सर्वात वर

गायक मिलिंद धटिंगण यांच्या ‘आभा’ कविता व्हिडीओ प्रकाशित

नाशिक (Nashik News) : नाशिकची भूमी ही कलावंतांची भूमी असून या शहराने सर्वच क्षेत्रात अनेक उत्तमोत्तम कलाकार या पूर्वीही दिले आहेत आणि तोच संपन्न वारसा तुम्ही पुढे नेता आहात याचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त मा.डॉ.विजय सूर्यवंशी (आयएएस) यांनी केले.

‘आकाशाची आभा’ या मिलिंद धटिंगण यांनी स्वरबद्ध करून गायलेल्या कवितेचा व्हिडिओ श्री. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम विश्वास हब, सावरकरनगर येथे संपन्न झाला.

डॉ. सुर्यवंशी पुढे म्हणाले की, (Nashik News) नाशिकच्या कला संस्कृतीचा संपन्न वारसा श्री.धटिंगण पुढे नेत आहेत. सदर व्हिडीओ हा त्याचेच उत्तम उदाहरण आहे. शब्द, सुर, ताल यांचा सुरेख अनुभव यात जुळून आला आहे. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा मला विश्वास आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. विश्वास ठाकूर म्हणाले की, निर्मिती व गुणवत्तेच्या बाबतीत ‘आभा’ व्हिडीओ परिपूर्ण आहे. समृद्ध कलाकृतीचा अनुभव आहे. शास्त्रीय संगीताची जाण असलेली शब्दप्रधान गायकी हे मिलिंद धटिंगण यांचे वैशिष्ट्य असून गायन क्षेत्रात हे नाव नाशिककरांना सुपरिचित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा दर्जेदार व्हिडिओ पोहचावा असा मानस त्यांनी व्यक्त केला.

सौ.आरती विजय सुर्यवंशी यावेळी बोलतांना म्हणाल्या की, सदर व्हिडीओ व्यावसायिक पातळीवर पण जाऊन त्याला उत्तमोत्तम रसिकाश्रय निश्चितच मिळेल.

‘आकाशाची आभा’ ही रचना कविता शिंगणे गायधनी यांची असून त्यांच्या अनेक रचनांना या पूर्वी रसिकांची दाद मिळाली आहे.

या व्हिडिओ मध्ये प्रख्यात नृत्यांगना डॉ सुमुखी अथणी यांचा कवितेच्या अंगाने केलेला लालित्यपूर्ण पदन्यास आपल्याला बघायला मिळेल.

पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि ख्यातनाम संगीतकार, गायक मकरंद हिंगणे यांचे बहुमोल मार्गदर्शन या गीतासाठी लाभले आहे. दिग्दर्शन आणि निर्मिती निनाद गायधनी यांची आहे. त्यांचा सोनी चॅनेल, स्टार प्रवाह, बालाजी टेलीफिल्मस सारख्या मोठ्या बॅनरचा अनुभव व्हिडिओग्राफी मधे नक्कीच रसिकांना दिसेल. या उमद्या दिग्दर्शकाने पदार्पणातच आपली स्वतंत्र छाप उमटविलेली आहे.

मनोज गुरव यांची बासरी आणि शुभम जोशी यांचे ध्वनिमुद्रण, आदित्य रहाणे  यांचे संकलन यामुळे ‘आभा’ची रंगत वाढली आहे. अशा सर्जनशील नाशिककर मंडळींनी एकत्र येऊन तयार केलेला हा व्हिडिओ लवकरच रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. आपली कौतुकाची एक थाप त्यांच्या पुढच्या कलाप्रवासाला कायमच ऊर्जा देत राहील. दिलीप वाघ आणि अमित शाह यांचे चित्रीकरणासाठी सहकार्य लाभले आहे. तसेच विश्वास ठाकूर यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमास पं. मकरंद हिंगणे, डॉ. मनोज शिंपी, सौ. ज्योती ठाकूर, श्री.प्रसाद पाटील, श्री.जयंत जोगळेकर, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. हरिभाऊ कुलकर्णी, सौ.सारिका देशपांडे, श्री.मुकुंद गायधनी, श्री.रमेश बागुल, सौ.अश्विनी धटिंगण, सौ.राजश्री शिंपी, डॉ.स्वाती भडकमकर आदी मान्यवर तसेच सहभागी कलाकार उपस्थित होते.