सर्वात वर

‘आत्मनिर्भर’ म्हणजे काय ग आई ?

डाॅ स्वाती गानू टोकेकर 

त्यादिवशी बातम्यांमधील भाषणात ‘आत्मनिर्भर भारत’ हा शब्द वारंवार येत होता .साहजिकच शेजारी बसलेल्या वेदांतने प्रश्न विचारला,” हे आत्मनिर्भर (Self-Reliant) म्हणजे काय असतं ग? “मला त्याच्या प्रश्नांचं कौतुकही वाटलं आणि हसूही आलं.’मलाही आत्मनिर्भर व्हायचंय’ तो म्हणाला. त्याला ही टर्म समजावून सांगण मजेदार होतं आणि अर्थपूर्णही.त्याला म्हटलं, ‘तुझं काम तू स्वतः करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. म्हणजे तुझं ताट ,पेला उचलून मोरीत ठेवणं, कपड्यांची घडी करुन ठेवणं,शाळेचं दप्तर भरुन ठेवणं,युनिफॉर्म ,बूट,मोजे,वाॅटरबॅग सारं रात्रीच तयार करुन ठेवणं आणि मुख्य म्हणजे तुझा अभ्यास तू करणं.गरज असेल तेव्हा मदत नककीच घेणं.आता कळलं आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे काय ते?मी म्हटलं. तो थोडा विचारात पडला.मग म्हणाला, पण माझ्या आई बाबांना वाटतं की मी अजिबात अभ्यास करणार नाही. मग मी आत्मनिर्भर कसा बनणार?

वेदांतचं म्हणणं ब-याच अंशी खरंही होतं.कारण ब-याच मुलांची आपल्या पालकांबद्दल ही समस्या असते की त्यांचे आईवडील त्यांचा अभ्यास घेतात.खरं म्हणजे घेऊन बसतात.मुलांचा गृहपाठ लिहून आणतात.त्यांचं वेळापत्रक पाहून त्याप्रमाणे बॅग भरुन ठेवतात.मुलांची शाळेची पूर्ण तयारी करून देतात.मुलांच्या अभ्यासाची, गृहपाठाची,त्यांच्या कामाची जबाबदारी जेव्हा पालक घेतात तेव्हा त्यांना हे कळत नाही की मुलांचा त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यावर असलेल्या विश्वासाला त्यामुळे तडा जातो.

तो परावलंबी होऊ लागतो.स्वतःच्या गोष्टी आपण स्वतःच करु शकत नाही असा परिणाम नकळतपणे त्याच्या मनावर व्हायला लागतो .असं केल्यने आपण एक मानसिकरित्या दुबळा ,आत्मविश्वास गमावून बसलेली व्यक्ती निर्माण करतो आहोत हेही ओव्हरप्रोटेक्टिव्ह पालकांना कळत नाही. यातून निर्माण होणारी मेंटल डिपेन्डन्सी ही फिजिकल  डिसेबलिटीपेक्षाही कितीतरीपटीने अधिक धोकादायक असते. 

दिव्यांग माणूस आपला एखादा अवयव अधू असला तर दुस-या अवयवांचा उपयोग करुन रोजचं आयुष्य जगू शकतो पण मानसिकदृष्ट्या दुर्बल होणं हे मुलांच्या भविष्यातील ब-याच क्षेत्रात अडचणी आणू शकतं.मुलांची प्रगती ह्या सेल्फ काॅन्फिडन्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. पण आपण त्यांच्या क्षमतांना अंडरएस्टिमेट करत असतो. 8 वर्षांची स्वप्ना जेव्हा तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे दोन भोपळे उचलून आणत होती तेव्हा इतरांना ते कठीण वाटत होतं पण त्यांना मात्र तिच्याबद्दल खात्री होती कारण त्यांनी तिला आत्मनिर्भर बनण्यासाठी संधी दिल्या होत्या. आणि हो तिने ते केलं .

तिच्या चेह-यावर आपण हे करु शकलो याचं आत्मनिर्भर (Self-Reliant) पण आणि मिश्किल हसूही होतं. हे आत्मनिर्भर होणं मुलं शिकतात तरी कसं आणि कुठून?त्याचं उत्तर आहे की ते प्रत्येकात इनबिल्ट असतंच.तू हे करु शकतोस.तुला हे नक्की जमेल.मीही प्रयत्न केला तेव्हा मला जमलं.हे शब्द प्रोत्साहन देतात.तो कसा करु शकतो आणि तू का नाही हे बोलणं म्हणजे मागे ढकलणं आहे.हे नको करु या.मुलांना त्यांची शक्ती, त्यांचे विचार,त्यांच्या कल्पना, त्यांचं प्लानिंग करु देत.नाही जमलं,चुकलं तर आपण आहोतच.

४-५ वर्षाची मुलं आपले कपडे  स्वतः घालू शकतात.साॅक्स,बूटही स्वतः घालतात.जेवू शकतात.छान अभ्यास करतात.बॅग नीट भरतात.आपण अधूनमधून लक्ष ठेवायचंच पण अपंग नाही करायचं शरीरमनाने.एक गंमत आहे की तुम्ही असा विचार करा की मूल लहान असले तरी त्याला स्वतःला आपलं भलं कळतं.पडतधडपडत,अंदाज घेत ते शिकत असतं.त्याला किती जमतं,काय आणि तेवढं ती करु शकते याचा अंदाज आईबाबांना साधारणपणे असतो मग अशावेळी मुलाची प्रगती कमी पडत असेल तर आपण काय करावं तर फक्त थोडं अधिक पुढे जाण्यासाठी तिला आपल्या क्षमतांची म्हणजेच अगदी सहजच ‘I know you can do it”म्हणावं.आपल्या आईवडिलांचा विश्वास, आशीर्वाद हा मुलांना खूप छान सपोर्ट वाटतो.

कारण तुमच्या डोळ्यात ते सारं जग शोधत असतात.तुमची भूमिका खूप महत्वाची आणि पुढे जायला प्रोत्साहित करणारी, अतिमदत करून डिसेबल करणारी अजिबात नसावी.मुलांना त्यांचं डेस्टिनेशन ठरवण्यात, ते साध्य करण्यात मदत करायची.कारण त्यांचा विश्वास, त्यांना आत्मनिर्भर होऊ देणं यातच त्यांच्या प्रगतीची पावलं उमटत जाणार आहेत. या आत्मनिर्भर (Self-Reliant) होण्यात आपल्याबरोबरच इतरांनाही पुढे घेऊन जाण्याचा संस्कारही मुलांना देता येईल हे किती चांगलं आहे नाही का?

Swati-Tokekar
डाॅ स्वाती गानू टोकेकर