सर्वात वर

हिरव्या मुगाचे धिरडे

शीतल पराग जोशी 

हिरव्या मुगामध्ये खूप प्रोटीन्स असतात. म्हणून हिरवे मूग खाल्ले पाहिजेत. आपण उसळ नेहेमीच करतो. आज जरा धिरडे (Green Muga Dhirde) करून बघू.

साहित्य: २ वाट्या हिरवे मूग, 4 मिरच्या, 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, कोथिंबीर, 1 टीस्पून हळद,1/2 टीस्पून हिंग, 1 टीस्पून जिरे, तेल, मीठ चविनुसार

कृती: (Green Muga Dhirde)मूग आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी चाळणीवर उपसून घ्यावेत. नंतर हे मूग मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. थोडे पाणी घालावे. आले, लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्सरला वाटून त्याची पेस्ट बनवावी. मुगाच्या पिठात हळद, हिंग, मीठ घालावे. आले, लसूण , मिरची, कोथिंबीर पेस्ट घालावी. चांगले कालवून घ्यावे. डोशाचे पीठ असते त्याप्रमाणे मिश्रण असावे. नंतर निर्लेप तवा घेऊन तो तापण्यास ठेवावा. त्यावर थोडे तेल घालावे. त्यावर हे मुगाचे मिश्रण डावाने घालावे. छान पसरवून घ्यावे. त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.

नंतर झाकण काढून ते पसरट वा धिरडे उलटवून घ्यावे. परत थोडे तेल सोडावे. जाळीदार आणि खमंग असे हे पसरट कोणत्याही चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकतात. लहान मुलांना पण हे (Green Muga Dhirde) धिरडे  खूप आवडतात. शिवाय मूग हे पोटाला हलके असतात. त्यामुळे वयस्कर लोक पण खाऊ शकतात. ह्याच पिठाचे तुम्ही पातळ असे डोसे पण करू शकतात. 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२