सर्वात वर

शादी में जरूर आना……

पार्श्वभूमी 
मानवी जीवनात स्त्री-पुरुष हे म्हणजे दोन ध्रुवावर दोघे आपण….. त्यांच्यात कितीही ‘मतभेद, अंतर, तफावत’ असली तरीही आकर्षणही तेवढंच तीव्र असतं. तरूणपणातील ‘प्रेमभावना, ओढ आणि अपेक्षा’ या भावभावना याचं वलय एकदा बनलं की त्यांच्यातील आकर्षण हे चिरंजीवच असतं. हाच धागा पकडून त्याच्यात अपेक्षित आणि अनपेक्षित ‘घटना, इर्षा, बदला, नाट्य आणि आकर्षण’ अशा मोत्यांना गुंफून ‘कमल पाण्डेय’ याने एका साध्या-सरळ कथानकाला ‘रत्ना सिन्हा’ या दिग्दर्शिकेच्या हाती सोपवलं. 

आजकालच्या तरुणींना संसारापेक्षाही आपलं करीअर जास्त महत्वाचं वाटतं, अगदी साहजिकपणे! कारण मागील पिढीतील स्त्रियांनी सोसलेल्या आयुष्याच्या कटूकथा ऐकतच त्या मोठ्या झाल्या आहेत. मी जे भोगलंय, ते तुझ्या नशिबी येऊ नये हीच देवापाशी प्रार्थना, हे ‘सिम्पथी-बाईंग’ वाक्य त्यांच्या कानावर वारंवार पडलंय. मग त्यांनी परंपरागत ‘संसार’ याला दुय्यम स्थान दिलं, तर त्यांचं कुठे चुकलं? 

निर्मिती प्रक्रिया

‘विनोद बच्चन’ यांच्या सोबतीने जवळपास चार जणांनी निर्मितीची जबाबदारी स्वीकारली. यातील ‘सत्येंद्र शर्मा उर्फ सत्तू’ या भूमिकेसाठी ‘राजकुमार राव’ याची निवड झाल्यानंतर ‘आरती’ साठी सुरुवातीला ‘तापसी पन्नू’ हिची निवड झाली, तिने होकारही दिला, परंतु तारखा जमत नसल्याने तिने असमर्थता दर्शवली. मग ‘कतरिना कैफ आणि इलियाना डिक्रुझ’ यांचाही विचार झाला आणि सरतेशेवटी ही भूमिका ‘कीर्ती खरबंदा’ हिच्या पदरात पडली.

कथानक

या सिनेमाचं कथानक कानपूर शहरात घडतं. कारकुनी करणारा आणि लग्नाचा उमेदवार ‘सत्येंद्र मिश्रा उर्फ सत्तु (राजकुमार राव)’ला त्याच्या मामाच्या लग्नात एका मुलीचं स्थळ सांगून येतं. केवळ फोटो बघूनच त्याचं कुटुंबीय मुलीला पसंत करतात. परंतु आरतीला आपली ‘स्वप्नं, इच्छा, आकांशा’ पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपलं करिअर अधिक महत्वाचं असतं.  वडिलांच्या इच्छेपुढे शरण जाऊन आरती लग्नाला तयार होते. लग्नापूर्वी आरतीने एकदा मुलाला एकट्यात भेटावे असं आई सुचवते आणि पहिल्याच भेटीत ‘आरती आणि सत्येंद्र’ एकमेकांकडे आकर्षित होतात. 

मग दोन्ही घरात त्यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु होते. परंतु लग्नाच्या दिवशी ‘आरती’ लग्न-मंडपातून पळून जाते. याचा फार मोठा आघात सत्तुच्या कुटुंबावर होतो. आपल्या प्रेमाला लाथाडून आरती निघून गेल्याचा राग येऊन सत्तुच्या मनात बदल्याची भावना निर्माण होते. 

या कथानकातली ‘आरती’ अशीच वाढलेली असते. एका कारकुनाशी लग्न करून त्याचा संसार फुलवण्यापेक्षा हाती आलेली सरकारी अधिकाऱ्याची नोकरी स्विकारणं तिला जास्त कन्व्हीन्सिंग आणि स्वप्नपूर्तीचा देणारं वाटतं. म्हणून ती लग्नमंडपातून पळून जाते. सुरुवातीला अपमानास्पद वाटणारी ही बाब, जरी सत्येंद्रमध्ये नकारात्मक इर्षा निर्माण करत असली, तरीही तो हे चलेंज स्वीकारून तोही परीक्षा देत वर सरकत जातो आणि आरती ज्या शहरात ‘सब-रजिस्टार’ असते, तिथेच जिल्हाधिकारी पदावर रुजू होतो. ‘सब-रजिस्टार’ ही पोस्टच मुळात जमिनींच्या आर्थिक व्यवहाराची असल्याने, तिथे भ्रष्टाचार होतोच. एका अशाच व्यवहारात आरतीवर लाच घेतल्याचा आरोप होतो आणि सत्येंद्र चौकशी अधिकारी. पुढे काय घडतं, हे वाचकांनी चित्रपटातच बघावं.

अभिनायानुभव

‘राजकुमार राव’ हा एक गुणी अभिनेता असल्याचं त्याने आजवरच्या कारकिर्दीत सिद्ध केलंय. राजकुमार राव अभिनीत चित्रपटांनी ‘बॉक्स-ऑफिस’वर कमाई केलीय. ‘न्यूटन’ या चित्रपटाने ‘ऑस्कर’ मध्ये नामांकन मिळवलंय. तर ‘बहन होगी तेरी’ आणि ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटांना प्रेक्षकांसह समीक्षकांनीही गौरवलंय. या चित्रपटातही त्याने बाजी मारलीय. कथानकाचा संपूर्ण कल ‘सत्येन्द्र शर्मा’ या पात्राला लाभलाय आणि ‘राजकुमार राव’ यानेही या भूमिकेला पूर्ण न्याय दिल्याने ही भूमिका सर्वात जास्त प्रभावी ठरलीय. यातील इतर पात्रे – नवनी परिहार(आई), के.के.रैना (वडील), विपिन शर्मा(मामा), नयनी दीक्षित(अभा), अलका अमीन(सत्तूची आई), करणवीर शर्मा(शरद) यांनी आपापल्या भूमिका उत्तम पार पाडल्यात. परंतु त्यामुळे इतर पात्रांना फारसं महत्वच लाभत नाही. त्यातही ‘आरती’ साकारतांना ‘कृती खरबंदा’ चुकलेली नाही. तिचं सौंदर्य तिच्या पात्राला खुलून देण्यात महत्वाची भूमिका बजावतं, हे विशेष. तिने सौंदर्यवान, सुसंस्कारित करीअरीस्ट मुलगी आणि गमावलेलं प्रेम मिळवण्यासाठी खंबीरपणे प्रयत्न करणारी प्रेयसी साकारण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. 

‘रत्ना सिन्हा’ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करतांना कथानकातील ‘नाट्याला आणि प्रमुख पात्रांच्या नात्याला’ एका वेगळ्याच पद्धतीने सादर करतांना प्रेक्षकांची उत्सुकता ताणलीय. त्यामुळे शेवटपर्यंत चित्रपट बघण्याची इच्छा होते. सरतेशेवटी प्रेक्षकांन अपेक्षित निर्णयावर पोहोचल्याने सर्वत्र आनंदी-आनंद निर्माण करण्यात यश संपादन केलंय. कदाचित हाच या चित्रपटाचा ‘युएसपी’ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. चित्रपटाच्या पहिल्या भागात एका सरळ रेषेत, ठराविक वेगात पुढे सरकणारं कथानक, मध्यंतरात वेगळं वळण घेत असल्याने, प्रेक्षक अचंबित होतात. एकीकडे आरतीचा अप्रोच पटतो तर दुसरीकडे सत्तूचा रागही. त्याचमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आणि पुढे काय घडणार, ही उत्सुकताही निर्माण होतात. उत्तरार्धात हीच उत्सुकता अधिकाधिक ताणली जाऊन शेवटाला सर्वांच्या मनावर आलेला ताण, आपोआप संपतो. या चित्रपटात गाणी आहेत, त्यातील ‘पल्लू लटके’ हे एकमेव गाणं प्रेक्षकांच्या लक्षात रहातं. 

निर्मिती आणि सन्मान

निर्माता-विनोद बच्चन, लेखक-कमल पाण्डेय, सिनेमॅटोग्राफी-सुरेश बिसावेनी संगीत-आनंद राज आनंद, झी सिने अवार्ड्स – बेस्ट स्त्री गायिका, ज्योतिका तंग्री – पल्लो लटके, मिर्ची म्युझिक अवार्ड्स – उदयोन्मुख गायक असित त्रिपाठी – तू बन जा गली बनारस की…

सारांश

आपल्या देशात वर्षानुवर्षे ‘पुरुष प्रधान संस्कृती’ अस्तित्वात असल्याने ‘स्त्री शिक्षण’ हा विषय समाजाच्या दृष्टीकोनातून अविचारच मानला जायचा. त्यामुळे भविष्याचा विचार करून मुलगा अॅसेट आणि मुलगी लाएबिलीटी असं गणित समाजाने सोयीस्करपणे मांडलं होतं. स्त्रियांना ‘चूल आणि मुल’ एवढीच काय ती किंमत होती. गेल्या साठ वर्षात काळ बदलत गेला, मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी धडपड करणारा बाप मात्र आपल्याच बायकोच्या शिक्षणाला विरोध करत होता. पुरुषी विचारधारा स्त्रियांच्या प्रगतीला रोखू पहात होती. परंतु आजच्या काळात स्त्रियांनी स्वत:ला सिद्ध केलंय. पुरुषांच्या बरोबरीने येत स्वत:च्या हिमतीवर मिळवलेलं यश आणि स्टेटस यामुळे स्त्रियांची समाजातली किंमत वाढली आहे. आपल्या समाजामध्ये या विषयावर कितीही ‘वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा, मत-मतांतरे, वाद-विवाद आणि वितंडवाद’ असले तरीही दोन व्यक्तींमधला सकारात्मक संवाद या सगळ्यांवर मात करतो. दोन प्रेमी किंवा नवरा-बायको यांचं बाँडिंग जर भक्कम असेल तर कोणत्याही परिस्थितीत ती दोघं निश्चितपणे एकत्र येणारच, असा सकारात्मक संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ही टीम यशस्वी झालीय, हे निश्चित!

NC-Deshpande
एनसी देशपांडे 

एनसी देशपांडे 
Mobile -९४०३४ ९९६५४