सर्वात वर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची- छगन भुजबळ

नाशिकच्या बालरोग तज्ञांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

नाशिक – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona) सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होऊ शकतो असे तज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य डॉक्टरांना करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी डॉक्टरांना दिले. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांबाबत आज इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेच्या डॉक्टरांनी नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली. 

यावेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले. या निवेदनात लहान मुलांमध्ये डेक्सामेथासोन, इमुनोग्लोबुलीन, पॅरॅसिटॅमोल यासह लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत, लहान मुलांना एको कार्डीयोग्राफी ही तपासणी करणारे तज्ञ उपलब्ध असावे यासह विविध मागण्या त्यांनी केल्या आहे.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बालरोग तज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये बालरोग तज्ञांनी प्रशासनाला सहकार्य करून या तिसऱ्या लाटेत आपली महत्वपूर्ण अशी भूमिका पार पाडावी असे आवाहन करत डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारत्मक विचार करून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ.राजेंद्र कुलकर्णी,डॉ.रविंद्र सोनवणे, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.रिना राठी, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.केदार मालवतकर, डॉ.सुशील पारख, डॉ.अमोल मुरकुटे, डॉ.गौरव नेरकर, डॉ.योगेश गोसावी, डॉ.संदीप वासनकर, डॉ.शाम हिरे, आकाश पगार, संदीप अहिरे आदी उपस्थित होते.