरकतोय… गतकाळा पासुन वर्तमानातले क्षण जगता जगता भविष्याचं उजळपण हा पॉझ आपल्याला दाखवत सुटलायं…जे जगलोय जे पहिलयं , ज्या संस्कारात वाढलोय त्याचे हे ठळक स्मरण करुन देतोय हा पॉझ…

आपल्याला आयुष्यात एकांताची पण गरज असते..
स्वत:तच डोकवण्याची एका शांततेसाठी स्वत:ला चाचपण्याची.. स्वत:शीच गप्पा मारता मारता हसण्याची..अथांगतेत मनसोक्त विहार करण्याची…

काही अबोल गोष्टी बरचं काही बोलुन जातात ह्यात..निसर्गाचे सौंदर्य व त्याच्या प्रत्येक छटा , त्याचा प्रत्येक रंग तुमच्यात झिरपत झिरपत विरघळुन जातो अश्यावेळी..तुमच्या अंतरंगात सामावत त्याची कधी मुक्त उधळण करतं,  तुमचं तुम्हालाही कळत नाही…. मग फक्त आपण आणि अनंत अवकाश इतकचं उरतं…

आता कुठेतरी सवय होत चाललीये मला जाणिवा फक्त जाग्या आहेत पण काहींच्या भावनेत ओलावा उरलाच नाही असंही जाणवतयं….
इतकी कठोर शिक्षा असतो का हा पॉझ? मनाची होणारी तगमग …नाही थांबत मी कितीदा तरी विचारलय मनाला……पण ते कायम निरुत्तर……


तो उत्साह , तो अल्लडपणा आणायचय परत मलापण ते आहे का शक्य? कारण जे वय  आहे ना आपलं  ते तिथेच थांबतं कधीं कधींते फक्त खुणावत असतं, वाकुल्या दाखवतं……
शांतता ….फक्त शांतता एक निरव शांतता हवीहवीशी वाटणारी मनाचा आणि मेंदुचा ताबा घेणारी एक संभ्रमित अवस्था……

हा वयाचा भाग आहे? हा अनुभवाचा भाग अाहे ? का अतृप्ती ? का हा आपल्या मनोरचनेचा भाग?
एक शोध असावा….आत्मशोध…..पुर्णत्व……एक परिपुर्णता…..
एक समृध्द पॉझ

पल्लवी पटवर्धन