सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड २७

Advertising World – ऑडियो व्हिडियो स्क्रिप्ट रायटिंग

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – प्रफुल्ल चिकेरूर आणि नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

प्रफुल्ल चिकेरूर

निवेदिका – बर्‍याचदा आपण बघतो की, मार्केटमध्ये एका प्रकारची अनेक प्रॉडक्ट उपलब्ध असतात. मग जेव्हा एखादं नवीन प्रॉडक्ट लाँच करायचं असतं तेव्हा किंवा अगोदरच प्रसिद्ध असलेल्या प्रॉडक्टची नवीन प्रकारे जाहिरात (Advertising World) करायची असेल अशा दोन्ही वेळी स्क्रिप्ट करताना काही फरक असतो का?

चिकेरूरजी – प्रॉडक्ट जर प्रसिद्ध असेल, तर त्याचं स्क्रिप्ट आणि त्याचा बाज वेगळा ठेवावा लागतो. मात्र नवीन प्रॉडक्ट असेल, तर त्याचा बाज आणि त्याचं स्क्रिप्ट वेगळं असतं. 30/20 सेकंदात संपूर्ण आशय लोकांसमोर मांडता आला पाहिजे. त्याचबरोबर स्क्रिप्ट करताना संकल्पना काय केली आहे याचा अभ्यास करून त्या संकल्पनेला धक्का न लावता दोन-तीन पर्याय स्क्रिप्ट रायटर करत असतो.

त्यातून प्रॉडक्शन टीम ठरवते की कोणता पर्याय योग्य आहे किंवा वेगळा आहे. अशा पद्धतीने ते ग्राहकासमोर जातं. ज्यावेळेला ग्राहक एखादी थीम सिलेक्ट करतो की, या थीमवर आपण जायला पाहिजे. मग प्रॉडक्शन टीम जेव्हा स्क्रिप्ट रायटरला नोट्स देते. त्यानंतर सगळ्यात पहिले वन लाईन बनते. वन लाईन म्हणजे गोष्ट असते. त्या गोष्टीत सगळा आशय साठवलेला असतो.

त्या गोष्टीचे 3-4 पर्याय बनतात. त्यातली एखादी गोष्ट निवडली जाते. त्या गोष्टीवरून खरे मास्टर स्क्रिप्ट तयार होते. त्या स्क्रिप्टमधून जेव्हा स्क्रिप्ट सिलेक्ट होतं आणि फायनल होतं त्यावेळी प्रॉडक्शन टीम त्या स्क्रिप्टला स्टोरी बोर्डमध्ये कनव्हर्ट करते. स्टोरी बोर्ड म्हणजे उजव्या बाजूला सगळा ऑडिओ असतो आणि डाव्या बाजूला त्या स्क्रिप्टमधल्या एका वाक्याला काय शूट असेल, कुठलं चित्र असेल, दुसर्‍या वाक्याला काय असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा क्लोजअप आहे का, त्याचा लाँग शूट आहे का, प्रॉडक्ट कुठे येणार आहे, 

कॉम्प्युटर ग्राफिक्स कुठे होणार आहेत. त्याचं नाव कुठे येणार आहे, या सगळ्याचं एक पूर्ण चित्र कागदावर तयार होतं आणि नंतर ते शूटिंग करणार्‍या प्रत्येकाकडे त्याची एक प्रत असते आणि ते सगळ्यांना माहीत असतं की, आता आपल्याला या पद्धतीने करायचे आहे. थोडक्यात काय जेव्हा एखादं प्रॉडक्शन बनवायचं असेल त्याचं जर पेपर वर्क पक्क असेल ना तर काम चपखल होतं आणि क्वॉलिटी प्रॉडक्ट काम होतं.

निवेदिका – आणि या सगळ्याचा एडिटिंगलादेखील फायदा होत असेल.

नंदनजी- हो, नक्कीच. कधीतरी असं होतं, छायाचित्रकार छान प्रगल्भ असेल, त्यांनी खूप चांगला विचार केला असेल त्या स्क्रिप्टचा, कधी कधी लोकेशनवर छान कल्पना सुचते, तर मग तेवढ्यापुरता बदल तिथे करण्यासाठी वाव असतो आणि त्यातून जे चांगलं निघतं ते करायला काही हरकत नाही.

निवेदिका – याच अनुषंगाने मी विचारते की, उत्तम स्क्रिप्ट म्हणजे काय?

चिकेरूरजी – यामध्ये पेपर वर्क खूप महत्त्वाचं आहे. नेमके शब्द, संपूर्ण आशय, कमीत कमी सेकंदांचा वापर, भाषेवरचं प्रभुत्व आणि वैशिष्ट्यपूर्ण बाज या सगळ्याचा अभ्यास करून जे काही लिहिलं जातं ते उत्तम स्क्रिप्ट तयार होतं, यात शंका नाही.

निवेदिका – टेलिव्हिजनसाठी स्क्रिप्ट रायटिंग करणे याचेदेखील काही नियम आहेत का? किंवा काही नियम पाळावे लागतात का ?

चिकेरूरजी – स्क्रिप्ट लिहिताना दुसर्‍याच्या प्रॉडक्टला नावं न ठेवता आपल्या प्रॉडक्टची बाजू कशी भक्कम आहे आणि किती चांगलं प्रॉडक्ट आहे हे मांडता आलं पाहिजे.

निवेदिका – यावरून मला एक गोष्ट आठवते की आपली रेष मोठी आहे हे दाखविण्यासाठी दुसर्‍याची रेष लहान करायची किंवा खोडायची गरज नसते, तर त्या शेजारी जेव्हा जास्त मोठी रेष तुम्ही स्वत:ची आखल तेवढीच तुमची ओळख नक्कीच निर्माण होईल.

चिकेरूरजी – या व्यतिरिक्त ही स्क्रिप्ट लिहिताना, आपली बाजू मांडताना कुठल्याही धर्माला नावं ठेवू नये, कुठल्याही जातीचा उद्धार करायचा नाही. आपलं प्रॉडक्ट किती चांगलं आहे हे सांगताना दुसर्‍याची चेष्टा किंवा मस्करी न करता आपले सकारात्मक विचार सहजपणे सांगता आले पाहिजेत. त्यावेळेला आपण चांगलं कॉपीरायटिंग करू शकतो, असं मला वाटतं.

निवेदिका – डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म, प्रमोशनल फिल्म हे सगळे प्रकारसुद्धा जाहिरातीचाच एक भाग आहेत आणि गेली अनेक वर्षं तुम्ही या सगळ्या प्रकारांसाठी कॉपीरायटिंग करताय. सर, मी तुम्हाला असे विचारते की, जेव्हा या सगळ्या प्रकारांसाठी कॉपीरायटिंग केलं जातं तेव्हा ते काम कसं चालतं?

चिकेरूरजी- जाहिरात आणि डॉक्युमेंटरी,(Advertising World) प्रमोशनल फिल्ममध्ये हा मुख्य फरक आहे की, अगदी कमी वेळेत केलेली जाहिरात असते आणि त्याचा सविस्तर उलगडा केलेला असतो ती डॉक्युमेंटरी असते. मग ती वेगवेगळ्या कारणांसाठी केलेली असते. त्यामुळे त्यालासुद्धा आपण कॉपीरायटिंग करताना जे जाहिरातीमध्ये कौशल्य वापरतो ती सगळीच वापरावी लागतात.

निवेदिका – म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची, सेवेची किंवा त्या कंपनीची विस्तृत माहिती जेव्हा आपल्याला द्यायची असते तेव्हा आपण डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म असे प्रकार वापरू शकतो.

चिकेरूरजी- विस्तृत हा शब्द आपण थोडा सांभाळून वापरूयात; कारण कंटाळवाणी नको, हे त्यात महत्त्वाचं. याचं भानदेखील कॉपीरायटिंगने ठेवले पाहिजे.

निवेदिका – मग एकूणच या प्रकारांसाठी स्क्रिप्टरायटर कसा असावा ?

नंदनजी- जेव्हा आपण डॉक्युमेंटरीज् किंवा अशा विषयांवर बोलतो तेव्हा एखादाच या क्षेत्रातला जाणकार माणूस सगळ्या क्षेत्रांमधल्या डॉक्युमेंटरीज् लिहू शकत नाही. त्याला जवळ जवळ सगळ्या क्षेत्रांचं ज्ञान असेल, असं चौकस असं त्याचं व्यक्तिमत्त्व असावं आणि कुठला माणूस किंवा कुठला उत्पादक किंवा कुठला सेवा देणारा माणूस कोणत्या प्रकारची डॉक्युमेंटरी बनवायला सांगेल हे माहीत नसतं. त्यामुळे तो जे काय सांगेल त्याचं आपल्याकडे ज्ञान एक तर असायला पाहिजे आणि दुसरं ते कुठून मिळवायचं त्याची माहिती असली पाहिजे.

म्हणजे एखाद्यावेळी एखाद्या क्षेत्राची त्याला माहिती नसेल तर त्याने इंटरनेटचा वापर करून ती संपूर्ण माहिती घेऊन त्यावर अतिशय उत्कृष्ट अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. अनेक वेळा लोकं अचानक येतात आणि उद्या किंवा परवा त्यांना लगेच डॉक्युमेंटरी हवी असते आणि म्हणतात की, असे बदल हवेत. म्हणजे आणीबाणीची जरी परिस्थिती आली तरीही ती हाताळणे हे कॉपीरायटरचं काम आहे.

चिकेरूरजी – बर्‍याच वेळा काय असतं की, मोठ्या कंपन्यांमध्ये काही लोक ही व्यवस्थापक पदाची लोकं असतात. त्यांना संचालक मंडळाचा प्रत्येक निर्णय, त्याचे पॉईंट कळतातच असं नाही आणि ते जेव्हा स्क्रिप्टरायटरशी किंवा एजन्सीशी बोलतात त्यावेळी काही पॉईंट सुटून जातात. त्याचंही भान स्क्रिप्टरायटरला पाहिजे. त्यांना काय म्हणायचं आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आपण त्यांना परफेक्ट काम दिलं पाहिजे.

अनेक उत्पादकांच्या वेबसाईटवर एम्स, ऑब्जेटिव्ह, व्हिजन आणि मिशन लिहिलेलं असतं. त्याबाहेर जायचं नसतं म्हणून संचालक मंडळांचा नेहमी असा प्रयत्न असतो की, आपल्या या मिशन स्टेटमेंटच्या बाहेर जायचं नाही, हे मधल्या फळीतल्या कर्मचार्‍यांना किंवा अधिकार्‍यांना आपल्यापर्यंत सांगता येत नाही.

स्क्रिप्टरायटरने जर त्या वेबसाईटला पटकन भेट दिली तर ते सगळे डिटेल्स पाहून ते बनवता/लिहिता येईल. काही वेळेस धोरणाच्या व्यतिरिक्त काही मुद्दे कॉपीमध्ये येतात आणि समोरचा ते शांततेने दुरुस्त करत बसतो आणि स्क्रिप्टरायटरला कळत नाही की, त्या दुरुस्ती का केल्या?

निवेदिका – म्हणजे स्क्रिप्टरायटरला त्या क्षेत्राबद्दल एकूण माहिती असणं गरजेचं आहे; पण ती माहिती नसेल तर वेगवेगळी पुस्तकं वाचून किंवा आता इंटरनेट आपल्या मदतीला आहे. त्यावरून ही सगळी माहिती मिळवणे, ती सविस्तरपणे सादर करणे.

चिकेरूरजी- त्याबरोबरीने ग्राहकाशी सविस्तर चर्चा करणे, यातून नेमके काय हवे ते सुटसुटीतपणे मांडता येते. तुमचं उद्दिष्ट सफल होतं.

निवेदिका – म्हणजे स्क्रिप्टरायटरने काम सुरू़ करण्याआधीसुद्धा त्याच्या मनात या सगळ्या गोष्टी, हे चित्र स्पष्ट झालं पाहिजे आणि मग ते काम पुढं गेलं पाहिजे.

नंदनजी- दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे याबरोबरीने म्हणजे व्हिडिओ शब्द वापरतो तेव्हा तांत्रिक ज्ञान स्क्रिप्टरायटरला नक्कीच असलं पाहिजे. काय केलं तर चांगलं होऊ शकतं आणि काय केलं तर ते दिसायला चांगलं दिसणार नाही हे त्याला आधी माहिती पाहिजे.

निवेदिका – म्हणजे पिक्चरायझेशन कसे असेल हे दाखवणे पण स्क्रिप्टरायटरने केलं पाहिजे.

नंदनजी – फक्त फोटो टाकत गेलं तर फिल्म कंटाळवाणी होईल. वर अक्षरं येतात त्याला कॅप्शन म्हणतात. एकापाठोपाठ वाचायला कॅप्शन दिली तर तो माणूस कंटाळून जातो. दुसरं असं की, व्हिडिओचा सगळ्यात मोठा फायदा असा की, तुम्हाला ते दिसत आहे. त्यामुळे ते सांगायची गरज नसते. अनावश्यक कॅप्शन वगैरे अशा गोष्टी त्या रायटरने टाळायच्या असतात. कॉपीनुसार एडिटर एडिटिंग करत असतो. हे स्क्रिप्टरायटरचं कौशल्य आहे.

निवेदिका – तर टेलिव्हिजन असो, डॉक्युमेंटरीज किंवा शॉर्ट फिल्म एकूणच काय तर व्हिडिओ या प्रकारातून आपल्या कंपनीची, प्रॉडक्टची जाहिरात करताना, प्रमोशन करताना स्क्रिप्टरायटिंग खूप महत्त्वाचं आहे, हेच यावरून दिसून येतं. आज इथेच थांबूया. नमस्कार!

पुढचा विषय – टेलिव्हिजन जाहिरातीचे प्रसारण (Advertising World)

(क्रमशः)                                                                                                                                                                                                                  

jahirat VIshwa

(Advertising World – टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.)

वाचकांसाठी संपर्क –  

प्रफुल्ल चिकेरूर – ८६०५७ ५९९५४

नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com