सर्वात वर

महिलांनो कायदा तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. .! गैरवापर करण्यासाठी नव्हे

 सौ. मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे  

आजकाल समाजामध्ये घटस्फोट चे प्रमाण खूप वाढत आहे, आजकाल लग्न टिकत नाहीत, वातावरण खूप बदललं आहे, आमच्या वेळी असं नव्हतं यासारखे विषय आपण सतत ऐकत असतो. अश्या घटनांमध्ये चूक नवऱ्याची की बायकोची यावर विचार केला तर अनेकदा लक्षात येतें की चूक दोघांमधील कोणाचीच नसते.उद्भवलेली परिस्थिती चुकीची असते किंवा या नवरा बायकोच्या आजूबाजूचे सल्लागार मंडळातील लोक चुकीचे असतात. 

नवीन नवीन लग्न झालेल्या मुली त्यांच्या समस्या घेऊन येतात किंवा फोन करतात तेव्हा त्यांचा पाहिला प्रश्न असतो, मला माझ्या नवऱ्यावर केस करायची आहे, त्याला पोलीस स्टेशन ची हवा दाखवायची आहे, त्याला दंडे बसल्याशिवाय तो ठिकाणावर येणार नाही, त्याला कोर्टात फेऱ्या मारायला लावून जाम करायचं आहे, फारकतीची  प्रक्रिया काय असते, आम्हाला जास्तीजास्त लग्न खर्च आणि रक्कम घेऊन प्रकरण मिटवायचं आहे. आम्ही दिलेलं सगळं सामान आम्ही वसुल करणार, आम्हाला त्याला एक रुपया पचू द्यायचा नाही काय करावं लागेल?  या प्रश्नातून या नवं विवाहित मुलींचा पोरकटपना, बालिश पणा तर दिसतोच पण मुलीचे आई वडील काका मामा असे अनुभवी लोक सुद्धा हिच भाषा बोलतात तेव्हा खरंच आश्यर्य वाटते.

महिलांच्या सुरक्षेसाठी, महिलांना न्याय मिळवून देणेसाठी अनेक उपयुक्त कायदे (Law)आहेत आणि त्याचा वेळोवेळी योग्य ठिकाणी वापर देखील केला जात असतो.  या सर्व कायद्याबाबत आपण इथून पुढील लेखांमध्ये सखोल मार्गदर्शन करणार आहोतच. 

पण त्याआधी कायद्याचा आपल्या स्वार्थासाठी, एखाद्याचे आयुष्य खराब करण्यासाठी, एखाद्याची तितकी गंभीर चूक नसताना देखील त्याच करियर संपवायला दूर उपयोग कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची गरज आहे. अनेकदा महिलांना स्वतः ची चूक दाखवून देणारे, ती चूक समजून सांगणार कोणी भेटतच नाही.जो उठतो तो हाच सल्ला देतो की पोलिसात तक्रार कर, कोर्टात केस कर. पतीपासून आपल्याला होणारा त्रास हा कोणत्या प्रकारचा आहे, नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे, त्यामागे काय कारण आहे, त्यावर आपण कोणते उपाय केलेत, कोणाकोणाची मदत घेतली, आपल्याकडून सकारात्मक असं कोणतं पाऊल उचललं याचा विचार होणे आवश्यक आहे. 

मुलीच्या घरच्यांनी देखील फक्त मुलगी सासरी नांदू शकत नाही म्हणून माहेरी आल्यावर मोठया प्रमाणात लग्न खर्च वसूल करणे, जास्तीतजास्त खावटी मिळवणे, यासाठीच जोर लावण्याचा प्रकार सर्रास दिसून येतो आहे.  

त्यात विघ्नसंतोषी लोक अतिशय आत्मविश्वास पूर्वक सांगतात की या नवऱ्यावर कोणती कलम लागली पाहिजेत, त्याला कोणती शिक्षा झाली पाहिजे, तो जेल मध्ये गेला पाहिजे, त्याच सगळं कुटुंबाला कशा यातना होतीलअसे सल्ले देत असतात  आणि सल्ले देणारे लोक अनेकदा यशस्वी होतात.कायद्यांची जराही माहिती, शिक्षण नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारे मुलीला देखील अश्या भूमिका घ्यायला प्रवृत्त केलें जाते.

अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत घरातील मुली, घरातील इतर मंडळी कायद्यांबाबत स्वतः चे तुटपुंजे ज्ञान पाजळताना दिसतात. आपल्या मुलीच्या समस्या, तिला होणारा वैवाहिक जीवनातील त्रास याकडे एककल्ली एकाच दृष्टीकोनातून न पाहता, सर्वांगीण विचार करून, सर्व जाणकारांचे, तज्ज्ञांचे सल्ले मत घेऊन जास्तीजास्त सकारात्मक मार्ग काढायचा प्रयत्न करून मगच महिलांनी टोकाची भूमिका घेणे योग्य राहील असे वाटते. 

घरातील मोठी माणसे लग्नाला फक्त व्यावहारिक  नजरेने बघतात की काय असा प्रश्न पडतो ? परंतु पती पत्नी साठी ते मनोमिलन,  भावनिक गुंतवणूक,  प्रेम असते आणि त्यांच्या उभ्या आयुष्याचा तो प्रश्न असतो. त्यामुळे हे नाते पैशात तोलून, कायद्याच्या आधारे वसुलीचे काम करण्यापेक्षा, वडीलधाऱ्या मंडळींनी हा प्रश्न भावनिक मानसिक दृष्ट्या सोडविण्याचा प्रयत्न करणे जास्त फायदेशीर आहे. 

अनेकदा मुलीकडच्या लोकांचा असा गैरसमज असतो की पती आणि पती कडील नातेवाईक यांची इज्जत गेल्यावर, त्यांना कोर्टात किंवा पोलीस स्टेशन ला यायला लागल्यावर किंवा त्यांना नोटीस गेल्यावर ते घाबरतील, त्यांचा अपमान होईल आणि त्यातून आपल्याला काय मिळेल ? आपल्या मुलीला काय मिळेल?  हे सर्व करून खरंच तिच्या आयुष्यातील प्रश्न सुटतील की वाढतील ही  विचार करण्याची गोष्ट आहे.  समोरच्याला अपमानित करण्याच्या प्रयत्नात आपली इज्जत अबाधीत राहील का ?  हा पूर्ण विचार कोणीच केलेला नसतो. मुळात नवीन नवीन लग्न झाल्यावर पहिले वर्ष हि पूर्ण होत नाही तोच छोटया छोटया कारणावरून, तक्रारी वरून परिस्थिती चा कोणताही शहानिशा न करता, केवळ कायद्याला हाताशी धरून समोरच्याची खोड मोडणं, त्याला बदनाम करणं, त्याच मानसिक खच्चीकरण करणं यावर भर दिला जातो. 

अनेकदा हे सगळं करताना कुटुंबातील लोक संबंधीत विवाहितेचा अजिबात विचार घेत नसतात. तरी लग्न ठरलेल्या, लग्न झालेल्या महिलांनी कौटुंबिक कायदे व्यवस्थित समजून घेणे, न्याय प्रक्रिया, पोलीस प्रशाशनाची वैवाहिक समस्यांमधील भूमिका, विविध संस्था संघटनांच कार्य या यावर अभ्यास करणे, आणि तिथं पर्यंत आपल्याला जाणे खरंच आवश्यक आहे का याचा विचार पूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे. 

अनेकदा समुपदेशन केसेस मध्ये पतीशी आणि पतीच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात येतें की प्रत्येक वेळी महिलांवरच अन्याय अत्याचार होतो असे नाही तर अनेकदा पुरुषांना देखील महिलांनी केलेल्या चुकीच्या आणि खोट्या तक्रारींमुळे मानसिक तणावातून जायला लागते. संसार सुरळीत होण्यापेक्षा चुकीच्या भूमिकांमुळे, चुकीच्या निर्णयामुळे, अती घाई केल्यामुळे मुली आणि मुलीकडील मंडळी आधीच विस्कळीत झालेला प्रपंच पूर्ण मोडून टाकायला निघतात.  त्यामुळे या विषयावर मोठया प्रमाणात जन जागृती होणे, समाज प्रबोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. 

समुपदेशन यावर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करू शकते. समुपदेशन मध्ये फक्त पती आणि पत्नी यांनाच विचारत न घेता, दोन्ही कडील कुटुंबियांना विश्वासात घेऊन पर्याय शोधायला मदत केली जाते.त्यामुळे आपल्या वैवाहिक आयुष्यातील कोणतीही समस्या, कोणताही त्रास मग आपण पती असाल किंवा पत्नी यावर आमच्याशी विचारविनिमय नक्कीच करू शकता. 

Meenakshi Krishnaji Jagdale
सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे  

संपर्क. 9834114342 9766863443

(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)