सर्वात वर

शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी – छगन भुजबळ

राज्यातील गोरगरीब, मजुर वर्गाला शिवभोजन थाळीचा मोठा आधार  

मुंबई – राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अश्या काळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali)योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले आहे. काल पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.  

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागाने काल मोफत शिवभोजन थाळीचे (Shivbhojan Thali) वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखुन दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) ही राज्य सरकारची महत्वकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी देखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती.यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या आहेत.

संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा  गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजुर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान वाटत असल्याची भावना देखील श्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. 

शिवभोजन थाळीबद्दल माहिती देतानाच या योजनेवर टीका करणाऱ्यांचा समाचार देखील श्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतला आहे. गेले अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर (Shivbhojan Thali) टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.