सर्वात वर

ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन

नवी दिल्ली – ज्येष्ठ पत्रकार प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना (Rohit Sardana) यांचं निधन झालं. काही दिवसापूर्वी रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम करत होते. आजतक वरुन दंगल या शोचं अँकरिंग ते करत होते. तर अनेक वर्षांपासून झी न्यूजमध्ये ते न्यूज अँकर होते.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या  प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना (Rohit Sardana) यांना आज (३० एप्रिल) सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यांना वाचवण्यात यश आले नाही. रोहित सरदाना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी मृत्यूच्या एक दिवस आधी ते लोकांची मदत करत होते. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेडच्या सोयीसाठी ते सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते आणि सहकार्याचं आवाहन करत होते. इतकंच नाही तर २९ एप्रिलला ही म्हणजे मृत्यूच्या एक दिवस आधी ट्वीट करुन त्यांनी एका महिलेसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करण्याचं आवाहन केलं होतं. त्याआधी २८ एप्रिल रोजी त्यांनी लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं होतं.

रोहित सरदाना (Rohit Sardana) यांच्या निधनावर वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली  आहे की, “अतिशय धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन.”