सर्वात वर

महाराष्ट्रातील मंदिरे उघडली:भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद

दर्शन घेतांना या नियमाचे करावे लागणार पालन 

त्रंबकेश्वर मंदिर

मुंबई-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात ते आठ महिन्यापासून बंद असलेली मंदिरे राज्य सरकारने परवानगी दिल्या नंतरआज पाडव्याच्या मूहूर्तावर भक्तांसाठी उघडण्यात आली.आद्य ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या त्रंबकेश्वरच्या मंदिराचे महाद्वार सकाळी ५ वाजता फटाक्याच्या आतषबाजीत उघडण्यात आले.मंदिरात प्रवेश करतांना मास्क लावणे अत्यावश्यक असून मास्क नसणाऱ्यांना मंदिरात प्रवेश करता येणार नसल्याचे मंदिर प्रशासना कडून सांगण्यात आले.मंदिराच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या भक्तांच्या टेम्परेचरची  तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजापूरच्या  तुळजाभवानी मंदिरातही भक्तांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती. सरकारी नियमांचे पालन करूनच भक्तांना मंदिरात प्रवेश देण्यात येत होता. १० वर्षाच्या आतील बालकांना मात्र या मंदिरात प्रवेश दिला नसल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले. 

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर पहाटे चार वाजल्यापासून खुलं करण्यात आलं आहे.कोरोनाचे नियम पालन करुन तसेच क्यूआर कोडच्या असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं गरजेचं असल्याचं सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.

कोल्हापूरचच्या करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले असून सकाळी ९ ते १२  आणि दुपारी ४ ते ७ या वेळात भक्तांना रांगेत दर्शन मिळणार आहे. भक्तांसाठी मंदिराच्या पूर्व दरवाजातून प्रवेश तसेच दक्षिण दरवाजातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन बुकिंगची सोय हि करण्यात आली आहे.देवीला हळदी कुंकू लावण्यास  आणि फुले वाहण्यास ,ओटी भरण्यास बंदी करण्यात आली आहे,दररोज तीन ते चार हजार भक्त दर्शन घेतील असे नियोजन करण्यात आले आहे.

शेगांवचे गजानन महाराज मंदिर मंगळवारी उघडणार असून ई-पास घेऊनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे शेगांवला मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण मंदिर परीसर स्यानेटाईझ करण्याचे काम सुरु आहे. पुण्याचे दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर हि उघडले असून भक्तांना सर्व सरकारी नियम पाळून दर्शन घेता येणार आहे.