सर्वात वर

चिरोटे

शीतल पराग जोशी 

गुढीपाडवा सणासाठी सगळे जण पुरणपोळी किंवा सांजोरी करतात.आपण जरा हटके करून पाहू. 

Chirote

साहित्य:- 2 वाटी कणिक किंवा मैदा, 2 वाटी साखर, 2 चमचे तेल,पाव वाटी दही, 2  चमचे तूप, 1 टीस्पून लिंबूरस, मीठ, तेल,  1 चमचा तांदूळ पीठ अथवा 1 चमचा कॉर्न फ्लोअर

कृती:- कणिक चाळून घ्यावी. त्यात किंचित मीठ घालावे.दही घालावे. तेल तापवून तेलाचे मोहन घालावे. ते कणकेला चांगले चोळून घ्यावे. पाण्याने पीठ भिजवून घ्यावी. कणिक मऊ भिजवावी. खूप घट्ट नको. 

साटा:- थोडे साजूक तूप घेऊन त्यात 2 चमचा कॉर्न फ्लोअर टाकावे. नसेल तर  तांदूळ पीठ टाकावे. ते चांगले फेटून घ्यावे.त्यानंतर एका भांड्यात साखर घेऊन त्यात 1 वाटी पाणी टाकावे. किंवा साखर बुडेल इतके पाणी घालावे. हे गॅसवर ठेऊन एकतारी पाक करावा. त्यात थोडा लिंबूरस घालावा. गॅस बंद करावा.

भिजवलेल्या कणकेचे 3 ते 4 गोळे करावेत. ह्याच्या पोळ्या करून घ्याव्यात. त्यातील 1 पोळी घेऊन त्यावर वर केलेला साटा लावावा. त्यावर दुसरी पोळी टाकावी. तिला पण साटा लावावा. त्यावर तिसरी पोळी टाकावी. त्याला पण ब्रशने साटा लावावा. आणि ह्या तीन पोळ्याचा वरून रोल करीत जावा. पूर्ण एक रोल तयार झाला की त्याचे सुरीने छोटे तुकडे कापावे. 5 मिनिटाने हे छोटे तुकडे थोडे लाटून घ्यावे. कढईत तेल घेऊन त्यात हे एक एक करून तळावे.  चिरोट्याना खूप छान पदर सुटतात. आणि हे तळलेले चिरोटे (Chirote) पाकात सोडावे. लगेच काढून दुसरे तळलेले चिरोटे पाकात टाकावे. 

असे मस्त चिरोटे (Chirote) करून बघा मग  कणकेचे चिरोटे मऊ होतात. मैद्याचे चिरोटे कुरकुरीत होतात.  काही जण पाकात टाकण्याऐवजी तळलेल्या  चिरोट्यावर वरून पिठीसाखर भुरभुरतात.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२