सर्वात वर

झाकीर हुसेन हॉस्पिटल दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक – नाशिक महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल (Zakir Hussain Hospital) झालेली ऑक्सिजनची गळती व त्यात २२ रुग्ण दगावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी भादंवि कलम ३०४(अ) अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.कालच्या या दुर्दैवी घटने मुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

या वायुगळतीस हलगर्जीपणा कारणीभूत असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी  ही फिर्याद दिली असून, फिर्यादीत म्हटले आहे, की डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) काल दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास पोहोचलो असता रुग्णालयाच्या आवारात (Zakir Hussain Hospital) एक सफेद रंगाचा ऑक्सिजनचा टँकर (क्रमांक एमएच 16 एई 7573) उभा होता. या टँकरमधून ऑक्सिजन भरतेवेळी गळती होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा सफेद धूर बाहेर निघत असल्याचे दिसून आले. 

यावेळी टँकरवरील कर्मचारी व रुग्णालय प्रशासन हे गळती बंद करण्याचे प्रयत्न करीत होते. त्या ठिकाणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथकही वाहनासह आले होते .त्यांनी त्यांच्याकडील साधनाद्वारे सदरचा धूर कमी केला. सदरचा परिसर आम्ही संरक्षित केला. त्यानंतर काही वेळाने रुग्णालयाच्या प्रशासनाने गॅसगळती विषयातील तज्ज्ञ इंजिनिअर बोलावले. त्यांनी सदरची गळती दुपारी पावणेदोन ते दोनच्या दरम्यान बंद केली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाच्या (Zakir Hussain Hospital) प्रिमायसेसमध्ये कोविडच्या रुग्णांसाठी लिक्विड ऑक्सिजनचा गोलाकार उभा टँक बसविण्यात आला आहे. त्यातून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. 

सदरचा टँक हा इनोस्क्वा या कंपनीचा असून, त्याचा मॉडेल क्रमांक व्ही 0418 ईसी (टी) टीओव्ही 2018 ईसी (टी) असा आहे. त्या टँकरवर त्याच्या वापराचा नकाशा स्टील प्लेटमध्ये लावण्यात आला आहे. सदरची टँक ही १३ केएल ऑक्सिजन क्षमतेची असून, टायो निप्पॉन या कंपनीकडून दहा वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. हा टँक दि. ३१ मार्च २०२१ रोजी कार्यान्वित करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले. महापालिकेने डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल (Zakir Hussain Hospital) हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयाची क्षमता दीडशे रुग्णांची असून, प्रत्यक्षात 157 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३१ रुग्ण हे ऑक्सिजनवर, १५ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत व ६१ रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत होते; परंतु काल दुपारी १२.२० ते २ वाजेच्या दरम्यान ऑक्सिजन टँकमधून गळती सुरू झाल्याने ऑक्सिजनचा रुग्णांना आवश्यक असलेला पुरवठा झाला नाही. 

त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २२ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या टँकमधून झालेल्या गॅसगळतीमुळे व सदर गॅस गळतीस जबाबदार असलेल्या व्यक्तींच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाला आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे. तूर्त भद्रकाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनीच ही फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2 च्या दीपाली खन्ना यांनी करावा, असे आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले असून, या प्रकरणी भा. दं. वि. कलम 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.