सर्वात वर

पती पत्नी आणि कुटुंबातील तणावाचे अपत्त्यांवर होणारे परिणाम

सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

कौटुंबिक आणि वैवाहिक समस्या, त्याचे प्रत्येकाच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम, कुटुंबातील लोकांना त्यामुळे होणारा त्रास (Family Stress) , मानहानी इत्यादी बाबतीत आपण अनेक लेखांमध्ये चर्चा केली आहे. पती – पत्नी मधील मतभेद मग ते कोणत्याही कारणावरून असोत, कोणत्याही स्वरूपाचे असोत, त्यामध्ये कोण चूक कोण बरोबर या ही पेक्षा हा विचार होणे आवश्यक आहे की या तणावांचा त्यांच्या पाल्यांवर काय आणि कसा परिणाम होतो. 

पती पत्नी एकत्र राहत असताना देखील खूपदा त्यांच्यात वैचारिक, आर्थिक वा तत्सम कोणत्याही कारणाने मतभेद होत असतात.हे मतभेद फक्त पती पत्नी पुरतेच मर्यादित नसून, कुटुंबातील सदस्यांचा देखील त्यात सहभाग असतो.कोणी पत्नी ला दुजोरा देणार असेल तर कोणी पतीला पाठिंबा देणार असेल. प्रत्येकजण आपापल्या अनुभवानुसार, विचारसरणी, कुवतीनुसार योग्य -अयोग्य चूक बरोबर ठरवत असतो आणि त्यातून संसाराचा गाडा पुढे जात असतो.

यासगळ्या परिस्थितीचा साहजिकच कुटुंबाचे महत्वाचे घटक असलेल्या पाल्यांवर चांगला वाईट प्रभाव आणि परिणाम होत असतो. या लेखा मध्ये आपण फक्त एकत्र राहणारे पालक, एकत्रित नांदणारे नवरा बायको आणि त्यांच्यातील तणावाचा त्यांच्या मुलांवर होणारा परिणाम यावर भाष्य करणार आहोत. 
विभक्त होऊ इच्छिणाऱ्या,अथवा त्या कायदेशीर प्रक्रियेत असणाऱ्या पती पत्नी च्या अपत्यांचा,अथवा एकमेकांपासून कायमस्वरूपी वेगळे झालेल्या पती पत्नी आणि त्यांची मुलं यांचा विषय आपण पुढील लेखामध्ये मांडणार आहोत.

 आजकालची झपाट्याने बदलणारी जीवनशैली, शैक्षणिक पद्धती, बाह्य जगातील स्पर्धा, आपली मुलं आणि  मुली दैनंदिन जीवनात करीत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर, त्यांचे मित्र मंडळी, त्यांचे शालेय महाविद्यालयीन जीवन, बाहेरील जगातील प्रलोभन या सर्व बाबी आजकालच्या पाल्यांवर, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करीत आहेत असे सर्रास सर्वच आई वडील बोलतांना दिसतात.आपल्या वेळी असं नव्हतं इथपासून सुरु झालेल्या पालकांच्या गप्पा आजकालची मुलं आणि त्यांच्यावर आपल्या बौद्धिक कुवतीनुसार दिलेले रिमार्क आपण रोजच ऐकत असतो. परंतु किती कुटुंबातील सदस्य अथवा पती पत्नी घरातील वातावरणाचा, कौटुंबिक वाद विवादांचा (Family Stress) , घरातील अप्रिय, चुकीच्या काही घडामोडींचा अथवा पती पत्नी मधील तणावांचा पाल्यांच्या जीवनावर, अभ्यासावर, कला गुणांवर, तब्येतीवर तसेच भविष्यावर होणारा नकारात्मक  परिणाम शोधून त्यातून मार्ग काढतांना दिसतात? अनेकदा शिकले सवरलेले सुशिक्षित पालक देखील मुलांचा वापर आपल्या सोयीने पती अथवा पत्नी विरोधात करताना दिसतात. 

स्वतः चा अहंकार, स्वतः चा जिद्दी पणा, हट्ट, स्वतः ची मत आणि विचार दुसऱ्याच्या विरोधात वापरण्यासाठी आपल्याच अपत्यांचा आपण गैरवापर करतोय हे त्यांच्या ध्यानी मनी नसते.  मुलांची स्वतः ची काही मत, विचार,अपेक्षा जाणून घेण्यापेक्षा अनेक घरांमध्ये केवळ नवरा बायकोना एकमेकांना विरोध करायचा म्हणून मुलांचा वापर केला जातो. पती पत्नी दोघेही मुलांवर नितांत प्रेम करीत असतात यात शंकाच नाही. पण तरी देखील एकत्र कुटुंबात राहणारी, बाल पणापासून आई वडिलांसोबत राहिलेली मुलं किंवा मुली देखील भविष्यात चुकीच्या वळणावर का जातात, किंवा त्यांना हवे तसे शैक्षणिक अथवा व्यावसायिक यश का मिळत नाही, अथवा ते चुकीच्या संगतीच्या आहारी जाऊन आयुष्यातील महत्वाचे निर्णय महत्वाची वर्ष का बरबाद करतात ? यावर जर सखोल विचार केला तर हे लक्षात येईल की याचा पाया बालपणापासूनच घातला गेलेला असतो. 

कोणतेही  आई वडील कधीच मुलांना चुकीचं शिकवत नाहीत, अयोग्य संस्कार देत नाहीत, त्यांची सर्वतोपरी काळजी आपल्या कुवतीनुसार घेतात.  त्यांना चांगल्यातल्या चांगल्या सोई, सुविधा पुरवितात तरी मग चूक कुठे होते???  मुलं का चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातात ?  तर बालपणापासून मुलांनी आपल्या आई वडिलांना एकमेकांशी किती प्रेमाने, आदराने, समजूतदारपणे वागवले आहे, त्यांनी आयुष्यात कोणती नैतिक मूल्य, तत्व पाळली आहेत,  मुलाशी आई वडील म्हणून त्यांनी कसा, कितीवेळा संवाद साधला आहे, इतर कुटुंबातील लोकांशी, नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी यांचे  शी आई वडील कसे वागत आलेत, परस्परांना सुख दुःखात, आजारपणात त्यांनी कस हाताळलं आहे हे मुलांनी लहानपणापासून पाहिलेले आणि लक्षात ठेवलेलं असत.  पती पत्नी यांच्यामधील धुसफूस किंवा भांडण जरी मुलांनी समोर बघितलं नसेल तरी वातावरणातला तणाव, आई वडिलांची बिघडलेली मानसिकता  मुलं नक्कीच समजू शकतात. 

अनेक घरांमध्ये पती पत्नी ना वाटते की मुलांसमोर भांडलो नाही म्हणजे सगळं आलबेल आहे. तर काही घरांमध्ये कोणत्याही मर्यादा न पाळता पती पत्नी अपत्यांसमोर एकमेकांचा पायउतार करणे, शिवीगाळ करणे, पती व्यसन करून येणे, पत्नी ला मारहाण करणे, एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे, आदळआपट करणे खुलेआम सुरु असते. बऱ्याच ठिकाणी मुलांची कोणतीही चूक झाली, अथवा त्याची वर्तवणूक, शैक्षणिक प्रगती बिघडली तर पती पत्नी एकमेकांना दोष देतात. तुझे संस्कार, तूझ्या सवयी, तुझं लक्ष नाही असं म्हणून तो ती असं वागली.मुलांच्या कोणत्याही चुकीचे भांडवल एकमेकांना कमी दर्शविण्यासाठी केलें जाते.

मुलांची इच्छा,अपेक्षा, त्यांच्या समस्या, त्रास अथवा त्यांची घुसमट समजून घेण्यापेक्षा पती आणि पत्नी या बाबी एकमेकांवर ढकलताना दिसतात. मुलांनी काय शिकावं, कोणता क्लास लावावा, कोणते कपडे घालावेत, कोणाशी बोलाव, कोणाशी खेळावं, काय पाहावं इथपासून पालक लक्ष घालतात पण तेही एकविचाराने नाही. एकाने अनुमती दिली तर दुसरा प्रतिकार करेल आणि आपलंच म्हणणं खरं करण्याची चढाओढ पती पत्नीत लागेल यामध्ये त्या अपत्याच काय मत आहे यावर फारस लक्ष दिल जात नाही. तूझ्या मुळे तो किंवा ती बिघडली, तूझ्या वळणावर गेला किंवा गेली, आमच्या घरात असे वळण नव्हते असे ताशेरे पती पत्नी एकमेकांवर ओढतात. यामध्ये सर्वात जास्त कुचंबणा मुलांची होते.  घरात जर वाढत्या वयात त्यांचा असा कोंडमारा होत राहिला आणि त्यांची मानसिकता आई वडिलांबद्दल नकारात्मक झाली तर ते जसजसे मोठे होऊ लागतात तसे स्वतः चा मार्ग स्वतः शोधून मोकळे होतात.

फक्त पती पत्नीचं आपल्या वादाच्या विषयात मुलांना विनाकारण गोवतात असे नाही तर दोन्ही कडील कुटुंबातील आप्त स्वकीय देखील खूपदा परस्परांना एकवणूक करण्यासाठी हेतुपुरस्कर मुलांचा वापर करताना दिसतात. 
वास्तविक मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास, वैचारिक जडण घडण, कोणत्याही गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टीकोन निकोप असणे अत्यंत आवश्यक आहे. मोठे झाल्यावर त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून ते चांगल वाईट ओळखून स्वतः ची मत बनवू शकतात. पण कुटुंबातील अनेक सदस्य एकमेकांना केलेली आर्थिक मदत, सहकार्य मुलांच्या मार्गाने त्यांच्या आई वडिलांना ऐकवतात.घरातील कोणतीही चुकीची घटना भूतकाळात घडलेली असेल तरी मुलांना असे सांगण्यात येते की तूझ्या आई अथवा वडिलांमुळे असे  झाले होते.  त्यामुळे काही कुटुंबात पती पत्नी नी जरी मुलांसमोर बोलतांना वागतांना सगळी पथ्य पाळली तरी इतर नातेवाईक मुलांच्या कोवळ्या वयात त्यांना टोमणे मारणे, त्यांच्या समोर त्यांच्या आई वडिलांची निंदा नालस्ती करणे, त्यांना अप्रत्यक्ष रित्या घरगुती राजकारण, कलह यामध्ये ओढणे असले प्रकार करताना दिसतात. 

लहानवयात मुलं काही बोलणार नाहीत, उलट उत्तर देणार नाहीत किंवा वेळ मारून नेतील. पण त्यांनी जे काही निरीक्षण लहानपणापासून प्रत्येकाचे केलेले असते त्यावरून त्यांची वैचारिक दिशा, वागणूक, सवयी विकसित होतात.अनेक घरात मुलं पती पत्नी मधील कौटुंबिक हिंसाचार, अनादर, दुस्वास, चिडचिड पाहून एकतर स्वतः ला खूप असुरक्षित समजतात त्यातून ते मानसिक आजाराच्या आहारी जाऊ शकतात अथवा एकतर ते बेरड होऊन त्यांना कसलेच काही वाटेनासे होते, ते भावनाशून्य होऊन जातात. 

अनेक घरामध्ये कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी एकमेकांना जबादार धरणे, दोष देणे, वाईट परिस्थिती असल्यास त्याच खापर दुसऱ्याच्या माथी फोडणे यामध्ये पती पत्नी पारंगत असतात. वास्तविक सुख,  दुःख, त्रास, अडचण, अपमान हे जीवनप्रवाहात किती सहजतेने स्वीकारायचं आणि कुटुंबातील  प्रत्येकाने साथ सोबत धरून धैर्याने, प्रयत्नांनी त्यालासामोरं जायचं ही कला मुलांना आत्मसात करायला शिकवणे मोठया लोकांचे कर्तव्य असते.परंतु त्यांच्या समोर जर आपण कोणत्याही वाईट परिस्थिती चा दोष एखाद्याला देत असू तर ते पण स्वतः च्या आयुष्यात आपल्या अपयशाचं, आपल्या बिघडलेल्या आयुष्याच खापर आपल्याच आजूबाजूच्या नातलगांवर अथवा आई वडिलांच्या माथी फोडतील.
समुपदेशन ला येणाऱ्या घटनांमध्ये कमी वयात मुलं मुलींनी केलेले प्रेमप्रकरण, घरातून निघून जाणे, अगदी लहान वयात पळून जाऊन लग्न करणे अथवा आत्महत्या करणे या वाटेला मुलं का जातात  यावर चर्चा केली जाते.  अनेक सुशिक्षित सुसंस्कारी कुटुंबातील मुलं मुली असे मार्ग का निवडतात, त्यांना सर्व भौतिक ऐहिक सुख उपलब्ध असून सुद्धा ते आपल्या जन्मदात्यां विरोधात बंड का पुकारतात, मोठी माणसं कुठे चुकतात यावर विचारविमर्श होणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेक पती पत्नी अथवा मुलामुलींचे इतर नातेवाईक सतत मुलांसमोर त्यांची कुटुंबातील इतर बरोबरीच्या मुलामुलींशी तुलना करीत राहतात. हि तुलना बरेच वेळा इतरांची शैक्षणिक प्रगती, आरोग्य, सवयी, दिनचर्या, त्यांचं रूप, गुण, व्यक्तिमत्व, प्रगती  याबद्दल असते.  अश्या वेळी मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होऊन ते मनाने खचले जातात. काही ठिकाणी पती पत्नी मुलांपासून अनेक अप्रिय गोष्टी त्यांच्या काळजीपोटी त्यांना सांगत नाहीत, लपवून ठेवतात. मुलांना जेव्हा भविष्यात, थोडं मोठ झाल्यावर इतरांकडून या गोष्टी कानावर येतात तेव्हा त्यांचा आई वडिलांवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो.  वास्तविक मागील पिढीने जाणते अजाणते पणे केलेल्या चुका, चुकीचे निर्णय पुढील पिढीने सुधारून स्वतः च आयुष्य घडवणे क्रमप्राप्त आहे.  

त्यामुळे आपल्याकडून झालेल्या चुका, चुकीचे निर्णय देखील मुलांना मनमोकळे पणे सांगणे आवश्यक आहे. मुलांची निर्णय प्रक्रिया विकसित होणे साठी त्यांना घरातील छोटया मोठया निर्णयात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. आपण मोठे आहोत म्हणजे आपणच बरोबर आहोत हि मानसिकता मुलांना कमजोर बनवते. आपल्याकडून झालेल्या चुका मुलांकडून होऊ नयेत यासाठी प्रत्येक पालकाने त्यांच्याशी संवाद साधने आवश्यक आहे. एकत्र कुटुंबात मुलांची जास्त घुसमट होते असे देखील काही ठिकाणी निदर्शनास येते. 

घरातील ठराविक सदस्यांचे आपसात असलेले वादंग, हेवेदावे, मत्सर, कलह, अबोला यात मुलांनी पण सहभागी व्हावे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आपली मत मुलांवर लादणे,  आपण ज्या लोकांना वाईट म्हणतो त्यांना मुलांनी पण वाईटच म्हटले पाहिजे, आपण एखाद्या नात्यागोत्यातल्या व्यक्ती शी बोलत नाही तर मुलांनी पण तेच अनुकरण डोळे झाकून केलें पाहिजे अशी जबरदस्ती मुलांवर करणे योग्य नाही. कोण चांगल कोण वाईट कोण आपलं कोण परकं या गोष्टी मुलांना स्वतः च्या अनुभवातून ठरवू देणे जास्त रास्त राहील असे वाटते.

मुलांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, संभाव्य धोके लक्षात आणून देणे आपले कर्तव्य आहे पण मुलांनी आपल्या चुकीच्या प्रकरणांमध्ये आपलीच बाजू उचलून धरावी, आपण कितीही अयोग्य असलो तरी मुलांनी आपलंच अनुकरण करावं, घरात आपल्या चुकांमुळे  घडणाऱ्या चुकीच्या प्रसंगात आपलीच साथ दयावी कारण आपण त्यांचे आई बाप आहोत हि अपेक्षा कितपत योग्य आहे.  

मुला मध्ये  निरपेक्ष विचार करण्याची सवय, भेदभाव न करण्याची सवय,  माझं – तुझं, आम्ही – तुम्ही न करण्याची सवय आपणच जर त्यांच्या वाढत्या वयात लावली तर नक्कीच त्यांची निकोप वाढ होऊ शकेल. अनेकदा मुलांकडून कोणतीही चूक झाली तर पत्नी ने पतीच्या किंवा पती ने पतीच्या खानदानाचा उद्धार करणे, एकमेकांच्या खानदानाला दोष देऊन मुलांना कमी लेखणे, मुलांसमोर घरातील, नात्यातील इतर सदस्यांबद्दल अपशब्द बोलणे अत्यंत चुकीचे आहे.  मुलांच्या मनात कोणाविषयी विष पेरणे, त्यांची मन कलुषित करणे, त्यांच्या समोर सातत्याने नकारात्मक विषयावर बोलणे, सावध पणा शिकविणे पेक्षा त्यांच्या मनात भीती तयार करणे, त्यांच्यात सूडबुद्धी रुजवणे यामुळे मुलं देखील तसाच विचार करू लागतात आणि त्यांच्या पुढील भविष्यावर, पुढील आयुष्यावर याचा कळत नकळत परिणाम होत जातो.

कदाचित पती पत्नी मधील वाद, गैरसमज तात्पुरत्या स्वरूपाचे असू शकतात. शाब्दिक चकमकीनंतर ते परस्परांशी पुनःश्च व्यवस्थित वागायला लागतात पण मुलांनी हे सर्व लक्षात ठेवलेले असू शकते.  ज्या वेळी पती पत्नी मुलांसमोर एकमेकांना कायदेशीर प्रक्रियेची धमकी देणे, मुलांना धमकावणे, दम देणे, त्यांच्या वर दबाव टाकणे, अथवा तसा प्रयत्न करणे या कृती करतात,  एकमेकांना सोडून द्यायची, वेगळं होण्याची भाषा करतात तेव्हा मुलांच्या मनस्थिती चा विचार केला जात नाही. घरातील अथवा ऑफिस मधील कुरबुरींचा राग मुलांवर काढणे, घरातील वडील धाऱ्या माणसांचा मुलांसमोर अपमान करणे, पती पत्नींनी भांडताना बोलताना असभ्य भाषा वापरणे, सातत्याने एकमेकांवर आरोप करत राहणे, आपल्या चुकांची समर्थन करीत राहणे, आपल्या भांडणांमुळे अपत्यांकडे दुर्लक्ष करणे, आपल्या बिघडलेल्या मनःस्तिथी चा परिणाम मुलांच्या संगोपनावर होऊ देणे यामुळे मुलांच्या मनावर खूप विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मुलं एकलकोंडी होणे, कुटुंबातील व्यक्तींशी संवाद, संपर्क भेटी गाठी टाळणे, घरगुती सभारंभात सहभागी न होणे, स्वतः चा जास्तीतजास्त वेळ सोशल मीडिया वर अथवा घराबाहेर घालवणे असे पर्याय घरातील कटकटी ला वैतागून निवडतात. 

एकदा मुला मुलींचं लक्ष घरातून उडालं की त्यांना बाहेरच जग, मित्र मैत्रिणी खूप चांगल्या वाटू लागतात.बाहेरील संपर्कात आलेली व्यक्ती आणि तिचा हेतू चांगला असेल तर ठीक अन्यथा घरातील अतिरिक्त बंधन, हुकूमशाही मोडून काढण्याकरिता खोटं बोलणे, खोटं कारण सांगून घरातून कुठेही जाणे, व्यसन करणे, अपघात घडणे, आत्महत्या करणे, चुकीच्या व्यक्तीच्या आहारी जाऊन वाईट सवयी आत्मसात करणे, नको त्या वयात प्रेम प्रकरण करून त्यातून काहीतरी अघटित निर्णय घेणे, घराबाहेरील कोणत्याही बेकायदेशीर, अनैतिक कृत्यात फसणे असे प्रकार घडतात आणि मुलांचं आयुष्य बरबाद होऊन, घरातील व्यक्तींना पण प्रचंड मानसिक क्लेश सहन करावा लागतो.  त्यामुळे कौटुंबिक अथवा पती पत्नी तील वाद विवाद आणि आपली आपत्य या सगळ्याचा समतोल राखून परिस्थिती कशी सांभाळायची याचा विचार प्रत्येक पती पत्नी ने करणे क्रमप्राप्त आहे.

Meenakshi Krishnaji Jagdale
सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

संपर्क. 9834114342 9766863443
(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)