सर्वात वर

महिलांनो आपल्या भावनांची इन्व्हेस्टमेंट योग्य ठिकाणी करा….

सौ. मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

आपण अनेकदा पाहतो की, आपल्या लग्नाच्या जोडीदाराकडून जेव्हा आपल्या  मानसिक भावनिक शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत त्याला पर्याय म्हणून दुसरी रेलशनशिप स्विकारण्याच्या घटना आपण पहिल्या आहेत.अश्या वेळी आपण धर्माने आणि कायद्याने कोणाचे तरी पती अथवा पत्नी असतो. आपल्याला अपत्य असतात, आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. आपले कुटुंबातील अनेक सदस्य असतात जे आपल्यावर जीवापाड प्रेम करीत असतात. पण यात जेव्हा तिसऱ्या आणि त्रयस्थ व्यक्ती चे आगमन होते तेव्हा त्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपले आयुष्य, आपले आर्थिक नियोजन, करियर, प्रतिष्ठा, आपल्या जोडीदारा सोबतच आपलं सहजीवन हें सगळंच पणाला लागत. 

खूपदा असे पर्यायी नातेसंबंध जोडताना आपण आपल्या पती अथवा पत्नी चे व्यक्तिमत्व, आर्थिक परिस्थिती, स्वभाव, सवयी, विचार, वागणूक कशी चुकीची आहे आणि आपल्यावर किती अन्याय होतो आहे,आपण कसे मजबूरी मध्ये संसार करीत आहोत हे अतिरंजित करून सांगितले जाते. त्यामुळे समोरचा भावनावश होऊन, प्रसंगी आपणच या व्यक्तीला अश्या कठीण प्रसंगातून सावरू शकतो हि मानसिकता ठेऊन आपल्या आयुष्यात एन्ट्री करतो.अनेक महिलांना (Women) स्वतः च्या पती कडून आपल्यावर कसा अन्याय अत्याचार होतो आहे हे इतरांना सांगून सहानुभूती मिळवण्याची सवय असते. त्यावेळेस महिला हे विसरतात की समोरील प्रत्येक व्यक्ती आपली हितचिंतक नाहीये. वास्तविक कोणतेही असे संबंध ज्याला कायद्याचे समाजाचे कुटुंबाचे पाठबळ नाहीये ते केवळ तात्कालिक असतात, त्यातून काहीही साध्य होणार नसत. परंतु अश्या अनेक महिला आहेत ज्या स्वतः च पूर्ण आयुष्य या मृगजळामागे वाया घालवतात अशा काही गोष्टी घडल्या आहेत . 

आपल्या भावनांची आपल्या सुख दुःखाची आपल्या मूड च मुखत्यार पत्रच आपण एका अश्या परक्या व्यक्ती ला देतो की आपलं स्वतः च ध्येय, आपलं आयुष्य, आपली स्वप्न दिशाहीन होऊन जातात.आपण कितीही पुढारलेले आधुनिक विचार मांडले तरी आजही आपल्या समाजात पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे महिलांच्या आयुष्याची कटी पतंग बनायला वेळ लागत नाही. दरवेळी अश्या रिलेशन मुळे महिलांच शोषली जाते असे नाही तर अनेक सुसंस्कृत सुशिक्षित चांगल्या कुटुंबातील पुरुष देखील चुकीच्या मार्गाला जाऊन आपलं भवितव्य बिघडवून घेतात.कोणतीही स्त्री (Women) कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ येतें आहे आणि तिला आपल्याकडून नेमका काय अपेक्षित आहे याचा शहानिशा करताना पुरुष कमी पडतात आणि स्वतः च्या सुखी संसारात विनाकारण व्यत्यय आणतात.

कोणतीही पत्नी अथवा पती १००% एकमेकांना पूरक आणि मेड फॉर इच अदर बोलले जात असले तरी त्यामध्ये काहींना काही अडचणी अथवा स्वभाव दोष असतातच.पण एकमेकांच्या उणिवा भरून काढून पुढे जाणे हे सहजीवनाचे रहस्य खूप कमी लोकांना उमगते.ज्या ज्या वेळी विवाहबाह्य संबंध बाबतीत प्रकरणे समुपदेशन साठी येतात तेव्हा जाणवते की आयुष्यातील किती बहुमोल वेळ, उमेद, पैसा, शक्ती यांनी वाया घालवली आहे. जर अश्या प्रेमप्रकरणात पण तडजोडच करावी लागते आहे तर ती आपल्याच पती अथवा पत्नी सोबत का केली नाही?  जर अश्या रेलशनशिप मध्ये पण वाद होतोच आहे, एकमेकांवर संशय घेतला जात आहे, आपल्याला पूर्ण न्याय आपल्या त्यागाच्या तुलनेत मिळतंच नाहीये मग का करतोय आपण जीवाची एवढी ओढाताण.


सुमन (काल्पनिक नाव ) सांगत होती ताई २०११ ला माझ्या पतीचे अपघाती निधन झाले. मला दोन मुल आहेत, सासरच्यांनी मला माझ्या पतीच्या वाटेची मालमत्ता नावावर करून दिली आहे, त्यातून स्वतः च घर मी घेतलं आहे आणि आता मी स्वतः च गिफ्ट आर्टिकल च दुकान टाकून उदरनिर्वाह करते आहे. सुमन फक्त ३० वर्षाची होती जेव्हा तिला वैधव्य आलं.  सुमन इतक्या लहान वयात तू दुसरं लग्न का केल नाहीस तुझी मुल खूप छोटी असतील तेव्हा ती आरामात ऍडजस्ट झाली असती,  आणि तुमचं आयुष्य सेटल झालं असत. सुमन तू दिसायला चांगली आहेस,  स्वतः व्यवसाय पण करते, सासर चे लोक अजूनही लांब राहून पण तुला साथ देतात माहेरी पण परिस्थिती बरी आहे मग तुझा दुसरा विवाह निर्णय तू का घेतला नाहीस?   दहा वर्ष का एकटी राहाते आहेस? हे विचारल्यावर सुमन चा चेहेरा खूप उतरला आणि तिने मागील दहा वर्षाच्या घडामोडी सांगायला सुरुवात केली. 

ताई पती च्या निधनानंतर मी खूप एकटी पडले होते मला स्वतःला सांभाळणं खूप कठीण जात होत,  त्यातच माझ्या दुकानावर खरेदी ला कायम येणारे एक गृहस्थ यांचे शी माझी चांगली ओळख झाली. हे गृहस्थ वयाने माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठे होते आणि उच्च पदस्थ होते. समाजात त्यांचा नावलौकिक आणि ओळखी होत्या. त्यामुळे माझ्या मुलांची शाळेतील काही काम, घरातले काही व्यावहारिक निर्णय यात मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. यातून एकमेकांच्या घरी येणं जाण सुरु झालं. या गृहस्थांची पत्नी त्यांच्या मुलांसोबत अनेक वर्षा पासून  माहेरी राहत असल्याचे समजले.  

या व्यक्ती कडून मिळालेल्या माहिती नुसार त्यांची पत्नी आता परत कधीच नांदायला येणार नव्हती. कारण विचारले असता या व्यक्ती ने आणि त्याच्या कुटुंबीयांनी  देखील त्याची पत्नी कशी चुकीची होती यावर पूर्ण कहाणी सांगितली. हळूहळू आमच्या ओळखीचे रूपांतर भेटीगाठीत होऊन कधी प्रेमात झाले ते कळलेच नाही. 

मला माझ्या दोन मुलांना सर्वतोपरी मदत, आर्थिक साहाय्य, कोणतीही धावपळ हि व्यक्ती करत होती. या व्यक्तीच्या घरातले देखील आमच्या नात्यावर खूष होते कारण त्यांना त्याच्या मुलाच्या आयुष्यात बायकोची मुलांची कमी भरून काढायला मी होते. त्या घराला मी आपलंस केल. तेथील सर्व जबाबदाऱ्या मी स्विकारल्या. आता आम्ही नित्यनियमाने त्याच्या घरात एकत्र राहणे, हिंडणे, फिरणे, सर्व कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रमात एकत्र सहभागी होणे, सातत्याने नवरा बायकोसारखे आयुष्य जगणे यात खूष होतो. यावर यांच्या कुटुंबातील कोणाचाही काही आक्षेप नव्हता. पत्नी तर लांबच होती त्यामुळे तिचा आम्हाला कोणताही अडथळा नव्हता. 

पण जसजस काही वर्षांनी मला या व्यक्ती चे इतर नातेवाईक,ओळखीचे,शेजारी  यांचे कडून कळू लागले की यांची पत्नी मुल हे गृहस्थ एकमेकांना भेटतात, ते एकमेकांपासून लांब असले तरी सातत्याने बोलतात, पत्नी ची स्वतःच्या मुलांची सर्व जबाबदारी हे गृहस्थ व्यवस्थित पार पाडतात. विशेष म्हणजे त्यांच्या मध्ये कायदेशीर फारकत झालेली नाही, त्यांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलेलं नाही. हे समजल्यावर सुमन खूपच कष्टी झाली होती.त्याही पेक्षा तिने अजून खोलात जाऊन चौकशी केल्यावर, माहिती घेतल्यावर  या व्यक्ती चे अजून अनेक ठिकाणी अनेक महिलांशी (Women) संबंध आहेत, हि व्यक्ती अतिशय उच्च पदस्थ असल्यामुळे कायम गावोगावी दौरे असतात या ठिकाणी देखील यांनी अश्या अनेक महिलांना आधार देऊन, सोबत देऊन, वेळप्रसंगी भावनिक ब्लँकमेल करून संबंध ठेवलेले आहेत हे माहिती झाल्यावर सुमनला  प्रचंड धक्का बसला. 

या सर्व महिला (Women) माझ्यासारख्याच होत्या ज्यांना वाटतं होते की हि व्यक्ती फक्त आपल्याशी प्रामणिक आहे आणि फक्त आपल्या वर प्रेम करत असून आपल्याशीच शारीरिक संबंध प्रस्तापित केलेले आहेत. यातील अनेक महिलांना(Women) संपर्क करून सुमन ने सत्य परिस्थिती माहिती करून घेतली आणि तिला समजलेली माहिती खरी आहे यावर शिक्का मोर्तब झाले. पण सुमनला हे सगळं जसजस समजू लागलं तिच्या  आयुष्यातील ७-८ वर्ष निघून गेलेली होती.सुमन ने सांगितलं अनेकदा मी या व्यक्तीला विचारले, त्रागा केला, संबंध तोडण्याचा प्रयत्न केला पण मी आता चाळीशी ला आले आहे. माझी मुल बरीच कळती झाली आहेत. ती लहानपणापासून या व्यक्तीलाच स्वतः चे वडील समजतात. या व्यक्ती सोबत माझं नाव जोडल्या गेल्या मुळे माझी सगळीकडे बदनामी झालेली आहे. लोक मला माझ्या माघारी अतिशय खालच्या दर्जा चे शब्द वापरतात. त्या व्यक्ती च्या घरच्यांना देखील याबाबत विचारले असता ते म्हणतात तुला काय माहिती नव्हतं का त्याला बायको पोर आहेत त्यानं काही लपवलं नव्हतं. तो पुरुष आहे, तुला तूझ्या मर्यादा कळायला हव्या होत्या.  

एका विवाहित पुरुषाच्या घरात घुसताना तू विचारलं का आम्हाला?  आणि इतर महिला असतील त्याच्या संपर्कात तर आम्ही काय करू? तुला माहिती नाही का तो किती वरच्या पदावर आहे त्याच्या कामाचे स्वरूप किती मोठे आणि व्यापक आहे त्याला अनेक माणसे हाताशी धारावीच लागतात. तुला समजलं  पाहिजे की एका विवाहित पुरुषा सोबत तू सगळीकडे फिरते. आमच्या लेखी तू फक्त त्याचे साधन आहेस यापलीकडे तुला आमच्या मनात आणि घरात कोणतेही अस्तित्व नाहीये. 

ताई दहा वर्ष होऊन गेलीत आमच्या या संबंधांना आजही मला कळत नाहीये या व्यक्ती च्या आयुष्यात माझं काय स्थान आहे आणि आमच्या नात्याचं नाव काय आहे. मला यातून बाहेर पडायला मदत करा. सुमन ने स्वतः च्या आयुष्यातील दहा वर्ष अश्या व्यक्ती च्या मागे वाया घालविली होती ज्या संबंधांना कोणताही भविष्य, कोणतंही सामाजिक स्थान नव्हतं. फक्त एखाद्या व्यक्ती कडून मिळणारा तात्पुरता आधार, आर्थिक हातभार, थोडीफार मौज मजा आणि चंगळवाद यासाठी वेळीच योग्य जोडीदार निवडून लग्न करून सन्मान पूर्वक आयुष्य जगणे सुमन ने स्वीकारले नाही आणि आज ती स्वतः ला पूर्ण असुरक्षित समजत होती. 
अश्या पद्धतीने विवाहित पुरुष अथवा महिला यांनी स्वतः च्या सोयीसाठी जर असे संबंध प्रस्थापित केलें असतील किंवा करत असतील तर अश्या नात्याला दुजोरा देतांना आणि त्यात वाहवत जाताना प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे. महिलांनी आपल्या भावनांची गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तरच त्यातून त्यांचं आयुष्य मार्गीलागेल. याठिकाणी आपण कोणाला दोष देणार?  

ज्या व्यक्तीने सुमन ला आपल्या घरात सहारा दिला? ज्या तिच्या कुटुंबातील लोकांनी तिला वेळीच  या प्रकरणातून भविष्यात उभे राहणारे भयंकर परिणाम याची जाणीव करून दिली नाही? की या व्यक्तीचे कुटुंब ज्यांनी एका विवाहित,  मुलं बाळ असलेल्या  पुरुषाला असले अनैतिक संबंध ठेऊन, कायदेशीर पत्नी असतांनादेखील,  बेकायदेशीर रित्या सुमन ला घरात ठेऊन घेणे यासाठी पाठिंबा दिला??  

यात दोष कोणाचाही असला तरी सर्वात मोठ नुकसान सुमन च झालेलं होत.आयुष्यातील दहा वर्ष ती तिच्या दोन मुलांसोबत अश्या विचित्र परिस्थिती मध्ये राहिली होती आणि आजही राहत होती की तिच्या भविष्यात फक्त अंधःकार होता. याठिकाणी सुमन सारख्या महिलांना (Women) एकच सांगावस वाटतं की आपल्या भावना योग्य ठिकाणी गुंतवा. मी तुझ्यापासून काहीच  लपवलं नव्हतं म्हणून पुरुष मोकळा होऊन जातो, बाई ला कळायला पाहिजे म्हणून समाज हात वर करतो, चुकीच्या व्यक्ती मागे लागून, स्वतः च बहुमोल आयुष्य असं मातीमोल होऊ देऊ नका.

Meenakshi Krishnaji Jagdale
सौ. मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

संपर्क. 9834114342 9766863443

(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)