सर्वात वर

अनेक दुर्लक्षित कलाकारांवर आलीय उपासमारीची वेळ

 धनंजय धुमाळ (संगीत दिग्दर्शक)

आतापर्यंत सामान्य माणसांपासून ते इतर सर्व क्षेत्रातील माणसांच्या रोजगाराविषयी ,आरोग्याविषयी आणि भवितव्याबाबत अनेक पातळीवर सखोल चर्चा झाली आणि होत आहे. काही जणांना मदतीचे ओघ ही सुरू झाले , त्यांना मदतीचे आश्वासन मिळाले हे मात्र योग्यच आहे आपले शासन व केंद्रसरकार जनतेच्या भल्यासाठी गांभीर्यपूर्वक विचार करते आणि कार्य ही करतेय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांचे आभार….पण कायम दुर्लक्षित राहीले ते आमचे कला क्षेत्र…..कोणे एके काळी याच कला क्षेत्राला राजाश्रय प्राप्त होता….हा इतिहास सर्वश्रुत आहेच…पण आज ही कला आणि तिची उपासना करून उदरनिर्वाह करणारा कलाकार (Artists) आज मात्र सर्वांच्या नजरेतून कसा दुर्लक्षित झालाय कळत नाही. याच कलाकारांकडे फक्त करमणुकीचे साधन या नजरेतून बघितले जाते…..आमच्या संगीत , नृत्य , नाट्य , लोककला , तमाशा व चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या भवितव्याबाबत कोणी कधीच आपुलकीने विचार करत नाही…आणि जरी कलाकारांच्या भवितव्याबाबत विचार केला तरी येण्याऱ्या कामाची , मिळणाऱ्या अर्थार्जनाची दिर्घकालीन शाश्वती नाहीच….शासनाकडून त्यांच्या कामाव्यतिरिक्त या कलाकारांची (Artist) कधी आठवण होत नाही.

छोट्यात छोट्या कलाकारांच्या (Artists) उपजीविकेसंदर्भात शासन दरबारी मात्र याची नोंद घेतली जाते की नाही हे अनाकलनीय आहे. आज या कलाक्षेत्रातील मोठी नावाजलेली नावे वगळता बॅकस्टेज कलाकार व सह कलाकारांचा सन्मान कधी होत नाही. त्याच्या भवितव्याबाबत आरोग्याबाबत , सुरक्षाविषयी ठोस निर्णय कोणीच घेत नाही. कित्येकदा अशा अनेक गरीब कलाकारांना भविष्यकाळातील नियोजन न करता आल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते….कित्येक कलाकारांचे संसार उद्ध्वस्त ही झाले. काही अनेक मोठमोठी प्रतिष्ठित मंडळी व संस्था मात्र याच कलाकारांना पुरस्कार , भविष्यातील मिळण्याऱ्या कामाचे आमिष दाखवून , गोड गोड बोलून त्यांच्या कलेचा फक्त वापर करून घेतात. काही जण पैसे ही देत नाही.. गोड बोलून कधी पोट भरते का ???  हे दुष्टचक्र कधी थांबणार कुणास ठाऊक ??? 
कलाकार (Artists) हा कोणत्या ही जाती , धर्मात न अडकता आपली कला सादर करतांना फक्त उपासक , साधक म्हणून जगत असतो…..आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे या क्षेत्रातील प्रत्येक जण खुप पैसे कमावतात…आज ही अनेक कलाकार मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर स्वतःचे व कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाही. काही ठराविक कलाकारांचे अपवाद वगळता…..बाकीच्या कलाकारांचे उत्तरार्धातील भवितव्य आतापर्यंत अंधारातच राहीले , अंधारात आहे व अंधारातच राहणार आहे असे वाटते. 

अशा अनेक कलाकारांचे (Artists)  दुःख पाहून निर्माते रमेश तलवारे , कला दिग्दर्शक शाम लोंढे , कॅमेरामन-दिग्दर्शक रवि जन्नावार , कार्यकारी निर्माते व एकदंत या संस्थेचे संचालक अमित कुलकर्णी , NDOA चे संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड आदी काही कलाकारांनी मात्र पदरचे पैसे खर्च करून कलाकारांनासाठी जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन मदत केली. 

जेष्ठ कलाकारांना (Artists) पेन्शन मिळावी म्हणून राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कलाकारांसाठी (Artists)  घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे व पुढाकारामुळे संगीतकार संजय गीते , नाशिक नाटय परिषदेचे सचिव सुनिल ढगे आदींच्या माध्यमातून कार्य सुरू आहे.

खर तर तळागाळातील गोरगरीब कलाकारांपर्यंत ही मदत पोहचण्याची गरज आहे. अनेक जेष्ठ, श्रेष्ठ , वयोवृद्ध कलाकार अजून ही या सरकारी योजनेपासून वंचित आहेत. 

आज ही प्रसिद्धीपासून दुर असलेल्या या कलाकारांना स्थानिक प्रशासनाकडून , राज्य शासनाकडून आणि केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केव्हा मिळेल ??

काही जण मदतीसाठी प्रयत्न ही करतात. पण काही मध्यस्थी ( दुसर्‍याचा विचार न करणारे ) त्यांना आश्वासन देऊन माघारी पाठवितात.
 महत्त्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या कृपेमुळे काही जणांना ती मदत मिळाली सुद्धा हे ही नाकारता येणार नाही…. ..जसे जुने दुर्लक्षित पण सुप्रसिद्ध स्वाभिमानी गीतकार संतोष आनंदजी यांना मदत मिळाली ( पार्श्वगायिका नेहा कक्कर हिने दिलेल्या रक्कमेमुळे , तिच्या मनाच्या मोठेपणामुळे )….खर तर त्यांच उर्वरित भविष्य पाहता त्यांना उशिरा मिळालेली मदत ही तुटपुंजी म्हणावी लागेल……पण इतर कलाकारांचे काय ??? आता तर एक वर्षापासून सर्व स्त्री – पुरूष कलाकारांची परिस्थिती बिकट होत होत फारच हलाखीची झाली आहे…..काही कलाकार (Artists)  आज ही न सांगता येणाऱ्या अंत्यत वाईट परिस्थितीत जगत आहेत …..काही जण तर या लॉकडाऊनच्या काळात ही वेगळी वाट पकडून जगण्याची धडपड करत आहे. असाच एक रंगकर्मी अवलिया म्हणजे युवा अभिनेता प्रथमेश जाधव. या रंगकर्मीने कला जिवंत राहावी म्हणून आपल्या घराच्या गच्चीवरच कुटुंबासमवेत , युवा लेखक मनोज खैरनार आदींसह सोशल डिस्टन्स पाळुन निस्वार्थपणे खुला रंगमंच्याची स्थापना केली व जगभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून नाट्यचळवळीस संजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय पण या रंगकर्मीने किती दिवस खुला रंगमंच मोफत उपलब्ध द्यावा यावर मात्र आपण सर्वांनी सखोल विचार करायला पाहिजे…..

अशाच पुण्याच्या एका कलाकाराने (Artists) कोरोना काळात कुलकर्णी वडापावचे दुकान वजा हॉटेल सुरू केले….कसबस हॉटेल सुरू असतांनाच लॉकडाऊनमुळे ते ही बंद करावे लागले….अशा परिस्थितीमुळेच त्या कलाकाराचा भावनिक उद्रेक झालाय , काही जण घरोघरी जाऊन भाजीपाला विकतात , तर काही किराणामाल विकतात , काही हमाली करतात तर काही चहा टपरी चालवतात… तर बाकीचे हतबल होऊन बसले स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या , घर मिळविण्यासाठी विनवण्या करणाऱ्या नटसम्राट आप्पासाहेब बेलवणकरांसारखे…. एकेकाळी याच सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा कलाकार आज इतका लाचार झाल्यासारखा त्याच सर्व सामान्य लोकांसमोर मात्र हतबल होऊन जीवन जगत आहे..या सारखी दुसरी शोकांतिका नाही. 

गरीब कलाकारांबरोबर मध्यमवर्गीय कलाकारांची (Artists) अवस्था तर फारच कठीण आहे. समाजातील मानसन्मान , प्रतिष्ठा खूप मोठी पण घरातील परिस्थिती खुपच नाजूक..सहन ही होत नाही आणि सांगता येत नाही. अशी अवस्था झालीय सगळ्यांची.अशा आमच्या कलाकारांची इतकी दयनीय अवस्था होईल असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते…. मला मान्यच आहे सद्याच्या बिकट परिस्थितीत निर्बंध हा विषय महत्त्वाचा आहे मग हेच सरकारी नियम पाळणारा , प्रत्येकाचा आदर करणारा , उपाशी राहणारा , दुःख गिळुन थकलेला , दमलेला कलाकार आज कोणालाच दिसेनासा कसा झालाय……आता बघा काही सर्व सामान्य आणि  सुशिक्षित माणसं आजूबाजूस सर्रासपणे बेधडक कसे ही वागतात..काही जण नियम ही पाळत नाहीत , मास्क ही घालत नाहीत….असे का वागतात ते समजत नाही….पण आमचा कलाकार समाजसेवेसाठी निस्वार्थपणे झटत असतो अशा आमच्या कलाकारांच्या सन्मानाचा , भविष्याचा , प्रगतीचा , आर्थिक मदतीचा विचार कधी कोणी करणार का ????

काही बोटांवर मोजण्याइतकेच ” जनस्थान ( जागर कलेचा ) व्हॉटसअप गृप , अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संस्था , अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ संस्था , ” चित्रतिर्थ ” चित्रपट श्रेत्रातील कलाकारांचा व्हॉटसअप गृप , “नाशिक डिस्ट्रीक्ट ऑर्केस्ट्रा एसोशियन ” व्हॉटसअप गृप , ABMCM महामंडळ संगमनेर व्हॉटसअप गृप , ” चित्रपट महासंघ ” व्हॉटसअप गृप या सारखे मुंबई , पुणे , कोल्हापूर , नाशिक , सातारा , सोलापूर , नागपूर , औरंगाबाद व महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील कला क्षेत्रातील काही व्हॉटसअप गृप , सांस्कृतिक संस्था , पत्रकार , काही वृत्तपत्रे , प्रसारमाध्यमे , टॉलीवूड – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सुद , जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर , सयाजी शिंदे , मकरंद अनासपुरे , सुशांत शेलार या सारखे अभिनेते   लेखक दत्ता पाटील , दिग्दर्शक सचिन शिंदे , अ.भा.म.चि.महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले , “आरजे भुषण ” 98.3 एफएम  व आणखी काही ठराविक कलाप्रेमी वगळता आमच्या भवितव्याबद्दल कोण पोटतिडीकीने बोलत ही नाही किंवा आमच्या पाठीशी उभे राहत नाही..ही पाठबळाची संख्या आपल्या १२५ कोटी लोकसंख्येच्या तुलनेत नगण्यच आहे…….एवढ्या मोठ्या जनमानसात आमच्या पाठीशी खंबीरपणे कोण उभे राहणार माहित नाही……पुढे काय होणार आमचे माहित नाही……..

यावर आता गांभीर्यपूर्वक विचार करायची वेळ आलीय….मला आता मनापासून सांगावेसे वाटते की स्थानिक प्रशासन , राज्य शासन , केंद्र सरकार तसेच राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था व कलाप्रेमींना……..आणि ती म्हणजे भारताची सांस्कृतिक संस्कृती टिकवायची असेल तर कलाकार जगवा…त्याला सांभाळा…..जर उद्या कलाकाराच राहीला नाही….तर जगाच्या पाठीवर भारतीय कला किंबहुना जगातील कला देखील पोरकी होईल , निशब्द होईल…….अनेक जण हलाखीच्या परिस्थितीमुळे , आजारपणामुळे आणि सर्वात भयानक म्हणजे कोविड १९ च्या प्रादुर्भावाने अनेक छोटे मोठे कलाकार (Artists) आपल्यातून कायमचे निघुन गेले….त्यामुळे कधी ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालीय….तरी तो कलाकार मात्र शोधतोय एका न मिळणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ….कधी तरी भविष्याकडे सुखद व आनंदी जीवन जगायला मिळेल का ? 

या भोळ्याभाबड्या विचाराच्या आशेचा किरण शोधणाऱ्या आणि सुखाने जगण्यासाठी , उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या आमच्या या कलाकारांना (Artists)  कोणी जगू देईल का ?? म्हणूनच तो तळमळीने हताश होऊन म्हणतोय……जगवा आणि जगु द्या…..जगवा आणि जगू द्या…