सर्वात वर

दोनशे वेळा प्लेटलेटदान करणारा संवेदनेचा ‘समुद्र’

Swanand Samudra
श्री. स्वानंद समुद्र

प्रणव जायदे 

दि. १८ नोव्हेंबर २०२० हा दिवस जनकल्याण रक्तपेढीमध्ये झालेल्या एका आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमामुळे कायम लक्षात राहील. काय होता हा कार्यक्रम ? हा कार्यक्रम होता एका छोट्याशा सत्काराचा आणि सत्कारार्थी होते, रक्तपेढीच्या बृहदपरिवाराचे एक आत्मीय सदस्य श्री. स्वानंद समुद्र. या दिवशी त्यांनी केलेल्या प्लेटलेटदानाबद्दल हा सत्कार होता. खरं तर रक्तपेढीविज्ञानात सतत बदललेल्या तंत्रज्ञानामुळे हल्लीच्या काळात प्लेटलेटदान हा विषय तसा नवीन राहिलेला नाही. रक्तदानाप्रमाणेच रक्तातील प्लेटलेट या घटकाचेही दान करता येते आणि त्यामुळेही अत्यवस्थ रुग्णास जीवनदान मिळू शकते, ही बाब आता हळूहळू सर्वज्ञात होते आहे. जनकल्याण रक्तपेढीमध्येही असे अनेक प्लेटलेटदाते नियमितपणे प्लेटलेटदान करून जात असतात. मग असे असतानाही या छोटेखानी सत्काराचे प्रयोजन काय होते ? प्रयोजन हे होते की, या दिवशी श्री. स्वानंद समुद्र यांनी केलेले हे २०० वे प्लेटलेटदान ..! 

सामान्य रक्तदानाच्या तुलनेत प्लेटलेटदानाच्या एका प्रक्रियेस लागणारा बऱ्यापैकी अधिक वेळ, त्यासाठी लागणारी शारीरिक (आणि मानसिकही) पात्रता आणि यातील सातत्य टिकविताना येणाऱ्या अडचणी  हे सर्व पाहता २०० हा आकडा गाठणे ही निश्चितच सामान्य बाब नाही. वयाच्या ५३ व्या वर्षी हा आकडा गाठताना मागील सुमारे १७ वर्षे स्वानंदजी प्लेटलेटदान करत आलेले आहेत. २०० या आकड्याचा आणखी एक अर्थ म्हणजे सुमारे दोनेकशे रुग्णांना जीवनदान देऊन त्यांची घरे सावरण्याचे काम स्वानंदजी यांनी आजवर केले आहे. या कामाचे मोठेपण लक्षात घेता हा सत्कार खूपच सामान्य म्हणायला हवा. 

अर्थात केवळ एखादा विशिष्ट आकडा गाठण्यासाठीच हे सातत्य स्वानंदजींनी टिकवले आहे, असे मुळीच नाही. मागे एकदा रक्तपेढीच्या अशाच एका कार्यक्रमात बोलत असताना ‘प्लेटलेटदानामागील आपली भावना काय’ याबाबत स्वत: स्वानंदजी व्यक्त झाले.ते म्हणाले होते, ‘प्लेटलेटसारख्या पेशी माझ्या शरीरात आहेत, यात खरे तर माझे कर्तृत्व काय आहे ? तर काहीच नाही. मग त्यांचा वापर कुणा गरजू रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी होत असेल तर त्याकरिता माझा थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे ? बस्स. इतकीच माझी यामागील भावना..! त्यांचा हा दृष्टिकोन मला खूपच भावला. यात व्यावहारिकता आणि संवेदना या दोहोंचाही समतोल मला स्पष्टपणे जाणवला. ‘मी दिलेल्या थोड्या वेळाच्या बदल्यात कुणाचा जीव वाचत असेल तर यात मला कधीही अडचण असता कामा नये’, ही प्रेरणा घेऊन स्वानंदजी महाविद्यालयीन जीवनापासून कार्यरत आहेत. ‘सामाजिकता’ हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अभिन्न अंग म्हणता येऊ शकेल. ‘सतत काहीतरी देत रहावे’ ही त्यांची अंत:प्रेरणा अत्यंत प्रबळ आहे, हे त्यांचा सहवास अनुभवल्यानंतर सहजपणे लक्षात येते.

व्यवसायाने अर्थसल्लागार असल्याने वेळेतील आणि नियोजनातील काटेकोरपणा हीदेखील स्वानंदजी यांची खास ओळख आहे. त्यामुळेच प्लेटलेटदानातील सातत्य तर त्यांनी टिकवलेच या शिवाय प्लेटलेटदानासाठी ठरलेली वेळही त्यांनी आजपर्यंत कधी चुकवलेली नाही. ‘आज स्वानंदजी प्लेटलेटदान करण्यासाठी येणार आहेत’ हा संदेशच इथल्या तंत्रज्ञ आणि समुपदेशकांना आपले काम वेळेआधी पूर्ण करण्यास उद्युक्त करतो. पण याचा अर्थ त्यांच्या येण्याचे कुणाला दडपण येते, असेही मुळीच नव्हे. प्रारंभी उल्लेख केलेल्या कार्यक्रमात रक्तपेढीच्या तंत्रज्ञ सौ. संपदा देवपुजारी सहजपणे बोलून गेल्या, ‘प्लेटलेटदानाच्या तांत्रिक प्रक्रियेत दात्याचे सहकार्य फार आवश्यक असते. या दृष्टीने विचार करायचा झाल्यास आम्हा तंत्रज्ञ मंडळीसाठी स्वानंदजी यांचे प्लेटलेटदान हा कधीच दडपणाचा विषय नसतो. आजवरच्या सर्व प्रक्रियांमध्ये त्यांचे उत्तम सहकार्य आम्हाला लाभले आहे.’ प्रत्यक्ष प्लेटलेटदान करत असताना तंत्रज्ञांच्या कामात कधीही अनावश्यक हस्तक्षेप न करणारे स्वानंदजी आवश्यक तिथे योग्य त्या सूचनाही आवर्जून करतात. या सुचनांमागेसुद्धा ‘आपल्या रक्तपेढीची गुणवत्तावाढ’ याखेरीज दुसरी कुठलीही भावना कधीच नसते. त्यामुळे अशा सूचनांचा रक्तपेढीला उपयोगच होतो.

अर्थात स्वानंदजी यांचे मोठेपण केवळ प्लेटलेटदानाशी संबंधित नाही. जनकल्याण रक्तपेढी करीत असलेल्या सर्व रुग्णोपयोगी उपक्रमांची त्यांना उत्तम जाण आहे. एका थैलेसेमियाग्रस्त बालकास एक रक्ताची पिशवी मोफत देण्यास रक्तपेढीला दोनेक हजार रुपये खर्च करावे लागतात, यासारखी छोटी बाब त्यांच्या कायम लक्षात असते. त्यामुळेच आपल्या मित्रपरिवारातील कुणालाही विनासंकोच ‘एका बॅगेचा खर्च तू दे’ असे म्हणण्याचा मोकळेपणा त्यांच्याकडे आहेच, त्यात कुणी आर्थिक विवंचनेचे कारण देऊ लागला तर ‘तुझे पैसे कसे वाढवायचे ते मी सांगतो, ते वाढव आणि मग दे’ असे सांगण्याचे व्यावसायिक चातुर्यदेखील त्यांच्याकडे आहे.।। ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ।| उदास विचारे वेच करी ǁ’ या तुकोबांच्या उक्तीचे हे जणू प्रात्यक्षिकच. याबरोबरच विविध रोटरी क्लब्ज, लायन्स क्लब्ज व अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्याना स्वत: रक्तपेढी पाहण्यास घेऊन येणे, त्यांना रक्तपेढी, फिरून दाखविणे, येथील अधिकारी वर्गाची ओळख करून देणे, त्यांच्याकडून आर्थिक सहयोग मिळविण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणे अशी कामे स्वयंसेवक वृत्तीने स्वानंदजी नित्य करीत आलेले आहेत. या कामांतून अनेक नव्या-नव्या लोकांना त्यांनी रक्तपेढीच्या कामाशी जोडलेले आहे.

‘सतत देत राहणे’ या त्यांच्या आंतरिक उर्मीचाच हा परिपाक म्हणायला हवा.
या ‘देत राहण्याला’ रक्तपेढीच्या परिघाची मर्यादा आहे, असेही नाही. या परिघाबाहेरही ते सदैव चालूच असते. व्यवसाय म्हणून अर्थविषयक सल्ला देण्याबरोबरच अनेक गरजूंना निष्काम भावनेने अर्थसाक्षर करण्याचे कामही स्वानंदजी करत आलेले आहेत. रक्तपेढीच्या कर्मचारी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘जनकल्याण विचारमंच’ या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी उत्तम असे अर्थविषयक मार्गदर्शन सर्वांना केले होते. पुढे अनेकांना त्याचा चांगला उपयोगही झाला. याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून तळेगाव येथे चालविल्या जाणाऱ्या संजीवनी बालिकाश्रम या संस्थेच्या कार्यातही स्वानंदजी सक्रीय आहेत. तेथे राहून शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठीसुद्धा आपले व्यवसायादी व्याप सांभाळून त्यांची धावपळ कायम चालू असते. हे काम करण्यामागेही एक निश्चित विचार आहे. ‘बालिकाश्रमात येणारे पैपाहुणे आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतात आणि आपणही ते स्वीकारतो. पण ते स्वीकारत असताना आपणही त्यांना काहीतरी दिले पाहिजे’ असा एक सुंदर विचार त्यांनी तिथल्या मुलींना दिला आणि त्या परिसरात छोटी छोटी रोपे लावण्यासाठी सक्रीय प्रोत्साहन दिले. यातूनच पुढे, तेथे येणाऱ्या पाहुण्यांना ती रोपे भेट देण्यास प्रारंभ झाला. एका छोट्याश्या कृतीमुळे केवढी मोठी शिकवण तेथील मुलींना मिळाली !

प्लेटलेटदान असो किंवा निष्काम अर्थविषयक मार्गदर्शन असो, प्रत्यक्ष आर्थिक सहयोग असो अथवा चांगल्या व्यक्तींची जोडणी चांगल्या कामांशी करण्यासाठी केलेली वेळेची गुंतवणूक असो – स्वानंदजी या सर्व आघाड्यांवर अत्यंत शांतपणे, कुठल्याही गाजावाजाशिवाय आपले सातत्यपूर्ण योगदान देत आहेत आणि आता तर त्यांचा मुलगा कैवल्य, हादेखील रक्तदानाचा हा वारसा पुढे चालवीत आहे. २०० वे प्लेटलेटदान केल्यानंतरच्या सत्कारातही ‘हा एक टप्पा आहे, अजूनही पुढे भरपूर काही करण्याची इच्छा आहे’ असे स्वानंदजी सहजपणे म्हणून गेले. याचा अर्थच आकड्यापेक्षाही काम करत राहण्याला त्यांचे अधिक प्राधान्य आहे. आपल्या समाजाबद्दलची एक अव्यक्त आणि असीम संवेदना हीच त्यांच्याकडून हे काम करवून घेत असते. प्लेटलेटसंक्रमणासोबतच या संवेदनेचे संक्रमणही सर्वत्र होत राहो ! 

( महेंद्र वाघ यांचा लेख साभार )

आज पासून “पोस्टमन” हे सदर प्रणव जायदे यांनी जनस्थानच्या वाचकांसाठी साठी नियमित सुरु केले आहे. संपर्क- ९८२३०५१८६२